- वसंत भोसले‘‘मारलेले तरुण खरंच आरोपी होते की, दबावापोटी पकडून आणलेली फाटकी मुलं, हे आता कधीही समोर येणार नाही... कायद्याला वळसा घालण्याची अशी क्रूर पद्धत रुजू नये.’’‘‘हैदराबादला महिला डॉक्टरवर झालेला सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर झाला. गुरुवारी रात्री तपासासाठी घटनास्थळी नेले असताना यातील एका आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि चौघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांच्या गोळीबारात हे चारही संशयित आरोपी मारले गेले. या एन्काऊंटरच्या घटनेची सत्यता काहीही असली तरी आज संपूर्ण देश मात्र पोलिसांच्याच बाजूने उभा आहे. आरोपी मारले गेले असले तरी समाजातील ही विकृत पुरुषी मानसिकता कधी मरणार?’’
या महत्त्वपूर्ण दोन प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न खूप मूलभूत आहेत. उत्तर प्रदेशातील अत्याचारित महिला न्यायालयात न्याय मागण्यासाठी हेलपाटे घालत होती. तिला याच घटनेच्या पार्श्वभूमीवर जिवंत जाळल्याची बातमी येऊन धडकली. तेव्हा हा देश भ्रष्ट व्यवस्थेमुळे अराजकतेच्या वाटेवर चालला आहे का? कायद्याचे राज्य किंवा व्यवस्था राहिली आहे का? अत्याचारासारख्या गुन्ह्यानंतर त्याचा तपास करणा-या यंत्रणेपासून ते न्यायव्यवस्थेपर्यंत अशा महिलांना न्याय मिळेल का? याची काही शाश्वती आहे का? तशी व्यवस्था निर्माण करण्यात आपण सत्तर वर्षांच्या लोकशाहीवादी समाजाच्या वाटचालीनंतर हे प्रश्न उपस्थित व्हावे, ही खूप गंभीर परिस्थिती आहे. पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचार ते साठ वर्षांच्या वृद्धेवर सामूदायिक अत्याचार अशा घटना देशाच्या कोणत्या ना कोणत्या कानाकोप-यात होत असतात. बहुतांश अत्याचार हे जवळच्या किंवा नात्यातील व्यक्तीकडूनच होतात, असे अनेक घटनांवरून मांडले जाते.
हैदराबादला जी घटना २८ नोव्हेंबरच्या रात्री घडली, त्यात जवळचे किंवा ओळखीचे संशयित आरोपी नव्हते. अत्याचार करणाऱ्यांची मानसिकता ही विकृत पुरुषी मानसिकता आहे, अशा आरोपींना फाशी द्यावी, अशा गुन्हेगारांसाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी, अशी मागणी निर्भया प्रकरणानंतर पुढे आली. तशी कायद्यात तरतूद करण्यात आली. कायद्याचा धाक बसून अशा प्रकारचे गुन्हे घडण्याचे प्रमाण कमी होईल, असे सांगितले जात होते. मात्र, वास्तव वेगळेच आहे. फाशीच्या शिक्षेची तरतूद केल्यानंतरही अत्याचारासारख्या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही.
