बर्फाच्छादित जमिनीखाली तब्बल पस्तीस फूट आणि उणे पन्नास अंश तपमानात केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर सहा दिवसपर्यंत तग धरुन असलेला आणि साक्षात मृत्यूला पराभूत करणारा हणमंतप्पा कोपाड हा भारतीय लष्करातील जवान अत्याधुनिक औषधोपचारांच्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या विशेष देखरेखेखाली असताना मात्र मृत्यूने आपला डाव साधला आहे. भारताच्या उत्तरेकडील सीमेवर असलेल्या हिमालयाच्या कुशीतील सियाचेन या २१ हजार फूट उंचीवरील अतिथंड प्रदेशात देशाच्या लष्कराची जी अहोरात्र तैनात असते त्या तैनातीमधील दहा जणांच्या एका तुकडीचा आणि लष्करातील मद्रास रेजीमेन्टचा हणमंतप्पा हा सदस्य होता. गेल्या तीन तारखेस या तुकडीच्या तंबूवर बर्फाची एक प्रचंड मोठी भिंत कोसळली आणि हा तंबू खोलवर खचला गेला. सीमेन्टच्या भिंतीपेक्षाही बर्फाची अशी भिंत अधिक कणखर आणि कडक असल्याने तिच्याखाली गाडले गेलेले सर्व जवान तत्काळ मृत्युमुखी पडले पण सुदैवाने हणमंतप्पा जिवंत राहिला. पण त्याची इतक्या खोलवरुन आणि तेही अत्यंत प्रतिकूल वातावरणात सुटका करणे सोपे नव्हते. भारतीय लष्कराच्या दोनशे जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारायचे ठरविले. त्यात त्यांना दोन प्रशिक्षित श्वानांची खूप मोठी मदत झाली व हणमंतप्पास सुरक्षित बाहेर काढण्यात यश प्राप्त झाले. त्याच्यावर तत्काळ राजधानी दिल्लीतील लष्करी इस्पितळात उपचार सुरु करण्यात आले. जमिनीत आणि तेही अत्यंत थंड वातावरणात तब्बल सहा दिवस अडकून पडल्याने व प्राणवायूचा नीट पुरवठा होऊ न शकल्याने त्याच्या मेंदूवर आणि मूत्राशयावर घातक परिणाम घडून आला होता. पण डॉक्टर आशावादी होते. संपूर्ण देशभरात त्याच्या जीवितासाठी सामूदायिक प्रार्थना सुरु झाल्या. उत्तर प्रदेशातील एका महिलेने त्याच्यासाठी स्वत:ची मूत्रपिंडे दान करण्याची जाहीर तयारी दाखविली तर एका माजी लष्करी जवानाने ज्या कोणत्या अवयवाची गरज भासेल ते दान करण्याची इच्छा प्रदर्शित केली. त्याला जेव्हां बर्फाच्या जमिनीखालून सुरक्षितपणे बाहेर काढले गेले तेव्हां तो पूर्ण शुद्धीत परंतु काहीसा ग्लानीत होता. परंतु उपचार सुरु झाल्यानंतर त्याचे शरीर या उपचाराना अपेक्षित प्रतिसाद मात्र देत नव्हते. अखेर त्याला जीवरक्षक प्रणालीवर ठेवले गेले. पण अखेर शेवटी गुरुवारी सकाळी तो पूर्णपणे कोमात गेला आणि त्या अवस्थेतच त्याचे प्राणोत्क्रमण झाले. त्याच्या या बलिदानामुळे आता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ इतक्या प्रतिकूल वातावरणात एकादी व्यक्ती दीर्घकाळ कशी जिवंत राहू शकते यावर संशोधन करणार असून त्याचा कदाचित अन्य जवानांना उपयोग होऊ शकेल. पण सियाचेनसारख्या दुर्गम ठिकाणी भारतीय लष्कराचे दळ ठेवण्याच्या आवश्यकतेवर नव्याने चर्चा सुरु झाली असून किमान येथे तरी पाकिस्तानने समजूतदार भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आहे.
चमत्कार निजधामी
By admin | Published: February 12, 2016 4:12 AM