किरण अग्रवाल
काळ बदलतो आहे तसे पारंपरिक वा बुरसटलेले विचारही बदलत आहेत हे खरे, परंतु काही बाबतीत अजूनही समाजमनातील विशिष्ट धारणांची पुटे दूर होताना दिसत नाहीत. वंशाचा दिवा म्हणून पुत्रप्राप्तीची इच्छा बाळगणाऱ्या व तसे न झाल्यास कन्या व तिच्या मातेचाही तिरस्कार करणा-या महाभागांची गणना अशात करता यावी. कन्या जन्माच्या स्वागताचे सोहळे एकीकडे साजरे होऊ लागले असताना, दुसरीकडे कन्या जन्माला आल्याच्या नाखुशीतून तिला व तिच्या आईला रुग्णालयातून घरी नेण्यास नकार देण्याचा जो प्रकार अंबरनाथमध्ये पुढे आल्याचे पाहावसास मिळाले, त्यातूनही या संबंधीची अप्रागतिकताच स्पष्ट व्हावी.
महिला आज कुठल्याही क्षेत्रात मागे नाहीत, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करीत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. स्त्री-पुरुष समानता ब-यापैकी आकारास आली आहे. विशेषत: शाळाशाळांमधून मुलगा-मुलगी एकसमान म्हणून जनजागरण होत असल्याने त्याचाही समाजमनावर चांगला परिणाम होत आहे. अनेक गावांमध्ये तर शाळांच्या पुढाकाराने घरातील दारांवर मुलीच्या नावाच्या पाट्या लावल्या गेल्या आहेत. शासनही आपल्या स्तरावर ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’सारखे उपक्रम योजून यासंबंधीच्या जाणीव जागृतीत कुठलीही कसर न राहू देण्याचा प्रयत्न करीत आहे. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून महिलांबद्दलच्या आदर-सन्मानात नक्कीच वाढ झालेली दिसत आहे., याबद्दल शंका घेता येऊ नये; परंतु असे असले तरी अपवादात्मक का होईना, काही घटना अशाही घडून येताना दिसतात की, ज्यामुळे या संदर्भातील लक्ष्य पूर्णांशाने गाठले गेले नसल्याचेच म्हणता यावे. मुंबईतील अंबरनाथमध्ये घडलेली घटना तसेच परळीत काटेरी झुडपात टाकून दिल्या गेलेल्या कन्येचे प्रकरण त्यादृष्टीने प्रातिनिधिक व बोलके ठरावे.
अंबरनाथ तालुक्यातील कुशीबली गाव परिसरातील एका भगिनीला दुसरीही मुलगीच झाल्याने तिच्या पतीने व सासूने रुग्णालयातून तिला घरी नेण्यास टाळाटाळ केली, अखेर पोलिसांनी कानउघडणी केल्यावर त्या मातेला पोलीस बंदोबस्तात घरी सोडण्याची वेळ आली. तिकडे परळीत एका मातेने नवजात कन्येला काटेरी झुडपात टाकून पोबारा केल्याचा प्रकार समोर आला आहे. कोणत्या मानसिकतेतून हा प्रकार घडला असावा, हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होऊन मुलगी झाल्यावर तिला रुग्णालयातच सोडून पळ काढला गेल्याचे दोन-तीन प्रकारही अलीकडेच उघडकीस आले. अर्थात, उघडकीस न आलेल्या प्रकारातील ‘नकोशीं’ची घुसमट वा वास्तविकतेचा अंदाज यावरून बांधता यावा. कन्येला लक्ष्मीचे रूप मानले जाते. ‘धन की पेटी’ म्हणून संबोधिले जाते तसेच नवरात्रीत तिची पूजाही केली जाते; हे सारे खरे, परंतु मुलाऐवजी मुलीला वंशाचा दिवा मानण्याची मानसिकता काही कुटुंबात रुजू शकलेली नाही. परिणामी पहिल्या कन्या जन्माचे स्वागत केले जाऊन दुसरी वा तिसरीही कन्याच जन्मास आली तर अनिच्छेने तिचे पालन-पोषण, शिक्षण होते. ही मानसिकता बदलली जाणे गरजेचे आहे.
महत्त्वाचे म्हणजे, स्त्री-पुरुष जन्मदरातील तफावत हादेखील चिंतेचा विषय राहिला आहे. अशात वाढते शहरीकरण व ग्रामीण भागातील कुटुंबांचे नोकरी-व्यापारानिमित्तचे स्थलांतर पाहता ग्रामीण भागातील उपवर मुलांच्या लग्नाची समस्या अनेकांना भेडसावू लागली आहे. लग्नासाठी अधिकतर मुलींची पसंती शहरातील मुलांनाच असते. त्यामुळे खेड्यापाड्यातील उपवर मुलांनी मूकबधिर, विधवा, घटस्फोटिता मुलींशीही विवाहाची तयारी ठेवल्याची बाब एका वधू-वर मेळाव्यानिमित्त समोर आली आहे. यासंबंधीच्या सामाजिक दुखण्याचे वा समस्येचे अनेकविध पदर असले तरी, त्यातून मुलींबद्दलच्या आदर-सन्मानाची भावना गहिरी होण्यास मदतच घडून येते आहे. ‘बेटी नही, तो बहू कहॉँ से लाओगे?’ अशी जाणीव-जागृती यासंदर्भात केली जात असते. तेव्हा, स्त्री-पुरुष समानतेचे केवळ सुस्कारे न सोडता अद्यापही मुलालाच वंशाचा दिवा मानण्याचे जे अप्रागतिक विचार काहींच्या मनात रुजून आहेत ते कसे दूर करता येतील याकडे समाजसेवींनी लक्ष देणे गरजेचे आहे. उत्सवी अगर प्रदर्शनी सोहळ्यांऐवजी व्यक्ती-व्यक्तीच्या मनाच्या मशागतीतूनच ते शक्य आहे, एवढेच या निमित्ताने.