अशा फौजदारी गुन्ह्यांचा तपास, चौकशी व आरोपपत्र दाखल करण्याची संपूर्ण जबाबदारी सरकार घेते. पोलीस सर्वप्रकारच्या तपासानंतर आरोपपत्र दाखल करतात. बळी गेलेल्या महिलेची आणि संशयित आरोपींचीही वैद्यकीय तपासणी होते. सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जातात. मात्र, ही यंत्रणा राबविणा-यांमध्ये प्रामुख्याने पुरुषच असतात. त्यांची मानसिकता पुरुषीच असते. वैद्यकीय तपास करणा-यांत समावेश असलेल्या व्यक्तींची मानसिकताही पुरुषी असते. दोन आठवड्यांपूर्वी ‘पिंपळ’ या चित्रपटाच्या निमित्ताने स्थलांतरितांचा विषय याच सदरात मांडला होता. त्यातील ऐंशी वर्षांचे निवृत्त सुशिक्षित गृहस्थ सकाळी चालण्यासाठी जातात. तेव्हा त्या बागेत येणाºया-जाणा-या तरुण महिलांना ते न्याहाळत असतात. त्या गृहस्थांना मॉर्निंग वॉकसाठी घेऊन जाणारी तरुण डॉक्टरीन असते. येणा-या-जाणा-या तरुणींवरून कॅमेरा फिरत असतो. तेव्हा या ऐंशी वर्षांच्या गृहस्थाची मानही इकडून-तिकडे फिरत असते. हे त्या डॉक्टर तरुणीच्या लक्षात येते आणि ती म्हणते, ‘काय चालले आहे? मानेचा टेबल फॅन झाला आहे की!’ टेबलवरील फॅन इकडून तिकडे फिरावा, तसे हे वृद्ध गृहस्थ येणा-या-जाणा-या तरुणींना न्याहाळत असतात. सिनेमातील हा सीन विनोदाचा भाग म्हणून घेतला असला आणि ते वृद्ध विकृत नाहीत, असे मानले तरी त्या तरुण महिला डॉक्टरलासुद्धा ही बाब खटकत नाही. तुमचा टेबल फॅन झाला आहे, असा विनोद करते.
चित्रपटासारखा गंभीर कलाप्रकार हाताळणारा दिग्दर्शक आणि त्यातील कलाकारांना यात गैर काही वाटत नाही. प्रेक्षकही तो ‘विनोद’ समजतात. असे रस्त्या-रस्त्यांवर, गावोगावी, शहरे आणि सर्वच सार्वजनिक ठिकाणी घडते आहे. त्यात जोपर्यंत गैर वाटत नाही, तोपर्यंत महिलांची सुटका होणार नाही. वरील दोन्ही प्रतिक्रिया खूप महत्त्वाच्या यासाठीच वाटतात. महिलांचा सन्मान करणारा देश आणि त्यांची संस्कृती म्हणून गौरवाने बोलले जाते. फुलनदेवी डाकू होती. तिला डाकू बनविणाºया व्यवस्थेविरुद्ध कोणी बोलत नव्हते. ती दलित होती. तिच्यावर सूड उगविण्यासाठी अकरा पुरुष अत्याचार करीत होते. हा सर्व या देशात घडलेला प्रकार आहे. ती केवळ काल्पनिक चित्रपटाची कथा नव्हती. हीच फुलनदेवी जेव्हा खासदार झाली तेव्हा आपल्या संसदेची प्रतिष्ठा धुळीस मिळाली, अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत होतो. मात्र, त्याच फुलनदेवीवर अकरा पुरुष अनेक तास अत्याचार करीत होते. भले ते टोळी युद्धातून असो की, डाकूंची मारामारी असो. जी समाजव्यवस्था ही डाकूंची टोळी निर्माण करते, ती अत्याचार करण्यास भाग पाडते आणि सूडापोटी फुलनदेवी हाती बंदूक घेऊन झगडत राहते. या सर्व व्यवस्थेचे आपण काय केले? काही केले नाही. फुलनदेवी शरण आल्या. त्यांना माफी दिली तेव्हाही टीका झाली. ती महिला होती. दलित होती. परिणामी, आपल्या वर्णवर्चस्ववादी पुरुषी मानसिकतेने हे सर्व घडते. असे मान्य करूनच चालले होते. त्या फुलनदेवींना कायमच खलनायिका ठरविण्यात आले. खरे तर ती एक शापित महिला होती.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा त्यांची नोंद घेण्यापासून प्रश्न उपस्थित होतो. हैदराबादच्या घटनेतही असे झाले आहे. अत्याचार करून तिला जिवंत जाळण्यात आल्याची माहिती मिळताच हद्दीचा विषय उपस्थित करून पोलीस तातडीने कारवाईसाठी बाहेर पडत नाहीत, ही मानसिकता काय दर्शविते? देव-देवतांची पूजा करणाºया देशातील महिलांची ही अवस्था असावी, याची कोणाला खंत वाटत नाही. हैदराबादच्या घटनेची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवर होते. अनेक विकसित राष्ट्रे आपल्या नागरिकांना भारतात प्रवास करताना जपून रहा, कोठे कधी अत्याचाराची घटना घडेल, याची शक्यता नाकारता येत नाही. अशाच त्या सूचनेचा अर्थ असतो. आपण नेहमीच म्हणतो ‘मेरा देश महान है!’ तो कोठे असतो? माणसांचा आणि सीमेच्या रेषेतच देश असतो ना? त्या देशात अशा घटना घडतात, आपण कसे वागतो? गोव्यासारख्या पर्यटकांच्या राज्यात दरवर्षी परदेशातून येणा-या तरुणींवर अत्याचाराच्या घटना घडतात. आपण पाहुणे म्हणून आलेल्या लोकांना अशी वागणूक देतो का?
