यदु जोशीवरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत
राज ठाकरेंची सभा मनसैनिक व शिवसैनिकांसाठीही होती. गोंधळलेला शिवसैनिक गळाला लावून, भाजपचा फायदा करत स्वत:ची सुगी त्यांना साधायची दिसते.
आधी शिवाजी पार्क आणि नंतर ठाण्यातील राज ठाकरेंच्या सभेनं वादळ निर्माण केलं आहे. त्यांचं बोलणं अनेकांना झोंबलेलं दिसतं. खिश्यात एक आमदार, निवडक नगरसेवक असलेल्या राज यांचे आरोप खोडण्यासाठीची तत्परता कोड्यात टाकणारी आहे. विशेषत: राष्ट्रवादीचे नेते ‘ओव्हर रिॲक्ट’ झाले. शरद पवार यांच्या पत्रपरिषदेने तर राज हे अधिक मोठे झाले. भाजपकडून राज यांचा उपयोग करून घेतला जात असल्याची टीका करणारेदेखील राज यांना मोठे करीत सुटले आहेत. त्यामागे राज यांना मोठं करून शिवसेनेला शह देण्याची तर खेळी नाही ना? ‘लहान मुलांना मी उत्तरं देत नसतो’, ‘पक्ष चालविण्यासाठी सकाळी ७ वाजता उठावं लागतं’ अशा शब्दात राज यांची हेटाळणी एकेकाळी केली गेली. त्याकाळी तर राज बहरात होते, आज तो बहर ओसरलेला दिसत असताना त्यांना गांभीर्यानं घेतलं जात आहे. त्यांना मोठं करायला कोण निघालं आहे? भाजप की आणखी कोणी?
मुस्लिमधार्जिणेपणासाठी काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीला टार्गेट केल्यानं मुस्लिम मतं राष्ट्रवादीकडे झुकू शकतात, हादेखील एक हेतू असू शकतो.राज यांनी गेल्या काही वर्षांतल्या धरसोडीच्या भूमिकेमुळे स्वत:च्या नेतृत्वाबाबत जे प्रश्न निर्माण केले, त्यांची उत्तरं देण्यासाठी त्यांनी ठाण्याची सभा घेतली. भूमिकांबाबत “आपुलाच वाद आपणासी” अशी राज यांची अवस्था. वैचारिक भूमिकांचं भरकटलेलं इंजिन रुळावर आणण्यासाठी त्यांनी अनेक युक्तिवाद केले. वृत्तपत्रात एक तर ब्लॅक किंवा व्हाईट असलं पाहिजे; ग्रे एरिया म्हणजे धूसर काही असता कामा नये, असं राज एकदा मला म्हणाले होते. त्यांच्या स्वत:च्या बोलण्यातही ग्रे एरिया सहसा नसतो.
कायम ‘यातही तथ्य आहे अन् त्यातही तथ्य आहे’, अशी गुळमुळीत भूमिका घेणाऱ्या मेणचट नेत्यांची संख्या वाढत असताना, टोकदार भूमिका घेणारा नेता, हे राज यांचं वेगळेपण आहे. मात्र, घेतलेल्या भूमिकांची टोकं ते सतत बदलत राहतात, ही खरी अडचण आहे. वैचारिकतेचा त्यांचा झुला इकडून तिकडे वेगानं हलत राहतो, अशी टीका झाल्यानंच त्यांनी ती अनाठायी असल्याचं सिद्ध करण्यासाठी ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा त्यांचा गाजलेला फंडा पुन्हा वापरला असावा, असं दिसतं.
भूमिकांमधील विरोधाभासानं आपल्या विश्वासार्हतेला फटका बसलाय हे त्यांना कळलं असणार. अर्थात राजकीय विश्वासार्हतेवर लागलेलं प्रश्नचिन्ह असं एक-दोन सभांनी पुसलं जाऊ शकत नाही. विश्वास ही जादूची कांडी नसते. ती एका रात्रीतून ना बनते ना बिघडते. काही नेते असे असतात, की ते ब्रम्हवाक्य आणि अत्युच्च सत्य बोलले तरी त्यांच्याविषयी संशय निर्माण होतो आणि राज यांच्यासारखे काहीच नेते असे असतात, की जे काहीही बोलले तरी समोरची पब्लिक टाळ्यांचा कडकडाट करते. हा पब्लिक कनेक्ट हेच राज यांचं भांडवल आहे. या कनेक्टच्या आड वैचारिक विसंगती लपवता आली, टाळ्यादेखील मिळत गेल्या, पण मतं मात्र मिळाली नाहीत, हे आता त्यांना उमजलेलं दिसतं.
