अहमदनगर- पुणे ही दोन शहरे इंटरसिटी एक्स्प्रेसने जोडावी या मागणीने अहमदनगर शहरात सध्या जोर धरला आहे. तशी ही मागणी जुनी आहे. पण, सध्या महाराष्ट्राचे सुरेश प्रभू हे रेल्वेमंत्री असल्याने नगरकरांना अपेक्षा आहेत. पुणे व नगरंच नाही तर मराठवाडा व विदर्भाचाही या मागणीत फायदा असल्याने राज्य व केंद्र या दोघांनीही या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. खुद्द पुणे शहराचाही या पर्यायात मोठा फायदा आहे. रेल्वे तसेच महामार्ग या दोन्ही नकाशांवर अहमदनगर हे मध्यवर्ती शहर आहे. मराठवाडा व विदर्भाचे हे एकप्रकारे प्रवेशद्वार आहे. पुण्याहून विदर्भ व मराठवाड्यात जाताना व्हाया नगरच जावे लागते. नगरला सध्या रेल्वे आहे. मात्र, हा मार्ग म्हणजे पुण्याहून पुणतांबा केल्याचा प्रकार आहे. म्हणजे पुण्याहून औरंगाबादला जायचे म्हटले तर पुणे-दौंड-नगर-मनमाड-औरंगाबाद असा दूरवरचा वेडावाकडा प्रवास करावा लागतो. त्यात अनेक तास वाया जातात. त्यामुळे नगर व औरंगाबादचे प्रवासी रेल्वेच्या नादी लागण्याऐवजी रस्ता वाहतुकीलाच प्राधान्य देतात. नगर-पुणे या दोन शहरांदरम्यान सध्या दररोज सुमारे साडेसातशे एस.टी. बसेस धावतात. ट्रॅव्हल, परराज्यातील बसेस, कार यामार्फत होणारी वाहतूक वेगळी. किमान पंधरा हजार लोक या मार्गावर दररोज प्रवास करतात, असा एक अंदाज आहे. ही सगळी वाहतूक शिक्रापूर ते पुणे या दरम्यान कोंडी करते. यात वेळ, पैसा, इंधन याचा प्रचंड अपव्यय होतो आहे. यास पुणे, नगर, औरंगाबादसह या मार्गाने जाणारे सर्वच प्रवासी वैतागले आहेत. या रस्ता वाहतुकीला रेल्वे हाच एक पर्याय दिसतो. पुणे-नगर हे अंतर बसने १२० तर रेल्वेने १६० किलोमीटर आहे. मात्र, रेल्वेचे अंतर व वेळ कमी करणे शक्य आहे. त्यासाठी पुण-नगर दरम्यानच्या दौंड स्टेशनला पर्याय द्यावा लागेल. पुण्याहून दौंडला रेल्वे आली की ती इंजिन बदलून नंतरच नगरचा रस्ता धरते. यात अर्धा तास वाया जातो. त्यामुळे पॅसेंजर गाडीला नगरला पोहोचायला साडेचार तास, तर मेल गाडीला साडेतीन तास लागतात. पुण्यातून मराठवाडा, विदर्भ व दिल्लीकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांना या दिव्यातून जावेच लागते. त्यासाठी दौंडच्या अलीकडे केडगाव ते काष्टी या दोन गावांदरम्यान आठ किलोमीटरची पर्यायी लाईन टाकली तर दौंडलाच फाटा मिळेल. रेल्वेचे इंजिन बदलण्याचा ताण वाचेल. हे काम मंजूर आहे. ते वेगाने होण्याची गरज आहे. नगरचे खासदार दिलीप गांधी यांनी या संदर्भात नुकतीच रेल्वेमंत्र्यांची भेटही घेतली आहे. हा नवीन मार्ग झाल्यास नगर-पुणे हा प्रवास अडीच तासांवर येईल. पुणे-मनमाड हा रेल्वे मार्ग दुपदरी झाल्यास ही वाहतूक आणखी वेगवान होईल. सध्या नगर-पुणे अशी स्वतंत्र रेल्वेगाडी नाही. लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस किंवा पॅसेंजर यांनी प्रवास करावा लागतो. त्यात आरक्षणाची व जागेचीही अडचण असते. त्यासाठी पुणे-सोलापूर या धर्तीवर ‘नगर-पुणे’ ही इंटरसिटी धावली, तर रस्त्यावरील प्रवासी रेल्वेकडे वळतील. या सेवेमुळे पुणे- नगर ही शहरे थेट जोडली जातील. नगरहून रोजगारासाठी पुण्यात स्थलांतरित झालेल्यांना तो मोठा दिलासा ठरेल. औरंगाबादकरांनाही या सेवेचा नगरपर्यंत का होईना लाभ घेता येईल. पुणे शहरात आता मेट्रो येणार आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरांच्या तुलनेत मध्यवर्ती असलेले नगर मात्र मागे पडले. नगरला अद्याप विमानतळ नाही. शिर्डीजवळील विमानतळ लवकरच कार्यान्वित होईल. पण, जिल्ह्याच्या मुख्यालयी विमानतळ नाही. निदान पुणे-नगर अशी रेल्वेसेवा मिळाली तर या शहराला वेग येईल. नगरहून मनमाडऐवजी नेवासा फाटामार्गे औरंगाबादला थेट रेल्वे न्या, अशीही मागणी आहे. पुण्याला मेट्रो देताना शेजारील शहरांचाही विचार करावा लागेल. - सुधीर लंके
पुण्यात मेट्रो, नगरला इंटरसिटी
By admin | Published: December 22, 2016 12:09 AM