शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

चन्यामन्या बोरं, चिक्की आणि सत्तर वर्षांपूर्वीची 'मधली सुट्टी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2023 8:50 AM

पोषण आहारात खिचडी द्यावी की पराठे, हे रांधायचे कोणी, वाढायचे कोणी, असले गोंधळ आमच्या लहानपणी नव्हते! होते ते आरेचे दूध, चिक्की आणि मज्जा!

- मोहन गद्रे, मुंबई.

शालेय शिक्षण या विषयात मध्यान्ह भोजन, पोषण आहार, सकस आहार, तो शिजवायचा कोणी, वाढायचा कोणी, त्याचा हिशेब कसा ठेवायचा? याचे गोंधळ, त्यातला भ्रष्टाचार, मग चौकशी समिती, तिचा अहवाल, भांडाफोड आणि ब्रेकिंग न्यूज, मग जबाबदार व्यक्तीच्या निलंबनाची मागणी आणि निलंबन वगैरे बातम्या वाचायला / ऐकायला येत नव्हत्या तो काळ. मुळात लोक समजूतदार आणि फारच सहनशील होते. स्वभावातच सहकार होता. त्यामुळे सुपंथ धरायला फार यातायात करावी लागत नव्हती. त्या काळातली ही आठवण....

साधारण १९५० ते ६०चा काळ, मुन्सिपाल्टीतर्फे (म्युनिसिपालटी नंतर म्हणू लागलो आम्हा शाळकरी विद्यार्थ्यांना मधल्या सुटीत आरेच्या बाटलीतील मस्त दूध, दूध नसलं तर शेंगदाण्याची पुडी किंवा मग शेंगदाणे, डाळ, खोबरं ह्याची चिक्की मिळायची... मध्ये मध्ये कधीतरी केळं, संत्र, चिक्कू, वगैरे एखादं फळ दिलं जायचं. आरे कॉलनीचा पिवळसर रंगाचा मोठा ट्रक आवाज करत शाळेबाहेर येऊन थांबायचा. त्यातून धडाधडा क्रेट उतरविण्याचा आवाज यायचा. त्या आवाजावरून वर्गात खिडकीजवळ बसलेल्या मुलाला आज खाऊ काय आलाय ते कळायचं... मग तिथून ती वर्गावर्गात कळायची!

मधल्या सुटीची घंटा झाली की, हेडमास्तरांच्या खोलीच्या बाजूला व्हरांड्यात हे दूध, चिक्की वगैरे वाटपाचं काम चालायचं. दुधाची काचेची लहानशी बाटली हातात पडली की त्यावरचं पातळ चांदीसारखं बूच अलगद काढायचं, त्याला आतून लागलेली मलई जिभेने चाटून मटकवायची ती गोइस स्निग्धपणाची चव जिभेवर घोळत असतानाच ते थंडगार दूध बाटलीला डायरेक्ट तोंड लावत गटगटा पिऊन टाकायचं! काही मुलं कंपासमधल्या करकटकाने बुचाला बारीक भोक पाडून, तोंड वर करून दुधाची धार बरोबर तोंडात सोडत!

ज्या शिक्षकांकडे वाटपाची जबाबदारी असे ते शिक्षक संत्री, चिक्कू, चिक्की, शेंगदाणे, केळी ह्याचा हिशेब कसा काय लावत हे त्याचं त्यांना माहीत. पण तक्रार करायला जागाच नसायची. मुळात, कोणाची कसलीही कोणाहीबद्दल तक्रार नसायचीच. विद्यार्थ्यांना धष्टपुष्ट करण्यासाठी त्यांना खाऊपिऊ घालून मुन्सिपाल्टी आपलं कर्तव्य पार पाडायचीच; पण शाळेबाहेरसुद्धा कितीतरी मंडळी विद्यार्थ्यासाठी अत्यंत अल्प दरात नाना प्रकारचे खाद्यपदार्थ घेऊन मधल्या सुटीची घंटा ऐकताच पुढे सरसावून तय्यार असायची!

टोपलीत बारक्या रुद्राक्षाच्या आकाराची चणीया मणीया लालबुंद बोरं मीठाचं खारट पाणी अंगभर लावून लहानशा ढिगात चमचमत असायची. बाजूलाच चिंचेचे आकडे अंगाला बाक देऊन असायचे. त्याच्या शेजारी हिरवे बडीशेपेचे झुबके, बाकदार विलायती चिंचांचा वाटा असायचा, पोपटी रंगाचे चार धारी, आंबट अंबाडे असायचे! मोठ्या पसरट जर्मनच्या थाळ्यात पिवळी कडक गुडदाणीवाला हातातल्या धातूच्या जुन्या पिस्टनने पैशा दोन पैशाची गुडदाणी तोडून कागदात बांधून द्यायचा. खाकी, निळ्या पॅन्टच्या खिशाच्या खोल कोपऱ्यात किंवा मुलींच्या रुमालात दोन-तीन गाठीत अडकलेली चवली पावली हा असला नानाविध चविष्ट पदार्थांचा खायसोहळा पार पाडण्यासाठी अगदी पुरेशी व्हायची!

आम्ही शाळकरी वयात चौरस आहाराचे महत्त्व जाणून होतो. परीक्षेत त्याचं महत्त्व आमच्या पुस्तकात दिलेलं होतं तसंच लिहून मार्कसुद्धा मिळायचे. पण प्रत्यक्षात आमचं खाणं नुसतंच चौरस आहार स्वरूपाचं नव्हतं; तर चांगलं औरस-चौरस असं होतं मधल्या सुटीत चिक्कीसह अनेक पदार्थांचा आस्वाद आम्ही भरपेट आणि बिनधास्त घ्यायचो. एखादा आणा खिशात उद्यासाठी शाबूत ठेवून हा किरकोळ खर्च भागत असे! त्या शाळकरी वयात (आताची) महापालिका आणि शाळेच्या दाराबाहेरच्या असंख्य अनामिक खाद्य विक्रेत्यांनी भरण पोषण केल्यामुळेच की काय, पिझ्झा, पास्ता, बर्गरच्या दुनियेत अजूनही कणखरपणे वयाच्या अखेरच्या टप्प्यात, आनंदाने वाटचाल करतो आहोत, असं वाटतं खरं।

gadrekaka@gmail.com

 

टॅग्स :Schoolशाळा