नागपूरबाहेरच्या वर्धा मार्गावर जमलेल्या हजारो महिलांनी कित्येक तास महामार्ग अडवून धरण्याचे नुकतेच केलेले आंदोलन आणि शनिशिंगणापुरातील महिलांचा मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश मिळवण्यासाठी झालेला लढा या दोन्ही घटना सांकेतिक दिसत असल्या, तरी त्या समाजाच्या सर्वात खाली असलेल्या थरात फुलत असलेला व्यवस्थाविरोधी अंगार साऱ्यांच्या लक्षात आणून देणाऱ्या आहेत. स्त्री ही जगातली सर्वात पीडित व्यक्ती आहे. त्यातून दारिद्र्य, जातीयता, पुरुषी अहंता, धर्मांधतेची अतिरेकी बंधने, शिक्षणाचे अपुरेपण आणि कुटुंबातले नगण्य स्थान यांनी तिला ‘अखेरची’ बनविले आहे. आपल्या मुलींना ‘नकोशी’ अशी नावे देणाऱ्यांची ओळख आपल्या प्रगत महाराष्ट्राला यापूर्वी झालीही आहे. अशा स्थितीत आपल्या न्याय्य व घरगुती मागण्यांसाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण स्त्रिया रस्त्यावर आल्या असतील आणि त्यांनी वर्धा मार्गावर चक्का जाम केला असेल तर ती समाजात येऊ घातलेल्या चांगल्या बदलाची नांदी समजली पाहिजे. शनिशिंगणापूर किंवा त्र्यंबकेश्वराचा वाद चर्चेत असताना, नागपूरच्या ग्रामीण भागातून आलेल्या शेतकरी, शेतमजूर व आत्महत्त्याग्रस्त स्त्रियांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची, शेतमालाला हमीभाव देण्याची, निराधार विधवांना घरकुल देण्यासह अन्य आर्थिक मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी त्यांचे आंदोलन उभारले असेल, तर या स्त्रियांनी कर्ज व नापिकीपायी आत्महत्त्येचा मार्ग अनुसरणाऱ्या ग्रामीण पुरुषांच्या पुढचे व प्रगत पाऊल उचलले आहे असे म्हटले पाहिजे. ‘आत्महत्त्या करणारे लोक जेव्हा हत्त्येचा मार्ग पत्करतील तेव्हा साराच कायापालट होईल’ अशी भाकिते करणाऱ्यांनी मध्यंतरी काही काळ समाजाला अस्वस्थ केले होते. नागपूर व वर्धेच्या ग्रामीण स्त्रियांचा आताचा लढा या अस्वस्थतेचे आगमन सुचविणारा आहे. महिलांची आंदोलने कमालीची संघटित असतात, त्यात जातिधर्माचे अडसर नसतात. स्त्री म्हणून वाट्याला आलेल्या दु:ख व व्यथांचे त्यात प्रगटीकरण असते. उपासाला जात नसते आणि दु:खाला धर्म नसतो तसे आत्महत्त्या करणाऱ्याची जात वा धर्म पाहायचा नसतो. त्याची व्यथा आणि त्याला त्या अवस्थेपर्यंत आणून पोहचविणारी व्यवस्थाच तेवढी पाहायची असते. शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत. त्यांच्या खात्यात पैसे जमा करणाऱ्या योजनांचा लाभ कितीसे शेतकरी घेत असतात? त्यातल्या महिलांचा वाटा किती? एकेकाळी लोहिया म्हणायचे, दिल्लीहून निघालेला एक रुपया शेतकऱ्यांपर्यंत पोहचेस्तोवर त्यातले पाच पैसे उरतात. राजीव गांधींच्या काळात या पाच पैशांचे पंधरा पैसे झालेले दिसले. नंतरच्या काळात खुल्या अर्थव्यवस्थेने नागर भाग श्रीमंत होताना व ग्रामीण भागातील धनवंतांची पुढे झालेली मुले सुखवस्तू झालेली दिसत असताना ग्रामीण भागातला मोडलेला रोजगार मात्र तसाच राहिला. विणकर गेले, सुतार गेले आणि खाती काम करणारे गेले. त्यातली माणसे शहरात मोलमजुरीला आली. ज्यांचे भाग्य मोठे त्यांच्या जमिनी उद्योगांनी खरेदी केल्या. बाकी कोरडवाहू शेतकरी जिथे होता तिथेच राहिला. कर्जबाजारी व दिवसेंदिवस खंगणारा राहिला. आपण किती काळ असेच वाट पाहत जगायचे हा विचार करून वा तसे जगण्याचे दिवस संपविण्याचा इरादा करून या महिला नागपूरभोवती आंदोलन करायला उभ्या झाल्या असतील, तर ती काळाची पावले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे व तशीच त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे. मुंबईतील बारबालांचे, त्यांच्या हिकमती मालकांच्या भरवशावर चालणारे आंदोलन सरकारसह न्यायासनांनाही अस्वस्थ करते. त्या व्यवसायातील सगळा बरावाईट भाग साऱ्यांना ठाऊक असूनही त्यांच्याविषयीच्या सहानुभूतीचा कढ सगळ्या मध्यमवर्गीयांएवढाच मुंबईकरांच्याही मनात येतो. मात्र ग्रामीण भाग अपरिचित असणाऱ्यांना आणि शहरी जीवनात रममाण झालेल्यांना शेतकऱ्यांची आत्महत्त्या हा धक्का देणारा वा काळजीचा विषय वाटत नाही. अशी आंदोलने पक्षीय नसतात आणि त्यांचे नेतृत्वही राजकीय नसते. ती जाणीवपूर्वक वा योजनाबद्धरीत्या उभी केलेली नसतात. त्यांच्या मागे कुणी पैसेवाला वा पुढारी नसतो. त्याचमुळे ही आंदोलने खरी आणि वास्तव असतात. काही काळापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यातील पाच हजार गरीब स्त्रिया १४५ किलोमीटर एवढे अंतर पायी चालून रडत-भेकत-ओकत व रस्त्याच्या कडेला बेशुद्ध होऊन पडत पण रखडत का होईना नागपुरात पोहचल्या. त्यांनी त्यांच्या जिद्दीने सरकारला नमवले आणि आपल्या जिल्ह्यात दारूबंदी करून घेतली. वर्धा व नागपुरातील ग्रामीण स्त्रियांनी केलेले आताचे आंदोलन पाहू जाता आंदोलनाची ही लागण संपणारी नाही. ती दिवसेंदिवस अशीच धगधगत आणि वाढत जाणारी आहे. जे पक्ष वा नेते या आंदोलनांकडे आणि महिलांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतील ते नुसते संवेदनशून्य ठरणार नाहीत, तर त्यांचे राजकीय अस्तित्वही धोक्यात येईल हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ अशी वचने आपण सरकारी प्रचारफलकांवर नेहमी पाहतो. ती खरीही असतात. पण त्याहून खरे व परिणामकारक वचन स्त्रिया जेव्हा पेटून उठतात तेव्हा समाज जळू लागतो हे आहे. आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दु:खे समजून घेऊन त्यांना घरपोच व भरघोस मदत पुरविणे हेच अशावेळी महत्त्वाचे ठरते.
महिलांच्या महामार्गबंदीचा अर्थ
By admin | Published: April 11, 2016 1:57 AM