सचिन जवळकोटे
‘लक्ष्मी’च्या मूर्तीवरचे दागिने घडविणारे हात जेव्हा पैसे मोजण्यात रमले, तेव्हा अनर्थ जाहला. कलाकुसरीत रमणारी बोटं चळली, तेव्हा सोलापूरकरांचीही मती गुंगली. बुद्धी फिरली-नीती ढळली. हजारो सोलापूरकरांना लाखो डॉलर्सची टोपी बसली. सोलापूरच्या इतिहासातल्या सर्वांत मोठ्या अमेरिकेतली ‘अनेटा’ बनली..पण आम्ही पामरानं जेव्हा या प्रकरणात हात घातला, तेव्हा ही ‘अनेटा’ चक्क चौपाडातीलच निघाली..लगाव बत्ती..
या विस्मयजनक कहाणीची सुरुवात झाली चार-पाच महिन्यांपूर्वी, सोलापूरच्या चौपाडातलं एक मध्यमवर्गीय फॅमिली. सोनार काम करणारी. चांदीच्या कलाकुसरीत जीव ओतून दागिने घडविणारी. तीन पिढ्या यांच्या याच कामात गेल्या. चौथी पिढी मात्र शिकली, सावरली. पुण्याला सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका चांगल्या कंपनीत कामाला लागली.
या फॅमिलीत तीन भाऊ, मोठा संतोष, मधला अनंत, धाकटा जयंत. मधल्याची मुलगी बुन्नू. ही तिकडं पुण्यात कॉम्प्युटरच्या की-बोर्डवर बोटं फिरवायची. इकडं तिचे वडील अन् दोन काका चांदीच्या मूर्तींवर हात फिरवायचे. मात्र एक दिवस तिचं ‘सॉफ्टवेअर’ या तिघांच्या डोक्यात घुसलं. चांदीचे ‘हार्डवेअर’ कोनाड्यात पडलं. आपल्या ‘बुन्नू’नं आपल्याला एक ॲप डाऊनलोड करून दिलंय. त्यात दोन हजार रुपये टाकले की तीस हजार मिळतात, असं त्यांनी सोलापुरात सांगायला सुरुवात केली. सुरुवातीला चौपाडातल्या लोकांनी यावर विश्वास ठेवला नाही. मात्र या फॅमिलीची झपाट्यानं बदललेली ‘लाइफ स्टाइल’ लोकांच्या लक्षात आली. या फॅमिलीची खरंच ‘चांदी’ झाली, हे ओळखलेल्या मंडळींनी त्या ‘खुल जा सिमसिम’वाल्या ‘ॲप’ची चौकशी सुरू केली.
सुरुवातीला चौपाडातल्या दोन-चार पोरांनी पैसे लावले. रोज पैसे जमा होऊ लागले. गल्लीत चर्चा होऊ लागली. हातात मोबाइल घेऊन बाकीची मंडळीही या फॅमिलीच्या दुकानासमोर जमू लागली. हातातले दागिने सोडून हे नवे रिलेशन घडविण्यावर तिन्ही भाऊ काम करू लागले. एक दिवस त्यांनी इथंच नवं दुकान थाटलं. ‘क्रिप्टो क्लाउड हॅश’ अर्थात ‘सीसीएच्’ नावाचा बोर्डही ऑफिसात झळकू लागला. अमेरिकेतल्या खाणवाल्यांनी अर्थात ‘मायनिंग’वाल्यांनी हे ‘सीसीएच्’ नावाचं ॲप डेव्हलपमेंट केलंय, असं ते सांगू लागले. सर्वाधिक पुढाकार ‘अनंतभाऊ’नं घेतला.
सुरुवातील ‘एमएलएम’ मार्केटिंगमधल्या काही लोकांनी यात पैसे गुंतवले. या मंडळींना असला जुगाराचा फंडा नवा नसतो. जुनी कंपनी बुडाली की नवा लोगो तयारच असतो; मात्र ‘डिजिटल बिझनेस’मध्ये त्यांनी प्रथमच पैसे गुंतविले. भरभरून मिळू लागले, तसं यांचे मेळावेही होऊ लागले. सोलापुरातल्या कैक चांगल्या हॉटेल्समध्ये या ‘अनंतभाऊ’नं भाषणं ठोकली. पाठीमागून ‘जयंत’नंही साथ दिली.
