- सचिन जवळकोटे
मिशन ३.७६ —
एक तरुणी थेट पोलिस ठाण्यात शिरते. ‘एका बड्या नेत्याच्या विवाहित पोरानं माझ्याशी खोटं लग्न करून फसवलं..’ अशी केस ठोकण्याची भाषा करते. अवघं ठाणं गडबडून जातं.. पळापळ सुरू होते. मध्यस्थ येऊन भेटू लागतात..दबाव वाढू लागतो. एक नव्हे, दोन नव्हे तब्बल एकोणीस तास पोलिस ठाण्यात बसून ती फिर्याद दाखल न करताच शेवटी निघून जाते. मागच्या कोल्ड्रिंक हाऊसमध्ये मांडवली होते. ‘खोकी’ बॅगेत अन् पुण्यात ‘पेटीं’चा फ्लॅट गावात बोळवण होते. म्हणजे नज‘राणा’ ‘‘३.७६’’ एवढा पेश झाला. एफआयआर नसल्यानं मीडियासाठी भलेही हा विषय क्लोज होतो, मात्र ‘लगाव बत्ती’ची कहाणी तिथूनच सुरू होते..लगाव बत्ती..
काय अन् कसं घडलं....त्या एकोणीस तासांत ?
वेळ : ११.००
पोलिस ठाण्यात इन्स्पेक्टर दोन पत्रकारांशी बोलत बसलेले. एवढ्यात एक तरुणी आपल्या आई अन् भावासह केबीनमध्ये आली. ‘साहेब..मला केस करायचीय’ तिच्या वाक्यावर ‘पीआय’नी विचारलं, ‘बोला, काय झालं ?’ त्यावर ‘ती’ ताडकन उत्तरली, ‘यांच्यासमोरच सांगू का सगळं ?’ हे ऐकताच सारेच चमकले. पत्रकार बाहेर निघून गेले. ‘ती’ आतमध्ये बोलू लागली. मामला गंभीर होता, नावं डेंजर होती. सव्वातास सारे ऐकल्यानंतर इन्स्पेक्टरनी बेल वाजवली. तिघांना पलीकडच्या रूममध्ये पाठवलं. दोन कॉन्स्टेबल कामाला लागले. जबाब घेण्याचं काम सुरू झालं.
वेळ : १२.३०
जबाब देताना तिचा मोबाइला वाजला. ती बोलत बाहेर व्हरांड्यात आली. पलीकडचा आवाज एका उच्चभ्रू लोकप्रतिनिधींचा होता. तिकडून ‘कशाला ठाण्यात गेलीस ?’ अशी विचारणा होताच ही भडकली, ‘सहा महिन्यांपूर्वी तुम्ही तोंड वर करून मिटवामिटवी केली होती नां तात्या ? कुठं गेला तुमचा तो शब्द? कुठं गेला तुमचा तो आकडा? सहा महिने आम्ही कसं जगतोय, माहीत तरी आहे का तुम्हाला?’ पलीकडचा मोबाइल बंद झाला. व्हरांड्यातली मंडळीही चिडीचूप झाली. या पोरीचा हा वेगळा अवतार ‘खाकी’वाल्यांसाठी नवा होता. ‘आमदारकीसमोर हुजरेगिरी’ करणाऱ्यांसाठी जणू चमत्कार होता.
वेळ : ३.१५
एकीकडं ती एकेक घटना सांगत होती. दुसरीकडं जबाब टाईप होत होता. मधूनच कुणीतरी कार्यकर्ता येऊन रूममध्ये वाकून हळूच बघून जात होता. तिचा मोबाइल वाजत होता. ‘ती’ मुद्दामहून उचलत नव्हती. ‘घोळवे’ अन् ‘बोधले’ अशावेळी कामाला येत होते. सेवा जनतेची होती. पगार सरकारचा होता; मात्र ते त्यांच्या ‘चाकरा’शी ‘ईमान’ ठेवून होते. त्या बड्या नेत्याच्या लेकराचा निरोप तिच्यापर्यंत पोहोचवला जात होता; मात्र ‘अगोदर तू इकडं ये’ एवढाच धोशा तिनं लावला होता. मात्र ते ‘तरुण कर्तबगार पोरगं’ हायवेवरच्या हॉटेलात बसूनच मिटवामिटवीची भाषा करत होते.
