दूध का दूध...पानी का भी दूध !

By सचिन जवळकोटे | Published: September 6, 2020 06:51 AM2020-09-06T06:51:00+5:302020-09-06T09:07:43+5:30

लगाव बत्ती..

Milk of milk ... milk of water too! | दूध का दूध...पानी का भी दूध !

दूध का दूध...पानी का भी दूध !

googlenewsNext

- सचिन जवळकोटे

‘पक्षनिष्ठेपेक्षा व्यक्तिस्तोम अधिक महत्त्वाचं’ समजल्या जाणाºया सोलापूर जिल्ह्यात सध्या कैक राजकीय नेत्यांचा भलताच वैचारिक गोंधळ निर्माण झालेला. आपापल्या सोयीनुसार वेगवेगळे पक्ष वापरण्याची चटक इथल्या नेत्यांना लागलेली. मात्र स्वत:ची कट्टर भूमिका बदलून सत्तेवर आलेल्या ‘ट्रिपल सरकार’मुळं या नेत्यांची गोची झालेली. ‘कोण कुठल्या पार्टीत ?’ याचा शोध अद्याप वर्षभरात लागलेला नसतानाच ‘कोणती पार्टी कुणासोबत ?’ हा नवा गहन प्रश्न कार्यकर्त्यांसमोर उभा ठाकलेला.

कुमठे ते बारामती.. एवढंच राहिलं होतं बघायचं !

आता आपल्या कुमठ्याच्या ‘दिलीपरावां’चंच उदाहरण घ्या नां. ते मूळचे ‘हात’वाले. मार्केट यार्डात ‘कमळ’वाल्या ‘देशमुखां’बरोबर दोस्ताना करून चेअरमनही झालेले. मध्यंतरी निवडणुकीत ऐनवेळी ‘बाण’ घेऊन ‘हात’वाल्या ‘प्रणितीताईं’च्या विरोधात उभारलेले. आता ‘घड्याळ’वाल्या ‘दादा बारामतीकरां’चा रिमोट वापरून ‘दूध संघा’चे अध्यक्ष बनलेले. एखादा नेता एकाच वेळी किती अगम्य अन् अचाट प्रयोग करू शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपले ‘दिलीपराव’.

खरंतर, ‘दिलीपरावां’ची निवड ही तशी नैसर्गिक नव्हती. प्रत्येकाच्या राजकीय फायद्याची समीकरणं यात लपलेली. काहींची अपरिहार्यताही कारणीभूत ठरलेली. या निवडीला अनेकांचा आतून विरोध होता. ब-याच वर्षांनंतर ‘घड्याळ’वाल्यांच्या ताब्यात येऊ पाहणारी ही ‘दुभती गाय’ एका ‘हात-बाण’वाल्याच्या हातात सोपविताना ‘अजितदादां’नी म्हणे खूप पुढचा विचार केलेला. गेल्या वर्षी ‘मोहोळ-उत्तर’मध्ये त्यांचा ‘इंदापूरकर’ माणूस ‘यशवंत’ करण्यात याच ‘कुमठेकरां’चा हातभार लागला. तेही जुनं देणं फेडायचं होतं. भविष्यात सोलापूर शहरातही त्यांच्यासारखा खमक्या नेता ‘हातात घड्याळ’ बांधून मिळत असेल तर तोही ‘दादां’ना हवा होता. दुसरीकडं ‘अनगरकरां’चीही गणितं वेगळी होती. ‘पंढरी’तल्या ‘पंतांच्या वाड्या’सोबत ‘संजयमामां’ची असलेली जवळीक त्यांनाही नको होती. त्यामुळं ‘निमगावकरां’पेक्षा ‘कुमठेकर’ परवडले या मानसिकतेत ते आलेले.

करमाळ्याच्या ‘राजेंद्रसिंहां’चाही विचार तसा ‘दादां’नी केलेला. मात्र कधी काळी दशकापूर्वीचे त्यांचे ‘अकलूजकरां’शी असलेले जुने संबंध पुन्हा एकदा उकरून अशा पद्धतीनं ‘बारामती’त सादर केले गेले की, त्या नावावर झटक्यात फुली मारून ‘दादां’नी अखेर ‘दिलीपरावां’चं नाव फायनल केलेलं. खरंतर, अस्सल फायद्यातल्या मार्केट कमिटीचा नाद सोडून ‘दिलीपराव’ या तोट्यातल्या दुधाकडं का वळाले, हाही कार्यकर्त्यांसाठी संशोधनाचा विषय. असो. खुर्चीवर बसल्यावर त्यांनी जाहीर शब्द दिला की, ‘ही संस्था अडचणीतून बाहेर काढू’. नवीन अध्यक्ष तसे ‘शब्दाला जागणारे नेते’ (म्हणे). त्यामुळं ते नक्कीच संघाला तोट्यातून बाहेर काढतील, मात्र मुंबईची जागा नाही विकली अन् पंढरपूरची जागा बँकेला तारण नाही ठेवली म्हणजे मिळविली.

