काही वर्षापूर्वी यात काही वाद नव्हता, मतभेद नव्हते आणि चर्चेचाही तो मुद्दा नव्हता. घराची, कुटुंबाची स्वयंपाकपाण्याची, आल्यागेल्याची सारी जबाबदारी स्त्रियांनी पाहायची आणि पुरुषांनी पैसा कमवायचा, घरासाठी लागेल ती आर्थिक गरज पुरवायची, बाहेरची •आणि खास पुरुषांची म्हणवली जाणारी 'मर्दानी' कामं करायची, अशी कामांची वाटणी ठरलेली होती. यात फारसा बदल दिसत नव्हता. दोघांपैकी कोणाच्याही कामात बदल झाला, तर 'नावं' ठेवली जायची. पण अलीकडच्या काळात हे सारंच समीकरण बदललं. घरात पती आणि पत्नी दोघांनाही जबाबदाऱ्या उचलणं भाग पडलं. वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी, स्वयंपूर्ण' होण्यासाठी स्त्रियांना उंबरठ्याबाहेर पाऊल ठेवावं लागलं, तर पुरुषांनाही 'बायकी' म्हणवली जाणारी कामं स्वतःहून करण्याशिवाय गत्यंतर उरलं नाही.
पुरुषांमधला हा बदल विशेषतः अनिच्छेनंच असला तरी त्यांना त्याशिवाय तरणोपाय नव्हता. स्त्रियांनी घराबाहेर पडून पैसा कमावणं आणि घरची सारी जबाबदारी पुरुषांनी पाहणं असं अलीकडे घडू लागलंय. पण तरीही जगभर आजही घराची जबाबदारी मुख्यत्वे स्त्रियांवरच आहे. किंबहुना घरची आणि बाहेरची अशा दोन्ही जबाबदाऱ्यांचं ओझं खूप मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर पडलं आहे.
अमेरिकेत मात्र या पारंपरिक चित्राला आता छेद मिळताना दिसतो आहे. स्त्रिया घराबाहेर पडून नोकरी करताहेत, पैसा कमावताहेत, आर्थिक जबाबदारीचं ओझं त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलं आहे, तर पुरुष घरी राहून मुलांना सांभाळताहेत, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेताहेत, स्वयंपाकपाणी, धुणी-भांडी, साफसफाई, सामानाची आवराआवर करताहेत आणि घरात राहून जी जी कामं करावी लागतात, ती सारी कामं आता त्यांच्याकडे आली आहेत! अलीकडच्या काळातला हा सर्वांत मोठा बदल आहे आणि या बदलाचं समाजशास्त्रज्ञांनीही स्वागत केलं आहे. अर्थात स्त्रियांच्या कामांत जी सफाई, जी अचूकता, जो 'प्रामाणिकपणा' दिसायचा, तो पुरुषांच्या कामात नक्कीच नाही.
अमेरिकेत यासंदर्भात नुकताच एक मोठा अभ्यास करण्यात आला. प्यू रिसर्च'नं केलेल्या या संशोधनात तब्बल ३० वर्षांपेक्षा जास्त कालावधीचा आणि या काळातील पुरुष, स्त्रियांच्या भूमिकेत कसकसा बदल होत गेला, याचा अभ्यास केला गेला. त्यातून त्यांच्या हाती आलेली निरीक्षणं विलक्षण आहेत. अमेरिकेत घरी राहणाऱ्या महिलांची संख्या कमी झाली आहे, तर नोकरी सोडून किंवा नोकरी न करता घरीच राहणाऱ्या पुरुषांची संख्या वाढली आहे. आपापसांत सहमतीनं अनेक जोडप्यांनी हा निर्णय घेतला आहे. महिलांना नोकरी मिळण्याचं प्रमाण, त्यांचा पगार, त्यांच्या कामाच्या तडफेमुळे आणि जीव लावून काम केल्यामुळे नोकरीत मिळणारं प्रमोशन. या सर्व गोष्टींचा विचार करता, पुरुषांचा 'पुरुषार्थ' तसा कमीच पडला. या आघाडीवर आपली डाळ फारशी शिजणार नाही, हे लक्षात आल्यावर पुरुषांनी घरी राहण्याचा निर्णय घेतला, तर महिलांनी घराबाहेर पडून आर्थिक जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.
१९८९ ते २०२१ या काळातील अमेरिकेतील स्त्री-पुरुषांचा अभ्यास या संशोधनात करण्यात आला. या दरम्यान नोकरी न करता घरात राहणाऱ्या पुरुषांची संख्या हळूहळू वाढत गेली, तर केवळ घर सांभाळणाऱ्या महिलांची संख्या कमी झाली. पण इथेही महिलांनीच बाजी मारली आणि त्यांनी आपल्यातला झपाटा, प्रामाणिकपणा, जिद्द दाखवून दिली. महिला घराबाहेर पडल्या म्हणजे त्यांचं घरकाम पूर्णपणे सुटतं असं कधीच होत नाही. पण, घरासाठी घराबाहेर पडून पैसा कमावणाऱ्या महिलांच्या संख्येत तब्बल २८ टक्क्यांनी वाढ झाली, तर घरात बसून धुणी-भांडी, स्वयंपाक आणि मुलांची जबाबदारी घेणाऱ्या पुरुषांच्या संख्येत केवळ चार ते सात टक्के वाढ झाली!
'निकम्मे, बेकार पुरुष घरी!
पुरुषांनी नोकरीऐवजी 'घरकामाची जबाबदारी का स्वीकारली, याची कारणंही अतिशय महत्त्वाची आहेत. जे पुरुष घराची जबाबदारी सांभाळत होते त्यातील १३ टक्के पुरुष बेरोजगार आहेत. 'क्षमता नसल्यानं त्यांना नोकरी मिळत नाही. ३४ टक्के पुरुष आजारपणामुळे बाहेर जाऊन पैसा कमावण्यात असमर्थ आहेत. १३ टक्के 'रिटायर' आहेत. आठ टक्के पुरुषांनी शिक्षणच इतकं जेमतेम घेतलंय, की त्यांना 'ओझी वाहण्याशिवाय गत्यंतर नाही आणि त्याचा पैसा तरी कितीसा मिळणार? केवळ २३ टक्के पुरुष असे आहेत, ज्यांनी आपल्या कुटुंबाच्या देखभालीसाठीच घरी राहण्याचा निर्णय घेतलाय !