आता कट्टर हिंदुत्वाच्या घोड्यावर बसून हा ‘राज’कुमार निघाला आहे. “मशिदींवरील भोंगे रमझान ईदपर्यंत उतरवा, नाही तर अशा प्रत्येक मशिदीसमोर हनुमानचालिसा म्हटली जाईल”, असं राज यांनी जाहीर केलं आहे. रामायणात लक्ष्मण, उर्मिला, हनुमान या पात्रांवर अन्याय झाल्याचा तर्क बरेच लोक देतात. देशाच्या राजकारणात रामाचा वापर खूप झाला. रामामुळे भाजपला सत्ता मिळाली. आता राज हे हनुमानाला न्याय द्यायला निघाले आहेत. भाजपचा राम, तर राज यांचा हनुमान असं गणित मांडलं, तर भाजप म्हणजे राम आणि राज हे त्यांचा हनुमान, असंही समीकरण मांडलं जाऊ शकतं.
बाळासाहेबांनी एकेकाळी ‘भगाव लुंगी’चा नारा दिला होता. आज राज ‘हटाव भोंगा’ म्हणत आहेत. राज हे भाजपचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप होत आहे. मुंबई, ठाण्याच्या सभेत त्यांनी मांडलेली मतं ही कुणाकडून उधार घेतलेली नव्हती, असं ते म्हणत असले तरी, हिंदुत्व, समान नागरी कायदा, कुटुंब नियोजन याबाबत संघ-भाजपच्या मतांची री त्यांनी ओढली. उधारी वाढली की दुकान बुडतं. भाजप, मोदी, अमित शहा, फडणवीस यांना त्यांनी टार्गेट केलं नाही. उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला नाही. ठाण्यात सभा असूनही एकनाथ शिंदेंना त्यांनी डिवचलं नाही. दरवेळी कोणाला ना कोणाला डिस्काऊन्ट देण्याच्या त्यांच्या या सवयीमुळेच संशयाचं धुकं दाट होत जातं. राज चाणाक्ष आहेत. कुठे काय बोलायचं, कोणत्या नाजूक नसेवर कसं किती दाबायचं, हे त्यांना नेमकं कळतं. म्हणूनच अनेकांना त्यांचे शब्द झोंबतात.
“छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र असं पवार का म्हणत नाहीत, फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र असं का म्हणतात?” इथंपासून ते “राष्ट्रवादीमुळे जातीयवाद वाढला” इथवरच्या वाक्यांमधून तसेच पवारांच्या घरातील भेदावर बोलून राज यांनी मर्मावर बोट ठेवलं.
शिवसेनेनं राष्ट्रवादी व काँग्रेसशी घरोबा केल्यानं तिच्या हिंदुत्वाविषयी जे शंकेचं वातावरण जनतेमध्ये निर्माण केलं जात आहे, त्या वातावरणाचा फायदा घेत शिवसेनेच्या हिंदुत्वाला पर्याय देण्याची राज यांची धडपड दिसत आहे.
भगव्या शालीपासून शैलीपर्यंत बाळासाहेबांची नक्कल करत राज हे पारंपरिक ठाकरेपण उद्धव ठाकरेंकडून खेचून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परवाची त्यांची सभा मनसैनिकांसाठी तर होतीच, पण शिवसैनिकांसाठीही होती. गोंधळलेला शिवसैनिक गळाशी लावण्याची त्यांची खेळी दिसते. त्यात ते जितके यशस्वी होतील, तितका शिवसेनेला फटका बसेल, भाजपचा फायदा होईल अन् राज यांना ‘सुगी‘चे दिवस येतील.