कार्यकर्त्यांमध्ये एक कुजबुज !

जाता-जाता : ‘बळीरामकाकां’च्या लाडक्या पुत्राला मार्केट कमिटीचं चेअरमनपद मिळवून देण्याच्या बदल्यात म्हणे ‘दिलीपरावां’ना ‘दुधाची चरवी’ मिळालेली. मात्र जे स्वत: दुस-यांदा अध्यक्ष होऊ शकले नाहीत, ते कसं काय ‘जितेंद्ररावां’ना खुर्चीवर बसविणार.. तसंच यापूर्वीही दिलेल्या शब्दांचं काय, असाही गूढ प्रश्न वडाळा-मार्डीतल्या कार्यकर्त्यांना पडलेला. तरीही ‘वाड्यावरच्या देशमुखां’नी राजीनामा द्यावा, असा ‘ठरल्याप्रमाणे’ निरोप अधूनमधून ‘कुमठ्या’तून जातोय, हे मात्र निश्चित. लगाव बत्ती...

बार्शीतही एक ‘दिलीपराव’

‘कुमठ्या’चे ‘दिलीपराव’ सध्या जोरात असले तरी ‘बार्शी’चे ‘दिलीपराव’ तसे खूप निवांत दिसताहेत. नाही म्हणायला त्यांच्या ‘मिरगणें’ची ब्रेकिंग न्यूज भलतीच व्हायरल झालेली. खुद्द ‘बारामती’त ‘म्हाडा’चा मोठा प्रोजेक्ट टाकायला निघालेल्या ‘मिरगणें’ना ‘बारामतीकरां’नी पडवीतून थेट ओसरीवर पाठविलं. खरंतर त्यांनी दोन-तीन महिन्यांपूर्वीच ‘कमळ’ चिन्ह वापरायचं 
बंद करून टाकलं होतं. ‘मातोश्री’वर ‘नार्वेकरां’चा जसा वशिला लागतो, तसं त्यांनी ‘दादां’च्या पीएस्शी म्हणजे ‘अविनाश’शीही सलगी वाढविण्याचा प्रयत्न केलेला. मात्र झाले उलटेच. आता ‘पंत’ गेले, ‘दादा’ही गेले.. हाती ‘माजी’ पदाचे लेटरहेड आले.

 कुणी म्हणालं, ‘दिलीपरावां’नीच ही गेम केली. कुणी कुजबुजलं, बार्शीच्या मार्केट यार्डात ते पूर्वी ‘दोन डोकीं’साठी (खोकी नव्हे!) नडले म्हणून ‘राजाभाऊं’नीच परस्पर काटा काढला. या चर्चेवरून एक लक्षात आलं की, सत्ताधा-यांकडं कुणाचा होल्ड अधिक, यावर बार्शीकरांमध्ये नेहमीच बेट लावली जाते. खरंतर एकेकाळी ‘देवेंद्रपंतां’च्या अत्यंत जवळचे म्हणून ओळखल्या जाणा-या ‘राजाभाऊं’ची अलीकडेच काही ‘घड्याळ’वाल्या नेत्यांशीही चर्चा झालेली. या नेत्यांनी  म्हणे चक्क ‘बाण’ हातात घेण्याचा सल्ला दिलेला. कार्यकर्त्यांचा आग्रह (!) वाढला तर कदाचित तशी भूमिकाही घेतली जाऊ शकते. मात्र अलीकडच्याच आंदोलनात ‘उद्धों’च्या फोटोला दूध घालतानाची क्लिप म्हणे खासकरून ‘नार्वेकरां’ना पाठविली गेलेली. त्यावरून ‘मातोश्री’वरही भडका उडालेला.
राहता राहिला विषय ‘दिलीपरावां’चा. ते मूळचे वकील. ते ‘तारीख’ घेतील ‘मातोश्री’वरची. मात्र जाता-जाता ‘आॅर्ग्युमेंट’ करतील ‘बारामती’त. तशातच ‘दादा बारामतीकरां’चा त्यांच्यावर खूप लोभ. काय सांगावं, भविष्यात ‘दादां’नी बार्शीतला ‘आर्यन’ कारखाना विकत घेतला तरी आश्चर्य वाटायला नको. लगाव बत्ती..

(लेखक 'लोकमत सोलापूर'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Milk of milk ... milk of water too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.