गुन्हा घडल्यानंतर त्यातून सत्यता निष्पन्न होण्याची जी प्रक्रिया आहे, त्यात सहभागी असणाºया व्यक्तींची मानसिकता कशी असते? ही मानसिकता महिलांना न्याय देण्याची क्वचितच असते. सांगलीचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी अशा तपास यंत्रणेच्या मानसिकतेने त्रस्त झालेले होते. अत्याचारात बळी पडलेल्या महिलांना धमकावणे, तपास चालू असताना संशयित आरोपींनाच मदत होईल, अशी माहिती देत राहणे. न्यायालयासमोर येणाºया पुराव्यात पळवाट शोधून देण्यात मदत करणे, असे प्रकार घडत होते. परिणामी, अत्याचारास बळी पडलेल्या महिलांना न्याय मिळत नव्हता आणि न्यायालयातून आरोपी सुटत होते. त्यामुळे हैदराबादच्या घटनेतील संशयित आरोपी खरे आहेत, असे मानले तरी त्यांना हाताळताना ढिलाई कशी झाली? त्यांना कायद्याने जी शिक्षा आहे ती व्हायला हवी होती. अशा आरोपींना पोलीस एन्काऊंटरमध्ये पोलिसांनी मारल्याचा बहुसंख्य भारतीयांना आनंद झाला असणार आहे.
सर्वजण पोलिसांची कृती योग्यच होती, असेही मानू लागले आहेत. हा सर्व प्रकार जनभावनेच्या दबावाखाली घडला आहे का? आरोपींना कडक शिक्षा व्हायलाच हवी. पण न्यायव्यवस्थेच्या प्रक्रियेतून जायला हवे. त्याच तपास यंत्रणेवर लोकांचा विश्वास नाही. ती यंत्रणा पोलीस खात्याची आहे. ती नीट राबविली जात नाही, हा अनुभव आहे. तरीदेखील आज बहुसंख्याक लोकांसाठी त्यांनी केलेली कृती योग्य वाटते. ते संशयित आरोपी असले तरी मारले गेले. त्याची पार्श्वभूमी वेगळीच होती. पोलीस यंत्रणेविरुद्धच हात उगारून पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता, असे पोलीस म्हणतात. त्यावर विश्वास ठेवूया. मात्र, त्यांना यासाठी मारले गेले. ज्या पुरुषी मानसिकतेतून डॉक्टर तरुणीवर अत्याचार झाला. तिला जिवंत जाळण्यात आले. त्या मानसिकतेबद्दल शिक्षा झालीच नाही.
