- सचिन जवळकोटे
गेली कित्येक दशकं ‘हात’वाल्यांचा ‘बालेकिल्ला’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘इंद्रभवन’ची ‘किल्ली’ सध्या ‘कमळ’वाल्यांच्या ताब्यात. ती पुन्हा स्वत:कडे घेण्यासाठी ‘हात’वाले जेवढे आसुसलेत, त्याहीपेक्षा जास्त ‘घड्याळ’ अन् ‘धनुष्यबाण’वाले धडपडू लागलेत. म्हणूनच ‘वाड्यावरचे देशमुख’ अलीकडं पालिकेत येऊन बसू लागलेत, तर पूर्वभागाचे ‘महेशअण्णा’ आजकाल ‘बारामती-ठाणे’ हेलपाटे मारू लागलेत.
मग अण्णा.. आज कुणाला भेटणार ?
गेल्या पंधरवड्यात ‘देवेंद्र नागपूरकर’ जेव्हा ‘थोरले काका बारामतीकर’ यांच्याशी गप्पा मारून आले, तेव्हा सोलापुरातही सत्तांतराच्या चर्चेला उधाण आलेलं. ‘घड्याळ’वाले कार्यकर्ते चक्रावले, तर ‘कमळ’वाले नेतेही दचकले. इतके दिवस ‘रंग माझा भगवा’म्हणणारे ‘महेशअण्णा’ तत्काळ सावध झाले. त्यांनी ‘थोरल्या काकां’ची भेट घेऊन ‘पालिकेत आपण कशी सत्ता आणू शकतो!’ याचं छानसं ‘पीपीटी’ही दिलं. त्याच दरम्यान ‘उद्धो’ही खाजगीत ‘नमों’शी बोलले. हे कळताच पुन्हा चलबिचल झालेल्या ‘अण्णां’नी लगेच ‘धनुष्य’वाल्या ‘एकनाथभाईं’ची भेट घेतली. एकाच आठवड्यात दोन वेगवेगळ्या पार्टीच्या नेत्यांना भेटणारे ‘महेशअण्णा’ नेमके कुणाचे, असा गूढ प्रश्न खुद्द त्यांच्याच कार्यकर्त्यांसमोर पडलेला. तरी नशीब...‘शाब्दीभाईं’नी त्यांना हैदराबादला नेलं नाही की ‘चंदनशिवे’दादांनी त्यांची ‘बाळासाहेबां’शी गाठ घालून दिली नाही. आता हे सारं कमी पडलं की काय म्हणून त्यांच्या ‘घरवापसी’चीही चर्चा मध्यंतरी ‘हात’वाल्या कार्यकर्त्यांमध्ये रंगलेली. ‘अण्णां’ना परत घेऊन ‘पालिका’ पुन्हा मिळवायची; मात्र त्यांनी ‘उत्तर’मधून ताकद दाखवायची. ‘मध्य’मध्ये बिलकूल लुडबूड नाही करायची, असाही प्रस्ताव म्हणे त्यांच्या जुन्या ‘साहेबां’कडून आलेला. मात्र याला कडाडून विरोध खुद्द ‘अण्णां’च्याच घरातूनच झालेला. धाकट्या‘देवेंद्रअण्णां’नीच नकार दिलेला. बाकीचे ‘मेंबर’ही अनुत्सुक दिसलेले; कारण ‘दोन ताईं’ची नाराजी घेऊन बाहेर पडलेल्या ‘अण्णां’ना पुन्हा त्या पक्षात सन्मान मिळेलच, यावर कुणाचाच विश्वास न राहिलेला.तात्पर्य : एवढे सारे पर्याय खुले असतानाही ‘महेशअण्णा’ कोणताच ठाम निर्णय का घेऊ शकत नाहीत, याचं कोडं कार्यकर्त्यांना सुटेना. आता ‘अण्णा’ सर्व पक्षांना फिरविताहेत की नेते त्यांना, यातच याचं उत्तर लपलेलं. लगाव बत्ती..
इकडं ‘तौफिकभाईं’ना घेऊन ‘बेस के लोग’ तर ‘महेशअण्णां’ना सोबत ठेवून पूर्व भागातली ‘मना मान्सुलु’ जवळ करण्याची व्यूहरचना खुद्द बारामतीच्या ‘थोरल्या काकां’नी आखलेली. पालिकेवर सत्ता मिळविण्याचं ‘युन्नूसभाईं’चं जुनं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘काका’ अलीकडं स्वत: इथल्या राजकारणात वैयक्तिक लक्ष घालू लागलेले. मात्र पक्षात येऊ पाहणाऱ्या नव्या मंडळींना जुन्या गटाचाच सर्वाधिक विरोध दिसून आलेला. ‘आम्ही छोटेच राहिलो तरी चालेल; मात्र इतर मोठे नाही झाले पाहिजेत,’ याच हट्टाहासात पार्टीचा ऱ्हास झालेला. म्हणूनच आजपावेतो संपूर्ण शहराचं नेतृत्व करण्याचा आवाका कुणातच का दिसला नाही, असा भाबडा प्रश्न गेल्या वर्षभरात ‘भरणेमामां’ना पडलेला. तात्पर्य : हा सारा प्रकार पाहून ‘सपाटेंचा चहा’ अन् ‘संतोषभाऊंचा वडापाव’ बाळीवेस पलीकडच्या लोकांना कसा माहीत होणार, असा प्रश्न खुद्द वडाळ्याच्या ‘काकां’ना पडलेला. मात्र त्यांना हे ठावूक नसावं, असे कैक अध्यक्ष आले अन् गेले. ही मंडळी तश्शीच राहिलेली. लगाव बत्ती..
