राजू नायक
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला दिलेला पाठिंबा राजकीयदृष्ट्या चूक तर आहेच, शिवाय ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असाच म्हणावा लागेल.
मगोपला या निवडणुकीत भाजपाला धडा शिकवायचा आहे. सरकारमधून मगोपचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांना दिलेला डच्चू व मगोपच्या दोन आमदारांचा भाजपा प्रवेश हा वार ढवळीकर बंधूंच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे शिरोडा विधानसभा पोटनिवडणुकीत सारी शक्ती पणाला लावत लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत भाजपाला अडचणीत आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
गोव्यात लोकसभेबरोबरच तीन ठिकाणी विधानसभा पोटनिवडणुका होत असून तेथे पराभव झाल्यास काँग्रेसचे सरकार आणायचे, असा ढवळीकर यांचा प्रयत्न आहे. शिरोडा येथे प्रचारादरम्यान ते कार्यकर्त्यांना सांगतात की, या निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल व काँग्रेसचे सरकार येण्याचा मार्ग खुला होईल. तसे घडले तर आम्ही दोघे भाऊ मंत्री होऊ व लोकांना नोकऱ्या देऊ!
मगोपच्या काँग्रेसला पाठिंबा देण्याच्या निर्णयाची वास्तवपूर्ण अंमलबजावणी कशी होईल, यासंदर्भात राजकीय निरीक्षकांसमोर प्रश्नचिन्ह आहे. कारण एक दक्षिण गोव्यातील मडकई मतदारसंघ सोडला तर मगोपचे इतर ठिकाणी फारसे प्राबल्य नाही. प्रियोळ मतदारसंघातील त्या पक्षाचे कार्यकर्ते सध्या शिरोडय़ात तळ ठोकून आहेत. तोच मतदारसंघ त्यांनी प्रतिष्ठेचा बनविल्यामुळे सारी शक्ती तेथेच केंद्रित झालेली आहे. उत्तर गोव्यात डिचोली मतदारसंघात नरेश सावळ मगोपसाठी प्रचार करताना दिसतात.
निरीक्षक मानतात की मगोपचे मतदार अनेक मतदारसंघांमध्ये जरूर आहेत; परंतु मगोपचे उमेदवार असतील तेथेच ते पक्षनिष्ठा दाखवतील. इतर ठिकाणी काँग्रेसपेक्षा त्यांना भाजपा निकट आहे. मगोपचा मतदार कॉँग्रेस पक्षाला कधीही स्वेच्छेने मतदान करणार नाही, शिवाय तो बराचसा हिंदुत्ववादी असल्याने नरेंद्र मोदी व भाजपाचे त्याला आकर्षण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मगो पक्षाने कधीच पक्षसंघटना जोपासली नाही. त्यामुळे त्यांचे अनेक जुने हाडाचे कार्यकर्ते भाजपात दाखल झाले आहेत. त्यांचे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांशी नेहमीच पारंपरिक वैर राहिले आहे. त्यामुळे ते काँग्रेस पक्षाला मतदान करण्याची शक्यता कमीच आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे निवडणूक निधीचा. मगोपने सारी आर्थिक ताकद शिरोडय़ात लावली असून लोकसभेसाठी पैसे खर्च करण्यात मगोप नेते हात आखडता घेत असल्याचे कार्यकर्ते सांगतात. या निर्णयामुळे भाजपा पक्षसंघटनाही सावध झाली असून मगोप नेत्यांना उघडे पाडण्याचे अस्र ते आता प्रत्यक्षात बाहेर काढतील, असे सांगण्यात आले. गोव्याचे राजकारण स्वार्थी मगोपच्या नेत्यांनी नेहमीच नासविले व आताही वैयक्तिक स्वार्थासाठी ते भाजपापासून दूर होत असल्याची टीका भाजपा नेत्यांनी केली आहे. या निर्णयामुळे केंद्रीय भाजपा नेतेही मगोप नेतृत्वावर नाराज झाले आहेत.
(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत)