- धर्मराज हल्लाळे
दक्षिणेतील स्वामी नित्यानंद यांनी अफलातून दावा केला आहे. एका सॉफ्टवेअरद्वारे गाय आणि माकडांना संस्कृत, तामिळ भाषा बोलायला ते शिकवणार आहेत. म्हणजे मुकी बिचारी कोणीही हाका, हे मुक्या म्हटल्या जाणाऱ्या प्राण्यांबाबत यापुढे म्हणता येणार नाही. ते बोलतील. तेही संस्कृतमध्ये. बरे झाले लोकभावना सरकारला नाही कळली तर प्राणिभावना कळेल. ते त्यांच्यावरील अन्याय, अत्याचाराचे कथन स्वतःच करतील. न्यायालयात त्यांची साक्ष होईल. खरंच काय काय घडेल! हे सगळं अगदी काल्पनिक निबंधासारखं आहे. नाही म्हणायला मराठीत अगं बाई अरेच्या, हा चित्रपट येऊन गेला. ज्यात नायकाला महिलांच्या मनातलं व शेवटी प्राण्यांच्या मनातलं बोललेलं ऐकू येत. तशी काही काल्पनिक कथा नित्यानंद यांची असेल तर रंजन म्हणून वाचून सोडून देता येईल. परंतु ऐकल ते नवलच. त्यांनी चक्क सॉफ्टवेअर शोधाचा दाखला दिला, हा मोठा विनोद आहे. विज्ञानाच्या कसोटीवर हा दावा टिकणारा नाही, हे सत्य कळूनही कथित स्वामी, महाराजांच्या चमत्कारावर विश्वास ठेवणारे हजारो लोक आहेत. इतकेच नव्हे तर कडवे समर्थक आहेत. त्यांचे भक्तगण भक्तीमार्ग विसरुन कोणत्याही क्षणी हिंसेचा मार्गही अवलंबू शकतात. शेवटी तर्क मांडणारी व्यक्ती प्रश्न विचारते, जर गाय, माकड हे प्राणी संस्कृत आणि तामिळ बोलू शकतील तर ज्यांना जन्मत: बोलता येत नाही, अशा मूकबधीर बांधवांना स्वामींनी बोलते करावे. त्यांना नैसर्गिक न्याय मिळेल.या देशात कोट्यवधी लोक व्यंग घेवून जन्माला येतात. अत्यंत खडतर आयुष्य त्यांच्या वाट्याला येते. कित्येकदा अपंग मुलाचा सांभाळ करणेही आई-वडिलांच्या आवाक्याबाहेर असते. बोलू न शकणाऱ्या आपल्या मुलाने अथवा मुलीने इतरांसारखे बोलावे, यासाठी आई-वडील रुग्णालयांच्या पायऱ्या झिजवतात. काही मुले शास्त्रशुद्घ स्पीच थेअरपीद्वारे हळूहळू बोलायला शिकतात. मात्र, कित्येकांचे व्यंग आजन्म राहते. विज्ञान कायम सत्याचा शोध घेते. त्याला प्रयोगाचा आधार राहतो. वैद्यकीय क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाने अनेकांचे आयुष्य सुसह्य केले आहे. मात्र, काही ठिकाणी मर्यादा येतात. त्याचाच फायदा घेणारे भोंदूबाबा चमत्काराचे दावे करतात. असाध्य आजार दुरुस्त केल्याचे सांगतात. त्यांना आव्हान दिले की, मात्र पळ काढतात. परंतु, भोंदूबाबांचे ठरलेले असते ‘यँहा नही तो और सही...इस दुनिया में बेवकुफोंकी कमी नही..’ एकंदर एखाद्या ठिकाणी भांडाफोड झाला की, नवे ठिकाण शोधायचे. तिथे लोकांना फसवायचे हा उद्योग कायम सुरु असतो.
स्वामी नित्यानंद हे दक्षिणेतील बहुचर्चित महाराज आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. आता त्यांचे अद्भूत स्पीच थेअरपी सॉफ्टवेअर चर्चेत आले आहे. त्यांच्या दाव्याप्रमाणे एखादी गाय व माकड संस्कृत बोलू लागले तर हा चमत्कार म्हणावा लागेल. त्याला महाराष्ट्र अंधश्रद्घा निर्मूलन समिती नक्कीच आव्हान देईल. ‘चमत्कार करा आणि 21 लाख मिळवा’ हे अंधश्रद्घा निर्मूलन चळवळीचे जाहीर आव्हान आहे. त्याची एक प्रक्रिया आहे. परंतु, आजतागायत एकाही चमत्कारी पुरुषाने हे आव्हान तडीस नेले नाही. महाराष्ट्रात संत, समाज सुधारकांची थोर परंपरा आहे. अनेकांनी धर्मविचारांची वेळोवेळी चिकित्सा केली आहे. कथित चमत्कार करणाऱ्यांना संतांनीही फटकारले आहे. अलिकडच्या काळात राज्यातील आणि राज्याबाहेरील काही महाराजांचे जाळे देशाबरोबर महाराष्ट्रात विस्तारले आहे. त्यात धर्म-श्रद्घा उपासना पद्घतीच्या प्रचार, प्रसाराबद्दल कोणाला आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु, चमत्काराचे दावे करणारे महाराजही अनेकांची श्रद्धास्थाने बनली आहेत. असा एखादा वर्ग उद्या नित्यानंदांच्या कथित दाव्यावरही विश्वास ठेवून जागोजागी गर्दी करुन उभा राहिला तर नवल वाटू नये. ज्यांना हे पटत नाही, ज्यांची विवेक बुद्धी चमत्कारांना स्वीकारत नाही, त्यांनी प्रश्न विचारणे सोडू नये. आपल्या अवती-भोवतीच्या लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणाऱ्यांना चाप लावणे हे सुजाण लोकांचे कर्तव्य आहे.