चौपाडात रोज सकाळी बरेच जण एकमेकांना आपला मोबाइल दाखवू लागले. ‘मला एवढे आले, तुला किती आले?’ या वाक्यानंच ‘गुडमॉर्निंग’ होऊ लागलं. ‘मी पुन्हा एवढे टाकले, तू किती फिरवले ?’ या प्रश्नानं ‘गुडनाइट’ होऊ लागलं. चौपाडातलं हे अनोखं गुपित नवीपेठेतही पसरलं. मग काय..दुपारी चहाला बाहेर पडणारे व्यापारी उगाचंच चौपाडातल्या ऑफिसमध्येही येऊ लागले. पाहता-पाहता झटपट पैशांची लाट अख्ख्या सोलापुरात पसरली.
सकाळी ७ वाजल्यापासूनच ‘अनंतभाऊ’च्या ऑफिससमोर गर्दी होऊ लागली. यातल्या अनेकांना ‘ॲप डाऊनलोड कसं करायचं-ट्रॅन्झॅक्शन कसं हाताळायचं’ हेच माहीत नव्हतं. तेव्हा ‘अनंतभाऊ’नं ऑफिसात चार-पाच पोरं कामाला ठेवली. या नव्या ‘ॲप’मध्ये सादा व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये चालायचा. त्यासाठीही दोन-तीन पोरी दिमतीला ठेवल्या. ॲप-डाऊनलोडला ३०० रुपये. टेबलावर रोख रक्कम घेऊन त्या बदल्यात त्यांच्या ॲपमध्ये डॉलर्स फॉरवर्ड करण्यासाठी ५ टक्के जीएसटी, दुसऱ्या दिवसापासून ॲपमध्ये जमा होणारे पैसे पुन्हा रोख रकमेत देण्यासाठी पुन्हा ५ टक्के कमिशन. सर्वांत गंमत म्हणजे डॉलर देताना नव्वद रुपये भाव, घेताना मात्र सत्तर रुपये.
प्रत्येक ट्रॅन्झॅक्शनमध्ये मार्जिन कमविणाऱ्या या भावांना जणू लॉटरीच फुटली. पैशांची बंडलं घेऊन रांगेत उभारणाऱ्यांना टोकन दिले जाऊ लागले. शेवटी शेवटी तर या टोकनचा क्रमांक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुकारला जाऊ लागला. पैसे मोजण्यासाठी अर्धा डझनभर मशिन्स आणून ठेवली गेली. दिवसभर नुसतं ‘खर्रर्रऽऽ खडटाकऽऽ’ असा आवाज घुसू लागला. सारंच कसं विचित्र.
—
जणू खुळ्यांची जत्रा, वेड्यांचा बाजार
‘जणू खुळ्यांची जत्रा, वेड्यांचा बाजार’ हे नवे ॲप जेव्हा सुरू झाले, तेव्हा इन्व्हेस्टमेंटचा आकडा केवळ चार हजार होता. एवढ्या पैशात चाळीस दिवस रोज आठशे रुपये मिळायचे. म्हणजे बत्तीस हजार रुपये. सव्वा महिन्यात तब्बल एक हजार टक्के व्याज. सुरुवातीला अनेकांनी या वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. नंतर इन्व्हेस्टमेंटचा आकडा वाढत गेला. एक लाख तेरा हजाराला तेरा लाख मिळू लागले. शेवटच्या टप्प्यात अडीच लाखांचा आकडा फुटला. एवढी रक्कम भरली की चाळीस दिवस अठ्ठ्याहत्तर हजार रुपये मिळणार, म्हणजे एकतीस लाख.