वेळ : ४.४५
कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनं ती ऐकेना म्हटल्यावर मग तिच्या नातेवाईकांची एन्ट्री झाली. तिची मावशी आली, ‘बाईच्या जातीला शोभत नाही. देतील तेवढ्यात समाधानी राहा’ असा सल्ला देऊ लागली, तेव्हा या तरुणीच्या डोळ्यासमोर ‘मावशीला बांधून दिलेला बंगला’ आला. ती छदमीपणे हसली. ‘तू सहन केलं असशील मावशे..पण मी नाही त्यातली. सोडणार नाही त्या घराण्याला, कशी वाट लावते की नाही बघ. त्याचा बड्डे कसा साजरा होतो, तेच बघते, असा दम देताच मावशीही हबकली, भेदरली. गपगुमान हा निरोप द्यायचा मागं फिरली.
वेळ : ६.१०
अंधार पडू लागला. सोलापूरला लग्नाला गेलेले ‘सावकर’ही ठाण्यात परतले. ते केबीनमध्ये स्थानापन्न झाले, तेवढ्यात सोलापूरहून साहेबांचा कॉल आला. ‘अजून का केस नोंद होईना मला फोनवर फोन येताहेत’ तेव्हा ‘-’ सावधपणे उत्तरले, ‘यस सर..तिचा बारा पानी जबाब तयार झालाय. आणखी काही घटना ॲड करायचं म्हणतेय ती. थोडंसं चेंज केलं की डायरीला नोंद करतो सर’ मात्र त्याचवेळी बाजूच्या रूममध्ये अनेक कार्यकर्ते येऊन चाललेले. दबाव वाढत होता. आकडा मात्र वाढता नव्हता. ध्यानीमनी नसताना ‘संजयअण्णा’ही येऊन गेले. बाहेर उभारलेले बरेच पत्रकार हे सारं पहात होते. ‘लोकसेवका’च्या भूमिकेत जगणारे आता कुणाची ‘सेवा’ करणार याची उत्सुकता लागून राहिली होती.
वेळ : ८.२०
दिवसभर तिला किरकोळीत काढू पाहणाऱ्या बड्या मंडळींची आता मात्र तंतरली होती. पोरगी भलतीच टोकाची भूमिका घेऊन आलीय, हे आता कुठं मोठ्या बंधूंच्या लक्षात आलं होतं. आजपावेतो केवळ नजरेनं कैक लफडी मिटविणारे ‘पिताश्री’ही हतबल झाले; कारण तिची झेप मोठी होती. जे काही ठरेल, ते लगेच आत्ताच्या आता हातात पाहिजे होतं. यांच्या हातून एवढं सुटणे, या जन्मी तरी शक्य नव्हतं. ‘काय करायचं ते तिला करू दे, पोराला आत बसू दे. चार दिवसात बाहेर काढू’ इथपर्यंत मानसिकता झाली; मात्र ‘आतून’ जबाबाची टीप दिली गेली. या लेकरामुळं ‘अनेकांशी बळजबरी’ केल्याचा उल्लेख तिनं केलाय. गंभीर कलम नाही, थेट ‘गँग’चं कलम लागेल, हे काही ठाण्यातल्या ‘निष्ठा’बहद्दारांनी पटवून दिलं.
वेळ : १२.१५
ती पोरगी ठाण्यात येऊन बारा तास उलटून गेले होते. जबाब तयार होता; मात्र सही काही करत नव्हती. ‘हे बदला, ते बदला’ एवढंच म्हणत होती; मात्र त्याचवेळी येणाऱ्या मध्यस्थांकडून सांगितला जाणारा ‘आकडा’ही थोडा-थोडा वाढत होता. शेवटी कंटाळून ‘पीआय’ही निघून गेले. शिफ्ट बदलली. नवीन सहकारी आले. तरीही ‘एफआयआर नंबर’ पडत नव्हता. मात्र हायवेच्या हॉटेलात बसलेलं ‘लेकरू’ पुरतं भेदरलं होतं. ‘लग्नाअगोदर पोरं जन्माला घालण्याचं खूळ आता बिनभाड्याच्या खोलीत नेऊन बसवणार’ या भीतीनं पुरतं हादरलं होतं. ‘काहीही करून वाचवा’ अशी विनंती आमदाराला करत होतं.
वेळ : ४:२०
सकाळी अकरा वाजल्यापासून पोलिस ठाण्याच्या आवारात थांबलेली पत्रकार मंडळीही थकली होती. अखेर ‘ब्रेकिंग न्यूज’विनाच हे पत्रकार घरी जाऊन झोपले. इकडं मात्र ‘आकडेमोड’ सुरूच होती. अखेर पहाटे साडेपाचला एकदाचं फायनल झालं. ‘तीन खोकी’वर तुटलं. पुण्यात एक फ्लॅट नावावर करून द्यायचंही ठरलं. पाठीमागच्या कोल्ड्रींक्स हाऊसमध्ये तिला बोलाविण्यात आलं; मात्र ती हुशार, ‘तिथल्या कॅमेऱ्यासमोर यायला मी वेडी-बिडी वाटले की काय तुम्हाला?,’ असं कुत्सितपणे विचारत तिनं आई-भावाला पाठवलं. बॅगेतली बंडलं वरच्यावर मोजली गेली, ‘माझा विश्वास आहे तुमच्यावर. कमी ठेवणार नाही तुम्ही बॅगेत,’ असंही ती म्हणाली. तिकडे बॅग हातात.
