- सुधीर गाडगीळ
प्रवासात, माहीमच्या घरात, रंगमंचावरच्या विंगेत, हाँगकाँगच्या विमानतळावर, कोल्हापूरच्या रस्त्यावर, कतार किंवा दुबईच्या स्टेजवर, अशा कुठं कुठं 'आशाताई' मला गेली कित्येक वर्षे भेटलेल्या आहेत. प्रसन्न चेहरा, सतत हसतमुख, काळेभोर टप्पोरे डोळे मोठ्ठाले करत, कुणाच्या तरी कलावंताच्या भानगडीचं गुपित सांगायला कायम उत्सुक. गुपिताचा गाभा सांगून झाल्यावर खळाळून हसणं. 'आशालता'ना (वाबगावकर) मी साधारण २२-२४ वर्षे असंच अनुभवलंय.
मी काही त्यांच्या कुठल्या नाटकात किंवा नाट्यसंस्थेत नव्हतो. पण त्यांच्या नाट्य-चित्र क्षेत्रातील अनुभवांचं कथन त्यांच्याकडून ऐकण्यासाठी त्यांना बोलकं करत, एखादं नाट्यगीत त्यांना म्हणायला लावत, साथीला त्यागराज खाडीलकरला गायला लावत, आम्ही देश-परदेशात 'टॉक शो' करत भटकायचो. त्या निमित्तानं आशा ताईंशी मनमुराद गप्पा झाल्या. प्रवासात, अजून किती राह्यलं हो अंतर, ही प्रश्नाची भुणभुण वैताग येण्याइतपत पुनःपुन्हा चालत असे. पण एकदा का त्या स्टेजवर रसिकांसमोर आल्या, की मग मात्र रंगमंचावरची राणी होत. "त्ये जोशीणबाई... घरात चोरून अंडी घालतं...", असं वाऱ्यावरच्या वरातीतलं कडवेकर मामींच्या तोंडचं वाक्य ठसकेबाजपणे, खास कर्नाटकी ढंगात त्यांनी सादर केलं की, नाशिक असो, सोलापूर असो, वा दुबई, देश-परदेशात हंशा फुटून, टाळ्यांचा कडकडाट होत असे. "पंचप्राणांपेक्षाही ज्याचं मोल सत्यवतीनं अधिक मानलं, ते तर आपण चुरगाळून टाकलंत, अवघ्या अवघ्या जगण्याचंच निर्माल्य झालं," अशा वाक्यानंतर रसिकांच्या डोळ्यात पाणी येत असे. 'गर्द सभोती राज साजणी' हे गाणं तडफेनं म्हणत, अवघ्या श्रोतृवृंदाला 'शो'च्या पहिल्या तासभरातच खूश करून टाकण्याची किमया महाराष्ट्राच्या या 'मत्स्यगंधे'नं साधलेली होती.
कालच्या त्यांच्या अवचित जाण्यानं, त्यांचे विविध शो मधले किस्से कथन करतानाचे, गाणं गातानाचे सारे सारे भाव डोळ्यासमोर आले.
'गंपू दादा'नं (म्हणजे अभिषेकी) माझ्यातल्या गाणाऱ्या गळ्याची जाणीव करून देऊन मला मार्गदर्शन केले. तर गोपीनाथ सावकार आणि मा. दत्तारामांनी माझ्यातले अभिनय गूण ओळखले, असं जेष्ठांबद्दलचं ऋण त्या वेळोवेळी व्यक्त करत.
'गंधर्वांच्या नाटकांना घरातल्यांबरोबर जायची, पण खायची आणि झोपायची.' नाटक असं पूर्ण मी प्रथम 'संशय कल्लोळ पाह्यलं'. राम मराठे आणि गणपतराव बोडस यांचं काम बघून, हा प्रकार आपल्याला जमणारच नाही, असं त्यावेळी वाटलं. पण कशीबशी मारून मुटकून 'रेवती' कील. पुढे 'शारदा', 'मृच्छकटिक' केलं. महादेवशास्त्री जोशी ते पाहून म्हणाले, की 'अरे ही तर देवलांची मानस कन्या'. वसंतराव कानेटकरांनी 'मृच्छकटिक' पाहूनच माझ्यासाठी 'मत्स्यगंधा'ची व्यक्ती रेखा लिहिली आणि मधुकर तोरडमलांनी गुडबाय डॉक्टरमधील कॅरेक्टर लिहिली.
लेखकांना स्फूर्तिदायी ठरणाऱ्या आशालता वाबगावकरांनी मराठी रंगमंचावर चक्क ५२ ते ५४ वर्ष अक्षरशः 'राणी'च्या थाटात 'राज्य' केलं. नाटकांचा बहर चालू असतानाच त्यांना अचानक पॅरालिसीसचा अटॅक आला. त्यावेळी त्या सहा महिने हॉस्पिटलमध्येच पडून होत्या.