पोलिसांच्या गोळीबारात मारले गेले, हीच शिक्षा मानायची असेल तर प्रत्येक संशयित आरोपीला असे मारता येईल का? किंवा प्रत्येक आरोपी पोलिसांवर हात थोडीच उगारणार आहे? देशात महिलांवर हीच शिक्षा मानायची असेल तर प्रत्येक संशयित आरोपीला असे मारता येईल का? किंवा प्रत्येक आरोपी पोलिसांवर हात थोडीच उगारणार आहे? देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचा विषय खूप गंभीर आहे. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील महिला अत्याचारास बळी पडली होती. ती न्यायालयात जाऊन न्याय मागत होती. तिच्या प्रतिष्ठेची होळी करणाऱ्यांनी तिला न्याय मागण्याचा अधिकारही नाही, याच मानसिकतेतून जिवंत जाळले गेले. किती भीषण क्रूरता आहे ही? ही गुन्हेगारी वृत्ती आहे. पुरुषांची विकृत लैंगिक मानसिकता आहे. तिला मारण्याची गरज आहे. यासाठी समाजात बदलाची गरज आहे. अशा घटनांपासून दूर रहावे म्हणून मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे, किशोरवयीन असतानाच लग्न लावून देणे, समाजात मोकळेपणे फिरण्यास मज्जाव करणे, अशी बंधने घालणारा समाज मोठा आहे.
अलीकडच्या काळातील सोशल मीडिया व प्रसारमाध्यमे, चित्रपट, आदींना दोष देण्याची पद्धत रूढ झाली आहे. हे सर्व महिलांनादेखील उपलब्ध झाले आहे. त्यांच्या हातातही तंत्रज्ञान आले आहे. त्या करतात का बलात्कार? त्यांची मानसिकता कशी बदलत नाही? नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांवर अत्याचार करण्याच्या घटना अधिकच वाढल्या आहेत. नव्या तंत्रज्ञानाला सामोरे जाणारी मानसिकता तयार करण्याची जबाबदारी आपल्या समाजाची नाही का? हे तंत्रज्ञान टाळून आपण जगू शकतो का? संस्कार कमी पडतात, म्हणून संस्कृती रक्षण करणारे तयार झाले आहेत. त्यातून नवी संस्कृती तयार होत नाही. केवळ मारझोड होत राहते.
आपली संपूर्ण समाजव्यवस्था जाती-पातीने भ्रष्ट झाली आहे. सार्वजनिक जीवनात कसे वावरावे हे शिकविले जात नाही. कर्नाटक विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहणारे लोकप्रतिनिधी आढळून येतात, तेव्हा आपण समाजापुढे कोणता आदर्श ठेवतो, याचे भान नसते. हे सर्व मानसिकतेशी निगडित आहे. भ्रष्ट व्यवस्थेशी निगडित आहे. पैसा, सत्ता, संपत्ती व जातव्यवस्था याच्याशी निगडित आहे. त्यातून ही मानसिकता तयार होते. त्यातून संपूर्ण व्यवस्था विकत घेण्याची शक्ती अशा लोकांच्या हातात एकवटते. आदर्शवाद वगैरे सर्व गौण ठरते.
अत्याचाराला बळी पडलेल्या महिलेला न्याय मिळताना जी प्रक्रिया होते, त्याचा प्रवास होतो, तो पाहिल्यानंतर न्याय नाकारलाच जातो असे वाटते. त्यातून आलेल्या नैराश्यातून संशयित आरोपींना मारण्याच्या घटनेचेही समर्थन होऊ लागते. ही भावना गृहीत धरली तरी कायद्याच्या राज्याला भवितव्य नाकारणारी ठरू शकते. यासाठी लोकशाही समाजाने या व्यवस्थेची स्वच्छता होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेक गंभीर प्रकरणांतून तथाकथित मोठी माणसं निर्दोष सुटतात, तेव्हा लोकांचा समाजव्यवस्थेवरील विश्वास उडायला लागतो.
आपण या कारवाईचे स्वागत केले तरी पुरुषी विकृत मानसिकता मारण्यासाठी समाजाची रचना, व्यवस्था बदलण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. पुरुषी विकृत मानसिकता मारावी लागणार आहे. हा पुरुष सर्व पातळीवर आहे. त्यात विकृतपणा येणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. हैदराबादची घटना आणि त्यानंतर जे घडले तो मार्ग हे सध्याच्या समाजातील गुन्हेगारीवरील उत्तर नाही.