वेळ : ६:००
आली इकडं एक स्टॅम्प तिच्या हातात दिला गेला, ‘आमचे राजीखुशीनं संबंध होते. आता आमची कोणाविरुद्धच तक्रार नाही,’ असं तिनं लिहून दिलं. तिकडूनही त्या लेकराचा स्टॅम्प आला. मात्र तो पाहून ही पुन्हा चिडली. ‘खोटी सही केलीय त्यानं. कुणाला वेड्यात काढतोस म्हणावं? आता मी व्हिडीओ कॉलवर त्याला सही करताना पाहणार, मगच विश्वास ठेवणार.’ अखेर बिच्चारं ‘गलितगात्र लेकरू’ त्यालाही तयार झालं. अखेर बॅगांचा नज‘राणा’ गाडीत टाकून ती आपल्या फॅमिलीसोबत पुण्याला निघून गेली. गंमत म्हणजे तिच्यासाठी कारची सोयही याच लेकरानं केलेली. इकडं एकोणीस तास राबून तयार केलेल्या जबाबाची गुंडाळी कोनाड्यात फेकून दिली गेली. ‘लेकरू’ सुटलं, ‘पोरगी’ हसली. ठाण्यातला ‘सीसीटीव्ही’ मात्र गपगुमानं पहात राहिला. ‘पावणेचार’ खोक्यांची कहाणी सफळ संपूर्ण.
बड्डेला प्रपोज... तिरुपतीला लग्न ...अन् रेल्वे रुळावर ब्रेकअप !
मोहोळ पोलिस ठाण्यात येण्यापूर्वी ही ‘तरुणी’ बरेच दिवस तयारी करत होती. काही महिन्यांपूर्वी तिनं ‘सोमेश’पासून ‘उमेश’पर्यंत अनेकांशी संपर्क साधलेला. तिच्या आयुष्यात या नेत्याच्या सुपुत्रानं कसा धुमाकूळ घातला, याचा व्हिडीओही ‘नरखेडकरां’नी तयार करून घेतला. पुढं-मागं तिचा घात झाला तर पुरावा असावा म्हणून ‘फॉरेन्सिक लॅब’कडून ‘ओरिजिनल’ म्हणून टेस्टही करून ठेवला. १ तास ३२ मिनिटं ११ सेकंदाच्या या व्हिडीओत या मुलीनं कथन केलेली कहाणी अत्यंत भयचकीत करणारी. बिहार-उत्तर प्रदेशालाही लाजायला लावणारी. याला ती ‘रावसाहेब’ म्हणते. त्याच्या वाढदिवशी कॉलेज कन्यकांकडून सात वर्षांपूर्वी ‘वेलम फूल’ घेताना त्यानं हिला पाहिलेलं. नंतर फोनवरून संपर्क साधू लागला. विशेष म्हणजे त्याच्या पहिल्या लग्नाच्या ‘ॲनिव्हर्सरी’ला यानं हिला ‘प्रपोज’ केलेलं. तिनं सुरुवातीला धुडकावून लावलं; मात्र ओळख वाढवत-वाढवत तिला बरोबर ‘कॅच’ केलं. तिच्याशी लग्न करण्याची तयारी दाखवली. तिला नवीन मोबाइल देऊन संबंध वाढविले. नंतर ‘तिरुपती बालाजी’ला नेऊन तिच्याशी गुपचूप लग्न केलं. तिथंच ‘मुक्काम करून’ पुन्हा आणून सोडलं. त्यानंतर सोलापूर, पुणे, मुंबईसह अनेक ठिकाणी संबंध ठेवलं. मात्र, एकदा त्याच्या पहिल्या पत्नीसोबत सिंगापूरला गेल्यानंतर दोघांमधल्या भांडणाचा किस्सा त्यानं रडत-रडत सांगितला. बायकोनं म्हणे एकट्यालाच तिथून ‘रावसाहेब’ला परत पाठविलं. मात्र, त्यानंतर त्याचं वागणं बदललं. तो हिला टाळू लागला.