या ॲपची लिंक ‘अनंतभाऊं’कडूनच मिळायची. ॲप डाऊनलोड होताच एका व्हॉटस्ॲप ग्रुपवर संबंधिताला जॉइन करून घेतले जायचे. प्रत्येक ग्रुपला नंबर असायचा. तब्बल पाचशेपेक्षा अधिक ग्रुप सोलापुरात निर्माण झालेले. एका ग्रुपमध्ये अडीचशे मेंबर म्हणजे सव्वा लाख लोकांनी यात पैसे गुंतवलेले. गृहिणींपासून उद्योजकापर्यंत-रिक्षावाल्यापासून शोरूमवाल्यापर्यंत, शिपायापासून- गर्भश्रीमंतांपर्यंत साऱ्यांनीच या स्कीममध्ये हिरिरीने पैसा लावलेला.
या सर्व ग्रुपची ॲडमिन होती ‘अनेटा’ नावाची तरुणी. डिपीवरचा तिचा फोटो अतिशय सुंदर. तीन रोज नवनव्या स्कीमची पोस्ट टाकायची. दर बुधवारी नवी मशीन लॉन्च करायची. मशीन म्हणजे नव्या आकड्याची स्कीम. गंमत म्हणजे इंग्लिशबरोबरच मराठीतही तिची पोस्ट पडायची. अमेरिकेतली ॲडमिन मराठी कसे टाईप करते, असा प्रश्न काही भाबड्या मेंबरांच्या डोक्यात निर्माण व्हायचा. मात्र, रोजच्या रोज ॲपमध्ये जमा होणारे पैसे बघून गायब व्हायचा.
सुरुवातीला हजारात भरभरून देणाऱ्या या ॲपने शेवटच्या काळात मात्र लोकांना कोट्यवधीत गुंडाळले. दहा ऑक्टोबरला ॲपचे रनिंग थांबले. बोटे फिरवून फिरवूनही ओपन होईना, तेव्हा आपला ‘बकरा’ झाल्याचे साऱ्यांच्या लक्षात आले. ज्यांनी सुरुवातीला थोडेफार कमावले, ते गपगुमान बाजूला सरकले. ज्यांनी ब्लॅक मनी गुंतविला होता, ते तोंड दाबून चिडीचूप झाले. ज्यांनी घामाचा पैसा यात ओतला, ते अब्रुखातर घरातल्या घरात रडत बसले. कारण, समाजातली कुचेष्टा नुकसानीपेक्षाही भयंकर होती.
जाता- जाता : ज्या दिवशी ॲप बंद पडले, त्याच दिवशी हे बंधू गायब झाले. ‘अनेटा’चे ग्रुपही चिडीचूप झाले. तिच्या फोटोला दाढी- मिशा लावून लोकांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला. अमेरिकन मोबाइल नंबर असणारी ही ‘अनेटा’ आता कशी सापडणार, या विचाराने हजारो लोकांनी तिचा नाद सोडला. मात्र, चौपाडातल्या ‘अनंत’ अन् अमेरिकेतली ‘अनेटा’ यांच्यात काही साम्य असल्याचे कुणाच्याच लक्षात आले नाही. कारण, अमेरिकेत नंबर काय इथे गल्ली- बोळात बसूनही मिळू शकतो. विशेष म्हणजे या अमेरिकन ॲपमुळे फक्त सोलापुरातील माणूस कसा काय फसू शकतो? आलं का लक्षात? लगाव बत्ती..
ता.क. : सोलापूरच्या इतिहासातला हा सर्वांत मोठा फ्रॉड. पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करणाऱ्यांसाठी अनेकजण तयार मात्र ‘फौजदार चावडी’चे हे प्रकरण आता ‘आर्थिक गुन्हे’ शाखेकडे वर्ग; परंतु, गंमत म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून ही शाखा केवळ कागदपत्रांच्या प्रतीक्षेत. ‘फौजदार चावडी’तून जी फाईल अजून त्यांच्याकडे म्हणे पोहोचलीच नाही. मग काय सोलापूरकर.. कसे आहात? एकदम निवांत.. लगाव बत्ती..