म्हाडाने अत्यल्प उत्पन्न गटासाठी मुंबईत ४०० घरे उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे़ याचे स्वागत करायला हवे़ कष्टकरी सर्वसामान्य, निम्म मध्यमवर्गीयांसाठी म्हाडाने केलेली ही चांगली सोय आहे़ मुंबईसारख्या शहरात राहण्यासाठी जितका खर्च करावा लागतो तितका कुठल्याही शहरात नसेल़ त्यामुळेच अनधिकृत झोपडपट्टयांचा विळखा या महानगराला बसला आहे़ गेल्या वर्षी काढण्यात आलेल्या घरांच्या लॉटरीत अत्यल्प गटासाठी एकही घर नव्हते़ त्यामुळे म्हाडावर मोठी टीका झाली होती़ आता म्हाडाने थेट ४०० घरे उपलब्ध केली आहेत़ मराठी माणूस, विशेषत: सर्वसामान्य माणसे मुंबईतून हद्दपार होत आहेत़ कारण येथे निर्माण होणारी घरे या सर्वसामान्याला परवडणारी राहिलेली नाहीत़ खासगी बांधकाम व्यावसायिकांद्वारे निर्माण होणारी घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात़ त्यांना परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी म्हाडाची निर्मिती झाली़ खासगी बांधकाम व्यावसायिकांशी स्पर्धा करताना, गेल्या काही वर्षांत म्हाडानेही घरांचे आकार वाढविले़ आकार वाढल्याने म्हाडाच्या घरांच्या किमतीही वाढल्या़ मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किमती खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या घरांच्या किमतीपेक्षा कमी असल्या, तरी त्या सर्वसामान्यांना परवडण्यासारख्या राहिलेल्या नाहीत़ गेल्या वर्षीच्या लॉटरीत लोअर परळ येथील म्हाडाचे घर सव्वाकोटी रुपयांचे होते़ त्यामुळे आता म्हाडाने सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे, या संस्थेला झोपेतून जाग आल्यासारखेच आहे़यातील ३०० घरे अँटॉप हिल परिसरात असणार आहेत़ मुंबईतील कामगार वर्ग लालबाग, परळप्रमाणे वडाळा व अँटॉप हिल परिसरातही काही प्रमाणात होता़ म्हाडाने गिरणी कामगारांसाठी घरे बांधली़ मात्र, काही गिरणी कामगारांनी ही घरे विकली, तर काही जण ही घरे भाड्याने देऊन मुंबईबाहेर राहण्यासाठी गेले़ पुन्हा अशी चूक होणार नाही, याची काळजी म्हाडाने घ्यायला हवी़ बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना नायगांव, वरळी, शिवडी व ना़ म़ जोशी मार्ग येथे म्हाडा सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करणार आहे़ ही घरे उपलब्ध करताना म्हाडाने अत्यल्प उत्पन्न गटाचाही विचार करायला हवा़ या परिसरात अत्यल्प उत्पन्न गटासाठी अधिक घरे उपलब्ध बांधायला हवीत़ ही घरे घेणारे तेथेच राहतील़, हे घर भाड्याने देणार नाहीत किंवा त्याची विक्री करणार नाहीत, याचीही तरतूद म्हाडाने करायला हवी़ मुंबई कष्टकऱ्यांची आहे़ हातावर पोट असणारे हे झोपडपट्टीत किंवा चाळीत राहतात़ पायाभूत सुविधा कशाही मिळोत, त्यात आयुष्य जगत असतात़ अशा सर्वसामान्यांचा विचार यापुढे म्हाडाने करायला हवा़
म्हाडाचे स्वागतार्ह पाऊल़
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 4:49 AM