दरम्यान, आणखी एका मुलीसोबत त्यानं लग्न केल्याचं समजल्यावर तिनं ‘इन्स्ट्रा’वरून तिच्याशी संवाद साधला. आपल्याशीही यानं लग्न केल्याचं तिने सांगितलं. हे कळल्यानंतर ‘रावसाहेब’ चिडला. हिला भेट दिलेली कार तिच्या घरासमोरून जाळून टाकण्यात आली. ‘लॉकडाऊन’मध्ये तिच्या भावाला उचलून रात्रभर ‘रेस्ट हाऊस’मध्ये मार-मार मारलं. नंतर पहाटे रेल्वे रुळावर टाकलं. ‘बहिणीला विष पाजून खल्लास कर नाहीतर तुुला इथंच रेल्वेखाली संपवतो,’ अशी धमकीही दिली. विशेष म्हणजे सकाळी ‘मोटे’ नामक कॉन्स्टेबलच्या ताब्यात देऊन भावावर ‘लॉकडाऊन’ची केस ठोकायची ऑर्डर केली. तिथून मात्र ही मुलगी पूर्णपणे चिडली.
यानंतर आणखी एका चौथ्या मुलीच्या प्रकरणात ‘रावसाहेब’ला सोलापुरात धू-धू धुतलं गेलं. त्याची महागडी गाडीही फोडली गेली. या सगळ्या गोष्टीबद्दल त्याच्या ‘पित्याश्री’ला कॉलवर सांगितलं, तेव्हा त्यांनी ‘माझं पोरगं वाया गेलेलं प्रकरण आहे, तू जरा आता त्याच्यापासून लांब रहा,’ असा उरफाटा सल्ला दिला गेला. मोठ्या भावानंही ‘ही आमच्या घरातली गॉन केस’ म्हणून उडवून लावलं.
अनेक मुलींना यानं आयुष्यातनं उठवलं, असं सांगताना ही ‘तरुणी’ शेवटी जो आरोप करते, तो अत्यंत धक्कादायक. स्वत:सोबत अनेक मित्रांनाही या तरुणीशी बळजबरीने संबंध ठेवायला लावल्याचं ती स्पष्ट करते. रस्त्यावरच्या साध्या श्वानाला घाबरणारा हा ‘रावसाहेब’ घरात आंघोळीसाठी नोकरही ठेवतो, असे अनेक चित्रविचित्र किस्सेही या व्हिडीओत सांगते.
भलेही आता या ‘तरुणी’नं केस केली नसली तरीही या व्हिडीओतली तिची जबानी अवघ्या महाराष्ट्राला थरकापवून सोडणारी. होय... हाच तो महाराष्ट्र, जिथं परस्त्रीकडं वाईट नजरेनं पाहणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात-पाय छत्रपती शिवरायांनी कलम करायला लावले होते.
मतितार्थ : या प्रकरणाची केवळ ‘सत्तर पेटी’त मांडवली केल्याची ‘आवई’ उठवली गेलीय. आजपावेतो या नेत्यांनी प्रत्येक गोष्ट रंगवून-फुगवून सांगणारे आता मात्र एवढा कमी आकडा का सांगताहेत, असा प्रश्न मोहोळवासीयांना पडलेला. खरंतर लेकरांवरच्या ‘३०२’ कलमाचं भरसभेत कौतुक करणाऱ्या मंडळींना आपल्या प्रतिष्ठेविषयीही देणं-घेणं नसावं. भीती फक्त दराऱ्याची असावी; कारण या इवल्याशा पोरीनं ज्या पद्धतीनं रात्रभर पोलिस ठाण्यात बसून अन् साऱ्यांच्या नाकावर टिच्चून ‘पावणेचार खोकी’ वसूल केलेत, ते पाहता यांच्या आजपर्यंतच्या दहशतीच्या पुरत्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्यात. त्यामुळं भविष्यात इतर प्रकरणातही थेट ‘खोक्यां’ची मागणी होऊ नये म्हणून केवळ ‘सत्तर पेटीं’ची पुडी सोडलेली. लगाव बत्ती...
जाता-जाता : काही वर्षांपूर्वी मोठ्या लेकराचं एक नाजूक प्रकरण मिटविताना असेच ‘पाऊण खोकी’ रिकामे करावे लागले. त्यावेळी डोक्याला हात लावत हतबल ‘पिताश्री’ पुटपुटले होते, ‘पोरांची लफडी निस्तरण्यात माझा दुसरा कारखाना कागदावरच राहतो की काय ?’...आता दुसऱ्या लेकराचा तिसरा मॅटर मिटविताना घायकुतीला आलेल्या या नेत्याकडं पाहून कार्यकर्तेच कुजबुजू लागलेत, ‘नव्या कारखान्याचं जाऊ द्या मालक... आहे तो कारखाना मोडीत काढायची वेळ आणू नये म्हणजे मिळवली या पोरांनी.’
लगाव बत्ती...