- डॉ. दिलीप धोंडगेमन म्हणजे मानसिक घटनांची मालिका असा निष्कर्षात्मक अभिप्राय असल्याचे आपण पाहिले. पण ही मालिका एक आणि इतर मालिकांपेक्षा वेगळी कशी ठरते? मालिका म्हणजे मन असल्याने एक मन दुसऱ्या मनाहून वेगळे कसे ठरते? मन ही अनुभवांची मालिका आहे तर तिच्या एकतेचे सूत्र कोणते? एका मालिकेतील वेगवेगळ्या वेळचे अनुभव हे त्या विशिष्ट मालिकेतील अनुभव आहेत हे कशाच्या आधाराने निश्चित करता येते? गेल्या लेखांकात मनाचे देहाशी असलेले संबद्धत्व लक्षात घेतले होते. मानसिक घटना नेहमी देहाच्या विशिष्ट अवस्थांचे, विशेषत: मेंदूच्या स्थितीचे परिणाम म्हणून निष्पन्न होत असतात. मानसिक घटनांच्या जडणघडणीला स्वतंत्र अस्तित्व नसते. भौतिक घटनांच्या ठिकाणी जशी परिणाम घडवून आणण्याची शक्ती असते तशी मानसिक घटनांच्या ठायी नसते. भौतिक घटना पूर्वी घडलेल्या भौतिक घटनांची कार्ये असतात आणि त्या स्वत: कारणे म्हणून कार्ये घडवून आणतात. याउलट, मानसिक घटना शारीरिक घटनांची केवळ कार्ये असतात; त्या कोणतेही कार्य घडवून आणू शकत नाहीत. या स्पष्टीकरणावर अनेक मानसशास्त्रज्ञांचे आक्षेप आहेत. पण आक्षेप हे सिद्धान्तांच्या बळकटीकरणासाठी असतात.जड द्रव्य (मागच्या लेखांकात भौतिक घटनांसाठी वापरलेली संज्ञा) आणि मन अशी दोन भिन्न द्रव्ये न मानता बर्ट्रंड रसेल यांनी निराळेच स्पष्टीकरण केले आहे. त्यांचा सिद्धान्त असा: एखाद्या भौतिक वस्तूच्या स्वरूपाचे विश्लेषण केले तर रंग, आकार, वास इ. संवेदनांची जाणीव होते आणि मन:स्थितीचे विश्लेषण केले तरीही संवेदना व आकारादी प्रतिमांचे संवेदन होते. म्हणजे भौतिक वस्तू आणि मने यांचे जे अंतिम घटक आहेत ते एकच आहेत. हे घटक म्हणजे प्रतिमा आणि संवेदना होत. ह्या घटकांची एक प्रकारे रचना झाली की भौतिक वस्तू साकार होते व दुसऱ्या प्रकारे रचना झाली की मानसिक घटना साकार होते. बर्ट्रंड रसेल यांचा मुद्दा असा की : संवेदना आणि प्रतिमा ह्या ज्या अंतिम सामग्रीच्या दोन्ही प्रकारच्या वस्तू बनलेल्या असतात, त्या सामग्रीचे स्वरूप भौतिकही नसते किंवा मानसिकही नसते. रसेल यांच्या या सिद्धान्तावरील आक्षेप असे : जाणिवेचे स्वरूप मनाच्या एकतेचे स्वरूप यांचा नेमका उलगडा होत नाही. जाणीव म्हणजे नेमकी कशी संरचना आणि मन म्हणजे नेमकी कशी संरचना याचा बोध व्हायला हवा. रसेल यांनी एका प्रकारची रचना व दुसऱ्या प्रकारची रचना असे म्हणत रचनाप्रक्रियेचे समानरूप सांगितले; पण रचनाप्रक्रिया कशी सगुणसाकार होते याचे स्पष्टीकरण मिळत नाही असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
भौतिक द्रव्य आणि मन
By admin | Published: October 20, 2015 3:31 AM