जिल्ह्यात ‘कमळ’वाल्यांचे आठ आमदार अन् दोन खासदार. तरीही सत्तेतल्या महापालिकेत त्यांना यंदा हक्काचा ‘स्टँडिंग’ सभापती निवडून आणता न आलेला. ही सारी खेळी ‘धनुष्य’वाल्या ‘एकनाथभाईं’नी केलेली. मुंबईतून एक साधा आदेश व्हॉट्सॲपवर पाठवून त्यांनी दोन्ही ’देशमुखां’ची यंत्रणा क्षणार्धात खिळखिळी करून टाकलेली. आता सभापतीची निवडणूक पुन्हा कधी घ्यायची, याचा निर्णय म्हणे ‘भाईं’नी थेट ‘अमोलबापूं’वर सोपविलेला. कदाचित या महिन्यात निवड होईलही; मात्र पालिकेत ‘शिंदे सरकार’ अधिकच स्ट्राँग होऊ लागलंय, त्याचीच ही लक्षणं. विशेष म्हणजे सोलापुरात दीडशे बेड्सचं नवं सरकारी हॉस्पिटल सुरू करण्यासाठीही त्यांना ‘एकनाथभाईं’नी ग्रीन सिग्नल दिलेला. यापूर्वी जिथं पालिका दवाखान्याच्या जागा कशा लाटता येतील, यात अनेक मेंबरांच्या टर्मच्या टर्म गेलेल्या, तिथं ही सामाजिक धडपड लोकांना वेगळी वाटलेली. मुंबईहून त्यांना असाच फुल्ल सपोर्ट मिळत राहिला, तर भविष्यात ‘उत्तर’मध्ये खमका पर्याय होऊ शकतो निर्माण. मात्र त्यासाठी ‘बापूं’ना आपली इमेज ठेवावी लागेल नेहमीच चकचकीत. डागविरहीत.तात्पर्य : ‘झटपट पैसा’ कमविण्याचे जुने ‘संकेत’ विसरून ‘अमोलबापूं’ना लांब रहावं लागेल गंभीर कलमांपासून दूर. लगाव बत्ती..
पैसा बाेलता है..
‘श्रीकांचना’ताई महापौर झाल्या, तेव्हा सोलापूरकरांच्या अपेक्षाही वाढल्या. एकतर त्या पूर्वभागाच्या एका सुसंस्कृत घराण्यातल्या. त्यात पुन्हा महिला. त्यामुळं पालिकेतल्या ‘खाबूगिरी’ला त्या नक्कीच आळा घालतील, अशी आशा वाटलेली. मात्र ती भाबडीच ठरलेली. त्या फक्त सह्या करण्यापुरत्याच असाव्यात कदाचित; कारण ‘छोट्या-छोट्या’ गोष्टीतही ‘रमेश भावजी’ अन् ‘मल्लू पीए’पेक्षा ‘जमाईराजा’चंच नाव चर्चेत येऊ लागलेलं. मध्यंतरी औषधांच्या खरेदीतही म्हणे चांगलाच ‘स्टॉक’ हाती लागलेला. मात्र, अलीकडं बरीच कामं ‘मॅनेज’ करण्यासाठी दबावतंत्र वाढू लागताच ‘शिवशंकर’ सावध झाले. झटकन तटस्थ बनले. त्यांनी सारीच टेंडरं थेट ऑनलाईनवर टाकली. मग काय.. पूर्वी ‘कमिशनर’शी मोबाईलवर तेलुगुतूनच बोलणाऱ्या ‘ताईं’ची भाषा लगेच बदलली. त्यांच्याविषयी आता तक्रारींचा सूर उमटू लागला. यातून उलट विसंवाद वाढला. प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी जी नैतिक आक्रमकता लागते, ती गमावली गेली. पक्षाची प्रतिमा पणाला लागली. अशा अनेक ‘मॅनेज’ गोष्टींची कुणकूण लागल्यानंच ‘वाड्या’वरचे चिडलेले ‘देशमुख’ स्वत: पालिकेत हजर झालेले. यातूनच त्यांनी ‘स्मार्ट आगपाखड’ केलेली. मात्र ‘ढेंगळें’ना म्हणे अशा दमबाजीच्या भाषेची सवय नसलेली. त्यामुलं बिच्चारे ‘पाटील’ दिवसभर अस्वस्थ राहिलेले. तात्पर्य : आगामी निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी ‘कमळ’वाल्यांना आता कामच दाखवावं लागणार. ‘मोहमाया’ बाजूला ठेवावी लागणार. लगाव बत्ती..
( लेखक 'सोलापूर लोकमत' आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)