एन. के. सिंह,ज्येष्ठ पत्रकार - झारखंडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे भाकीत करण्यासाठी कोण्या ज्योतिष्याची गरज नव्हती. एकीकडे नरेंद्र मोदी होते, जे भाजपामध्ये बऱ्याच उणिवा असतानाही लोकांना भुरळ घालीत होते; तर दुसरीकडे हताश काँग्रेस आणि त्याचे सहकारी प्रादेशिक पक्ष होते. झारखंडचे नवे राज्य निर्माण झाल्यानंतर या राज्याने १४ वर्षांत नऊ मुख्यमंत्री पाहिले. तीन वेळा या राज्याने राष्ट्रपती शासनाचा अनुभव घेतला. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली या राज्याचे अनेक मुख्यमंत्री तुरुंगात गेले. सगळे मुख्यमंत्री आदिवासी होते. त्यातही राज्यात अधिक काळ भारतीय जनता पक्षाचे शासन होते. तरीही लोकांनी भाजपाची या वेळी निवड केली. लोकांनी मोदींवर एवढा विश्वास का दाखवला?या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी तेथील वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला हवी. आपल्या निवडणूक पद्धतीत काही दोष आहेत. पक्षाला मिळणारी मते आणि मिळणाऱ्या जागा यांच्यात काहीही ताळमेळ नसतो. काही वेळा जास्त मते मिळूनही जागांच्या संख्येत घट होते, तर मतांच्या प्रमाणात घट होऊनही जागांचे प्रमाण वाढते. लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३१ टक्के मते मिळाली. पण, जागा मात्र ५२ टक्के मिळाल्या! झारखंडमध्येसुद्धा या वेळी हीच स्थिती पाहावयास मिळाली. लोकसभा निवडणुकीत राज्यातील ८१ विधानसभा मतदारसंघातील ५६ मतदारसंघांत भाजपाला अधिक मतदान झाले होते. पण, या वेळच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला तेवढ्या जागा मिळाल्या नाही. सार्वत्रिक निवडणुकीच्या तुलनेत मतदानही १३ टक्के कमी झाले.झारखंड मुक्ती मोर्चाने आदिवासी क्षेत्रात मोदींच्या प्रभावावर मात केल्याचे दिसून आले, तर दुसरीकडे सत्तेत राहूनही सर्व आदिवासी नेते पराभूत झाले. आदिवासी नेत्यांनी आपल्याला फसवले, अशी आदिवासींची धारणा झाल्याचे दिसून आले. एकीकडे मजबूत राजकीय नेता किंवा पक्ष आणि दुसरीकडे तितकाच सुसंघटित विरोधी पक्ष असेल, तर निवडणुकीतील मतदान योग्य पद्धतीने होते. या वेळच्या निवडणुकीत एकीकडे प्रभावशाली नेत्याच्या रूपात नरेंद्र मोदी होते, तर दुसरीकडे त्यांना प्रभावहीन करण्यासाठी विरोधी पक्षच नव्हता. आदिवासी नेत्यांची विश्वसार्हता संपली तर होतीच; पण ते एकसंघही नव्हते. चौदा वर्षांत अस्थैर्य, भ्रष्टाचार आणि शासनहीनता याचाच अनुभव लोकांच्या वाट्याला आला.झारखंड हे आदिवासीबहुल राज्य आहे. आदिवासींची संख्या येथे २८ टक्के इतकी आहे. समाजातील मोठा वर्ग अशिक्षित आणि अंधश्रद्ध आहे. त्यामुळे या राज्यात आदिवासींचे मोठ्या प्रमाणात शोषण झाले आहे. आदिवासींचे वेगळे राज्य हवे, ही मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्याची पूर्तता चौदा वर्षांपूर्वी झाली. त्यातूनच आदिवासी नेतृत्व उदयाला आले. त्या नेतृत्वाने स्वत:ची घरे भरण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे स्वतंत्र राज्य मिळूनही आदिवासींच्या स्थितीत बदल झाला नाही. येथील नैसर्गिक संपत्तीचे शोषण करण्यासाठी साऱ्या देशातील शोषकांनी येथे गर्दी केली. त्यामुळे येथील नैसर्गिक साधने कमी होत गेली आणि गरिबी वाढत गेली.या राज्यात काही काळ वगळता भारतीय जनता पक्षाचीच सत्ता होती आणि राज्याचे सगळे मुख्यमंत्री आदिवासी होते. ते सगळे भ्रष्टाचारात लिप्त होते. त्यांच्या कारभाराने आदिवासी त्रस्त होते, तरीही आदिवासींनी मोदींवर का विश्वास टाकला? भाजपाची राज्यातील प्रतिमा नकारात्मक होती. नरेंद्र मोदी हे राज्याबाहेरचे नेते होते; पण मतदारांंनी भाजपाचे नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलेच नाही. बाह्य राज्यातून आलेली एक विश्वासार्ह व्यक्ती या स्वरूपातच लोकांनी त्यांचा स्वीकार केला. आपण मोदींना मतदान करीत आहोत. आपल्या मतांमुळे मोदी निवडून येतील, या भावनेने राज्यातील मतदारांनी मतदान केले असावे, असे वाटण्यास जागा आहे. त्यामुळे पक्षाची नकारात्मक प्रतिमा मोदींच्या प्रतिमेला नष्ट करू शकली नाही.दुसरा एक वर्ग असा होता, जो सत्तारूढ पक्षावर नाराज होता. त्यांची संख्याही मोठी होती. कोणता पर्याय निवडावा, हे त्यांना समजत नव्हते. मोदींपेक्षा चांगला पर्याय त्यांना दिसत नव्हता. त्यामुळे अगतिक होऊन त्यांनी भाजपाच्या पारड्यात मते टाकली, असे समजण्यास जागा आहे. या निवडणुकीत काँग्रेस पक्ष दयनीय अवस्थेत होता. लोकांना आकर्षित करण्यासाठी पक्षाजवळ योजना नव्हती. कार्यक्रम नव्हता. पराभूत मानसिकतेतूनच या पक्षाने निवडणूक लढविली आणि अपेक्षेप्रमाणे पक्षाचा पराभव झाला. भाजपालाही लोकांनी भरघोस मताधिक्य दिले नाही; पण स्वबळावर सत्ता स्थापन करता येण्याइतपत पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. सध्या भाजपासाठी एवढेच पुरेसे आहे.
झारखंडमधील भाजपाच्या विजयाचा अर्थ
By admin | Published: December 24, 2014 3:14 AM