टीव्हीवर 'जन्मठेप' नावाचं कोकणी नाटक त्यांनी केलं. ते पाहून बासूदांनी त्यांना शरदबाबूंची 'निष्कृती' वाचायला दिली आणि त्यातूनच 'अपने पराये' या हिंदी सिनेमात पहिलं काम त्यांना मिळालं. नवा दरबार सुरू झाला. आजारपणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेलं हे हिन्दी सिनेमांचं नवं विश्व अनुभवताना त्या सतत त्या वरच्या जगन्नियंत्याच्या कृपेचं स्मरण करतात. याच टप्प्यावर आम्ही सुरेश खरेंचं 'मिष्कीली' करून प्रथम अमेरिकेचा दौरा केला. चार महिन्यांच्या त्या परदेश दौऱ्यानं त्यांच्याशी खरा स्नेह जुळला. गोवा हिंदू असोसिएशनच्या नाटकाच्या दौऱ्यात, एस.टी.नं जाऊन, धर्मशाळेत राहून, दहा रुपये नाईटवर काम केलेल्या, 'आशालताबाई' सिनेमाच्या ग्लॅमरमुळे विमानप्रवास करू लागल्या. काही हजार घेऊन 'पर डे शिफ्ट'चा करार करू लागल्या. जाहिरातीत झळकल्या, गाडी घेतली. पण जुनी माणसं, जुने क्षण त्या कधीच विसरत नव्हत्या. हे त्यांच्याशी दौऱ्यात बोलताना जाणवायचं.
त्या सांगत... "गोवा हिंदू मधला पहिला दिवस, आईची साडी नेसले होते. बोंगा झालेला. स्कर्टवरचा ब्लाऊज घातलेला, गोवा हिंदूच्या दारातच अडखळून पडले. तो रंगभूमीला माझा पहिला नमस्कार."
वाऱ्यावरची वरातचा विषय निघाला, की त्या भरभरून पुलंवर बोलत. त्यावेळच्या तालमीच्या गमती सांगत. पुल स्वतः तालमी घेत. रंगमंचावर उभं कसं राहावं, इथपासून ते ढोलकी वाजवण्यापर्यंत सारं ते क्षणात करून दाखवत. त्या काळात आम्ही 'पुलं'नी भारावलो होतो.
प्रयोगाला रंगमंचावर पाऊल ठेवण्यापूर्वी आशा ताईंना दृष्ट लागू नये म्हणून त्यांच्या तळपायाला 'काजळ तीट' लावणाऱ्या बॅकस्टेज वर्करला त्या कधीच विसरल्या नाहीत. पहिल्याच हिन्दी चित्रपटाच्या वेळी फिल्मी स्तानच्या भव्य सेटवर त्यांना सांभाळून घेणाऱ्या, के. के. महाजन यांचा गप्पात उल्लेख निघताच त्या प्रणाम करत. उटीतल्या थंडीनं गारठून रडकुंडीला आलेल्या असताना राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिंन्हा यांनी आशालता बाईंची घेतलेली काळजी त्यांना सतत आठवे. पर डेचं मानधन घे, असा व्यावहारिक सल्ला जितेन्द्र या अभिनेत्यानं आपुलकीनं 1982मध्ये दिल्यानं त्याचा आधार वाटल्याचे सांगत.
'अंकुश'च्या वेळी नाना पाटेकरने गंमतीनं गळा दाबल्यानं घाम फुटल्याची आठवण त्यांना त्याला पाहाताच होत असे. मिथुन चक्रवर्ती, जॉकी श्रॉफ, अनिल कपूर, रती अग्निहोत्री, श्री देवी, या त्यांच्या पडद्यावरच्या मुलांचं व्रात्यपण आठवून दौऱ्यात त्या नेहमीच त्यांचे किस्से सांगताना हसत.
लहानपणी शिरगावात राहत असताना, कल्याणजी भाईंच्या ऑर्केस्ट्रात सलग सहा वर्षे त्या रस्तोरस्ती गायकवृंदात गात. उंचीनं मोठ्या गायकांबरोबर गाताना स्टुलवर उभं राहून आशा ताई गात. 'मी माझ्या गाण्याची उंची वाढवीन,' असं त्या पोरसवता वयात म्हटल्याचं आठवून त्यांना हसू फुटत असे.
त्यांनी चक्क सचिवालयात नोकरीही केली होती. तिथंच त्या सौ. वाबगावकर झाल्या. मंत्रालयातल्या जुन्या मैत्रीणींना त्या भेटत. आम्हाला त्यांनी भूमिकातून जिवंत केलेले क्षण जास्त आठवतात. 'पुढचं पाऊल' मधली 'खाष्ट सासू' 'भाऊबंदकी'तली आनंदीबाई, रेवती अशी अनेक कामं डोळ्यापुढं येतात. सर्वात स्मरणीय म्हणजे अल्लड, सूडानं पेटलेली नि अगतिक, अशा तीन रुपातली मत्स्यगंधा आणि मत्स्यगंधेच्या तोंडचं गाणंही!
सायकॉलॉजी आणि फिलॉसॉफी घेऊन एम. ए. झालेल्या आशाताईंना माणसांची सायकॉलॉजी जास्त उत्सुकतेची वाटे. इतरांबरोबरचे चांगले क्षणच त्या आठवत. बॅकस्टेजच्या पंढरीपासून, थकवा जाण्यासाठी नाटकाच्या वेळी मध्यंतरात त्यांना बिस्कीट आणून देणाऱ्या रसिकाची त्या सतत आठवण काढत. माला, पत्नी, आई, वडील, साऱ्यांना माझ्या घरी राहून अनुभवलं असल्याने, माझ्याशी बोलताना त्यांच्या तोंडची वाक्यच त्या जास्त सांगत.
आता त्या नसल्यानं 'त्यांचं' स्मरण करणंच आपल्या हातात.(सुधीर गाडगीळ - 9822046744)