- अमेय रानडे, निवेदक
भावगीत हा मराठी संगीताच्या वाटचालीमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जी.एन.जोशी, गजाननराव वाटवे, जे. एल. रानडे, बबनराव नावडीकर, दशरथ पुजारी ह्यांनी मराठी भावगीत खऱ्या अर्थाने या मातीत रुजवलं.
ह्याच मांदियाळीत आपल्या वेगळ्या धाटणीच्या आवाजाने स्वतःची ओळख निर्माण करणारे गायक म्हणजेच अरुण दाते. हे नाव ऐकलं की समोर उभा राहतो तो त्यांनी गायलेल्या अवीट स्वरमिलापाच्या शब्दप्रधान गायकीचा एक समृद्ध अनुभव.
मध्य प्रदेशमध्ये इंदूर स्थित असणारं दाते यांचे घराणं. त्यांचे वडील रामुभैय्या दाते हे तर मोठे रसिकाग्रणी. एक निस्सीम कलासक्त व्यक्तिमत्व. भारतातल्या अनेक उत्तमोत्तम गायकांची, कलाकारांची त्यांच्या घरी बैठक असायचीच. त्यातूनच देवासला स्थायिक झालेल्या पं. कुमार गंधर्वांशी त्यांचा स्नेह जुळला.अगदी सुरुवातीला अरुण दाते यांना कुमारांच्याच मार्गदर्शनाचा लाभ मिळाला. त्यांच्यातील कलाकाराचे गुण हेरले ते खऱ्या अर्थाने पु.लं.नी. त्यामुळे दाते घराण्यात जन्म होणं, भाईंचा परीसस्पर्श होणं आणि कुमारांनी गाणं शिकवणं या तीन चमत्कारानंतर मी गायक झालो नसतो तर नवलच, असं दाते साहेब म्हणायचे.
१९६२ मध्ये आकाशवाणीच्या 'भावसरगम'साठी यशवंत देव, आणि श्रीनिवास खळे यांनी अरुण दाते यांना एक गाणे रेकॉर्ड करण्यासाठी विचारणा केली. वास्तविक पाहता केवळ उर्दू गझल गाणारे अरुण दाते सुरुवातीला मराठी गाणे गाण्यास तितकेसे तयार नव्हते. पण वडिलांच्या आग्रहाने ते तयार झाले आणि सुधा मल्होत्रा यांच्या साथीन ते गाणं झालं. ते गाणं म्हणजेच मंगेश पाडगावकरांचे प्रत्ययकारी शब्द 'शुक्रतारा मंदवारा'. वास्तविक पाहता अरविंद हे अरुण दाते यांचे मूळ नाव. पण या गाण्याच्या वेळेस आकाशवाणीवरून झालेल्या उद्घोषणेमध्ये त्यांना अरुण हे नाव चिकटलं ते अगदी कायमचंच.
या गाण्याने इतिहास घडवला. अगदी आजही ते गाणं विविध मैफिलींचा अविभाज्य भाग म्हणून सादर केलं जातं. या गाण्याने मराठी भावगीत विश्वामध्ये अरुण दाते नावाचं पर्व सुरू झालं. 'शुक्रतारा'नंतर 'हात तुझा हातात','सर्व सर्व विसरू दे','पहिलीच भेट झाली' ही द्वंद्वगीते पाडगावकर खळे आणि अरुण दाते यांनी केली. अरुण दाते यांचा बेस मधला आवाज हा अत्यंत तरल मुलायम गझल आणि शब्दप्रधान गायकीसाठी अत्यंत योग्य होता. त्याचाच उपयोग त्यांच्या विविध संगीतकारांनी अतिशय पुरेपूर करून घेतला. 'या जन्मावर या जगण्यावर' हे गाणं पाडगावकरांनी जणू काही त्यांच्यासाठीच तयार केलं. वा.रा.कांत यांचं 'सखी शेजारिणी' हे गाणं करताना संगीतकार वसंत प्रभूंनी 'शुक्रतारा' गाणारा मुलगाच मला या गाण्यासाठी हवा असं चंगच बांधला आणि ते गाणं दाते साहेबांकडून गाऊन घेतलं.
'संधीकाली या अशा' हे गाणं तर साक्षात लतादीदींबरोबर त्यांनी गायलेलं आहे. 'स्वरगंगेच्या काठावरती'मधली आर्तता, 'भातुकलीच्या खेळा'मधला भाव, 'अखेरचे येतील माझ्या' मधला दर्द, 'दिवस तुझे हे फुलायचे'मधली तरलता ही तर केवळ अवर्णनीय. 'शतदा प्रेम करावे' या गाण्याने तर कित्येकांना नव्याने जगण्याची प्रेरणा दिली.
त्यांचा स्वभावही त्यांच्या गाण्यासारखाच शांत,संयमी आणि निर्मळ. अनेक कलाकारांना, नवीन गायकांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. एवढंच काय 'शुक्रतारा' कार्यक्रमात त्यांच्या समवेत आजपावेतो सुमारे १२५ सहगायिका गाऊन गेल्या.
शुक्रताराचे हजारो कार्यक्रम झाले. रसिकांशी त्यांचं नातं जिव्हाळ्याचं राहिलेलं आहे. त्यांचा अत्यंत मृदू लाघवी स्वभाव समोरच्याला झटकन आपलंसं करत असे. आता दाते साहेब आपल्यात नाहीत.पण त्यांनी निर्माण केलेलं हे भावविश्व मात्र वर्षानुवर्षे आपल्यासोबत राहील. अगदी निरंतर.
शेवटी दाते साहेबांचाच स्वर लाभलेले शांताबाईंचे शब्द आठवतात
कुणास काय ठाउक कसे, कुठे, उद्या असू?निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसूतुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हेअसेन मी नसेन मी तरी असेल गीत हे