- डॉ. गोविंद काळेमनाचा खेळ कळत नाही़ ते वर्तमानामध्ये रमतच नाही़ भूतकाळातील गोष्टी आठवते तर कधी भविष्याचाच अहोरात्र विचार करते़ त्याला लगाम घालता येत नाही नि वठणीवरही आणता येत नाही़ मनासारखे नाही झाले तर तक्रार करायची तरी कोणाकडे? मनाची गुंतागुंत अनाकलनीय आहे हेच खरे़ आपले सगळे तत्त्वज्ञान, साहित्य, धर्मग्रंथ मनाचाच शोध घेते आहे़ मग ते पातंजल योगदर्शन असो, उपनिषदे असोत अथवा भगवद्गीता असो़ ‘मन एव कारणम् बन्धन मोक्षयो:’ मुक्तीला आणि बंधनाला मनच कारणीभूत आहे़ बघा! अनुभवा! मनाची ताकद़ ते दिसत नाही, सापडत नाही पण आयुष्यभर देहाला आणि इंद्रियांना नाचवते हे मात्र खरे़ ‘मन: शिवसंकल्पम् अस्तु’ हे म्हणायला सोपे़ प्रत्यक्षात मन तर अशिवाचाच विचार करते़ नको नको ते मनी येते हाच साऱ्यांचा एकसुरी अनुभव़ कायिक, वाचिक पाप एकवेळ टाळता येईल़ पण मानसिक पापाचे काय? त्यालाही प्रायश्चित्त घ्यायला हवेच़ मन ताब्यात आले तर शिवसंकल्प होणाऱ संतांचा मनावरती पूर्ण ताबा होता़ ते मनाचे ऐकत नव्हते तर मनच त्यांना शरण आले होते़ मनच त्यांचे निमूटपणे ऐकत होते़ म्हणून तर त्यांच्या जीवनात अपार सुख नि समाधान भरून होते़ माऊलींनी मनाला मोगरा बनवून फुलविले ‘मोगरा फुलला मोगरा फु लला’ संकल्प करताना तो काया-वाचा-मने करावा लागतो़ कायेने कार्य करायचे, वाणीने उच्चारायचे आणि मनाने सहभागी व्हायचे़ तरच तो संकल्प़ ज्यात मन नाही ते कसले कार्य़ माऊलींच्या मनात मोगरा फु लला, भरून आला़ सरोवरात फु लणाऱ्या कमळापेक्षा आणि काश्मीरच्या गुलाबापेक्षाही ‘मोगरा’ मोठा़ माऊलीनी तो जवळ केला़ वर्षातून एकदा बहरणारा़ ‘मातीसंगे वास लागे’ हे फक्त मोगऱ्याचे बाबतीत खरे़ उन्हाळ्याच्या दिवसात माठात टाकलेली चार मोगरीची फुले माठातील पाणी सुगंधित करीत़ रुमालात ठेवलेली दोन फु ले सायंकाळपर्यंत रुमाल सुगंधित ठेवीत़ हा झाला लौकिक सुगंध़ माऊलींनी मोगऱ्याचा सुगंध अलौकिक केला़ मनाला मोगरा करून ईश्वरचरणी अर्पण करण्यासाठी उद्युक्त केले़ माझा मनरूपी मोगरा तुझे चरण सुगंधित करण्यासाठी आहे़ सृष्टीनिर्मात्या परमेश्वराशिवाय मोगऱ्याचे स्थान कोणते? मन परमेश्वरालाच अर्पण केले पाहिजे़ किती सुंदर कल्पना़ ‘मन हा मोगरा / अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसार/ येणे नाही’ मनासहित देह ईश्वरार्पण करायचा म्हणजे पुन्हा न परतण्यासाठी ‘जन्ममरण नको आता / नको येरझार’ हेच साकडे घालायचे़ येरझार थांबवताना आसमंत मात्र सुगंधित करायचा़
मन हे मोगरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 4:17 AM