खरे तर दिवस तेच असतात आणि आपणही काही वेगळे नसतो; पण थंडीच्या चाहुलीसोबत दिवाळी आली की सगळा भोवतालचा परिसर उजळून गेल्यासारखा वाटू लागतो, हे खरेचा यावर्षी पाऊस 'जातो जातो' म्हणत अजून गेला नाही आणि थंडी गुणगुणायला लागली असली तरी दरवर्षीच्या जोमाने अजून आलेली नाही. पण यंदाच्या दिवाळीला आनंद आणि उत्साहाचा स्पर्श मात्र आहे! दाणापाणी कमावण्यासाठी बाहेरगावी असलेली मुले माणसे एव्हाना प्रवासाचे सगळे त्रास सोसून आपापल्या घरी पोहोचली असतील, रामप्रहरी दारचे आकाशदिवे उजळले असतील, सुगंधी उटण्याच्या घमघमाटाने पहाट दरवळून गेली असेल आणि थोरामोठ्यांच्या श्रीमंती महालांपासून कष्टकऱ्यांच्या झोपडी-पालांपर्यंत हरेक घराला आज शुभशकुनाचा स्पर्श झाला असेल. हेच तर दिवाळीचे खरे सामर्थ्य!
लक्ष्मीवंतांपासून झोळी फाटकीच राहिलेल्या अभाग्यांपर्यंत प्रत्येकाच्या नजरेत आनंदाचे दिवे उजळते, ती दिवाळीच! या सणाला ऐश्वर्याची, श्रीमंतीची आस आहे खरी, पण खिशात पैसे असणे ही या आनंदाची पूर्वअट मात्र नाही. मनाजोगे असेल ते टिकेल; मन मोडणारे जे जे ते सरेल आणि आपल्या आयुष्याला सुखाची सावली मिळेल या अक्षय स्वप्नावरचे सावट हटवते म्हणून तर दिवाळीचे सगळ्यांनाच एवढे अप्रूप! आज घरोघरी लक्ष्मीपूजनाचे दिवे लागतील, रेशमी वस्त्रे लेवून आनंदाने दरवळणारी कुटुंबे परस्परांचे शुभचिंतन करतील आणि व्यापारी पेठांमधला उत्सवी झगमगाट आकाशात झेपावेल; तेव्हा समोर उभे सगळे प्रश्न, सर्वांच्या नशिबीच्या सगळ्या काळज्या दोन-चार दिवसांसाठी का होईना, अदृश्य होतील!
दोन वर्षे मुक्काम ठोकून असलेल्या महामारीने आता काढता पाय घेतला असला तरी सामान्य माणसांच्या डोक्यावर लादलेल्या आर्थिक विवंचना सरलेल्या नाहीत. परतीच्या पावसाने बदाबदा ओतलेल्या पाण्याने हातची पिके धुऊन नेल्याने शेतकरी त्रस्त आहेत. दिवाळीचे तेज सरले की बाजारात काय होणार या शंकेने व्यावसायिक, व्यापारी मनातून धास्तावलेले आहेत. केवळ विध्वंस याखेरीज कुणाच्याही हाती दुसरे काहीही लागणार नाही, अशा विचित्र टप्प्यावर पोहोचलेल्या एका युद्धासह अनेक कारणांनी त्रस्त असलेल्या आणि आर्थिक मंदीच्या भयाने ग्रासलेल्या जगाला चैन नाही. अनेक देशांच्या नशिबी स्थैर्य नाही. जागतिक स्तरावर असा नन्नाचा पाढा असताना भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र त्यातल्या त्यात बरे आहे / असेल असे आकडे सांगतात खरे, पण आपल्याही देशात कसलीतरी एक विचित्र घुसमट अनुभवाला येते आहे. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतील, पण नीटशी स्पष्ट न करता येणारी अस्वस्थता प्रत्येकालाच जाणवते आहे.
मध्येच कधीतरी कोरोना रुग्णांच्या आकड्यांची बातमी येते आणि नाही म्हटले तरी काळजाचा एक ठोका अजूनही चुकतोच, या सगळ्याचा विसर पाडते म्हणून या दिवाळीचे इतके अप्रूप अंगाला नवे कपडे लागतात, चवीत बदल करणारे गोडधोड जिन्नस घरात शिजतात, म्हणून खरेतर आपल्या परंपरेने ३६५ दिवसांच्या गजऱ्यात ही सणावारांची फुले ओवली. पण हल्ली तसे ना नव्या कपड्यांचे अप्रूप, ना लाडू करंज्यांचा, चिवडा चकल्यांचा दिमाख । खायला आणि ल्यायला तर काय नेहमीच असते, असा सुकाळ नशिबी असलेल्यांची संख्या वाढली आहे, हे तर खरेच! पण त्या बदल्यात आयुष्याने लादलेल्या सक्तीच्या धावपळीची, सततच्या ताणतणावाची गर्दी इतकी झाली, की जगण्यातले स्वास्थ्य कधी हरपून गेले ते कळलेच नाही. म्हणून तर हल्ली दिवाळीत लोक लक्ष्मीपूजन झाले की शांत-निवांत सुखाच्या शोधात प्रवासाला पळतात.
काहीच न करता नुसत्या गप्पांच्या मैफली जमवून घरीच आराम करू, असेही ठरवतात. जगण्याच्या धावपळीतून क्षणभर विसावा घेण्याची ही दुर्मीळ संधी दिवाळी देते, हे कसे विसरणार? म्हणून ती हवी मुक्त, निर्भर सुखाचे बोट निदान चार दिवस तरी पकडून येण्याचे निमित्त हवे, म्हणून दिवाळी हवी!! आदल्या वर्षीची दिवाळी बंद दाराआड काढली आपण गेल्यावर्षीची धाकधुकीतच सरली... यंदा मात्र दारासमोरच्या रांगोळीभोवती दोन पणत्या जास्तीच्या लागतील आणि आकाशकंदिलाच्या झिरमिळ्या उत्साहाने आभाळभर पसरतील. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच्या आठवड्यात बाजारात खरेदीसाठी लोटलेला पूर या उत्साहाचीच सुखद साक्ष आहे. असतील नसतील त्या साऱ्या गाठी - निरगाठी सुटू देत... सगळे जसे होते, जसे आहे त्याहून सुंदर, मंगल होऊ दे.... इडापिडा टळू दे, साऱ्यांवर सुखाची सावली असू दे!