देशभरात लॉकडाऊन सुरु झाला आणि दिनचर्येतील काही गोष्टी पूर्ण करतांना छोट्या छोट्या अडचणी येऊ लागल्या. किराण्याची, भाजीपाल्याची आणि औषधांची दुकानं उघडी असल्यामुळे मुख्य प्रश्न मिटला. पण उठसूठ दाढी आणि हेड मसाजच्या निमित्याने सलून गाठणारे मात्र अस्वस्थ होऊ लागले,त्यातलाच एक मी.
घराबाहेर पडणयास उत्सुक ज्येष्ठ नागरिकाची एक जाहिरात टेलीविजनवर बघितली. त्यात त्यांचा मुलगा सगळी बिलं ऑनलाइन भरतो. तरी ही ते गृहस्थ बहाणा करून बाहेर जाताना पाहून त्यांची पत्नी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करते तर ते म्हणतात,"Hair cut "वो तो ऑनलाइन नही हो सकता ना ".
गेल्या महिन्यात सोशल मीडिया वर अनुष्का ने विराटचा हेअरकट केल्याचा वीडियो पण झळकला. त्यातच माझ्या एका मित्राने त्याची पत्नी त्याचे केस कापतांनाचा फ़ोटो 'बायकोने केली खरी हजामत' या comment सह आमच्या ग्रुप मधे शेयर करून धमाल उडवून दिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला मात्र उगीचच आपले केस खुप वाढले आहेत असे वाटायला लागले. दर दिवशी micro mm वाढणारे माझे केस मिली मीटर च्या वेगाने वाढताहेत असे वाटून मी अस्वस्थ व्हायला लागलो, रोज आरशा समोर जास्त वेळ घालवायला लागलो.
सुरूवातीचे 15 -20 दिवस दाढी वाढवून झाली होती. पण पन्नाशी जवळ आल्यामुळे दाढी चे खुंट ही पांढरे दिसायला लागले त्यामुळे घरच्यांच्या आग्रहाखातर दाढी काढावी लागली, नाहीतर येता जाता पत्नीचे "मुझे बुड्ढा मिल गया " असे बोल ऐकायला मिळाले असते. त्यामुळे परिस्थिती ओळखून मी आपल्या नेहमीच्या 'फ्रेंच कट ' दाढीवर आलो. पण वाढत्या केसांचा प्रश्न मात्र सुटत नव्हता.
भरीस भर हा 'कोरोना' पुढील ६-८ महिने असाच आपल्या जीवनात राहणार असून सलून मधल्या खुर्च्या , टॉवेल्स, साहित्य ,तिथे होणारी गर्दी यांच्या माध्यमातून हात पाय पसरू शकतो . त्यामुळे सलून मध्ये जाण्यापासुन 'सावधान' असे इशारे what app ज्ञानी द्यायला लागले . ते खरे की खोटे हे काळ च ठरवेल. त्यामुळे घरी येऊन आपले केस कापून देण्याची प्रथा अजूनही मोठ्या प्रमाणात प्रचलित असती तर फार बरं झालं असतं असे विचार माझ्या मनात तीव्रतेने घर करू लागले.
एखादी गोष्ट करू नका सांगितले की ती करण्याची इच्छा अधिक तीव्र होते हा मनुष्य स्वभाव आहे. अशावेळी नेहमीच्या सलून ची आठवण येणे स्वाभाविकच होते.
तिथले मोठमोठे आरसे, स्टायलिश खुर्च्या, AC ची थंड़गार हवा, परफ्यूम, रांगेत मांडून ठेवलेल्या निरनिराळ्या क्रीम्स आणि सुवासिक तेलाच्या बाटल्या,विविध आकाराचे कंगवे, कात्र्या,दाढी चे ब्रश, हेयर डायचे बॉक्स,पाण्याचा स्प्रे, ट्रिमर सगळ काही डोळ्यापुढे येऊ लागलं.
लहानपणी मात्र एवढा तामझाम नसायचा. घराच्या अंगणातच 'अंबादास काका' आमचे केस कापून द्यायचे. महिन्याच्या एखाद्या रविवारी मित्रमंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडत असे. अंबादास काका हातात निळया रंगाच्या छोट्या पेटीमधे त्यांचे सगळे साहित्य घेऊन पायीपायी घरी हजर व्हायचे. मग अंगणातच लोखंडी फोल्डेबल खुर्चीच्या सिंहासनावर मी विराजमान होत असे.
त्याकाळी दोनच प्रकारच्या हेयर स्टाइल ची fashion होती, साधी कटिंग आणि सेटिंग . सेटिंग म्हणजे अमिताभ किंवा मिथुन सारखे कानावरचे केस वाढवायचे. एकदा मी तसा निष्फळ प्रयत्न केला होता पण आईच्या धाकापुढे तो फार काळ टिकला नाही.
सगळं साहित्य नीट मांडून ठेवलं की मग काका माझ्या गळयाभोवती पांढराशुभ्र टॉवेल गुंडाळ।यचे,तो चांगलाच पायघोळ असायचा.
"आता हलू नकोस बेटा" असं म्हणून काका आपलं काम सुरु करायचे. सर्वप्रथम भरपूर पाणी मारून केस ओले करायचे. मग कात्री किंवा ट्रिमर ने मागचे आणि बाजुचे केस बारीक केले जायचे. टॉवेल वर पडणारे केस आतून बोटाच्या टिचकीने उडवणयात मला मजा वाटत असे. ट्रिमर मानेजवळून फिरवला की खुप गुदगुल्या व्हायच्या. "अरे, मी एकदा लहानपणी कटिंगच्या वेळी खुप हलत होतो तर माझा कान कापला गेला" असं म्हणून काका त्यांचा छोटा असलेला एक कान दाखवत असंत. काही मित्र अगदी समोर ओणवे बसून हसवणयाचा प्रयत्न करायचे तेव्हा मी हाताच्या मुठी घट्ट करून हसू थोपवणयाचा प्रयत्न करायचो.
मधुनच घरातून आईची "यावेळी चांगले बारीक करा बरं का, याच्या केसांना खुप वाढ आहे"अशी सूचना येऊन धडकायची.
कपाळ।वर पुढे येणारे केस एकाच सरळ रेषेत कापले तर मुलांना 'साधना कट' म्हणून चिड़वायचे. म्हणून अंबादास काका ते 'zig zag' प्रकाराने कापत असंत. सरते शेवटी वस्त-याचा वापर. आधी वस्तरा साबणाने स्वच्छ धुवायचा, मग टॉवेल ने पुसून आतल्या भागात 'टोपाझ' ब्लेड चा अर्धा तुकडा बसवायचा. हलक्या हाताने कानावरची गोलाई, कल्ले काढणे आणि मानेवरचा 'टच अप' होत असे.
मानेवर - गळयावर भरपूर talcom powder टाकून ब्रश ने साफ करायचे.
पुन्हा एकदा भरपूर पाणी मारून चापट भांग काढला की हा सोहळा संपन्न होत असे.
....अशी माझी लहानपणी च्या आठवणीची लागलेली तन्द्री शंतनुच्या (माझा मुलगा) वाक्याने मोडली. "बाबा, हे बघ ना, आईने माझी सगळी हेयर स्टाइल बिघड़वली. आता म्हणतेय की आज मी बाबाचे पण केस कापून देणार आहे"....
घराचिया कलाकाराशी असावे सादर
केशकर्तनाशी असु द्यावे समाधान ..
- डॉ. राजीव पळसोदकर