आवाज वाढव भोंग्याचा... तुला ईडीची शपथ हाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:46 AM2022-04-13T11:46:42+5:302022-04-13T11:53:36+5:30

सामान्य माणूस महागाईने होरपळून गेला आहे. त्यावर जर राज ठाकरे यांचे बोलले असते तर ते अधिक जवळचे आणि संतुलित काही वाटलं वाटले असते, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने राज ठाकरे यांच्या भाषणाचा संबंध भाजपाशी जोडला जातोय. किंबहुना ईडीशी जोडला जातोय, तोही सोशल मीडियावर.

mns chief speaks about mosque loudspeakers avoids fuel hike inflation social media links it to ed action | आवाज वाढव भोंग्याचा... तुला ईडीची शपथ हाय!

आवाज वाढव भोंग्याचा... तुला ईडीची शपथ हाय!

Next

- विनायक पात्रुडकर

ठाण्याची राज ठाकरे यांची उत्तर सभा तुफान रंगली. खरं तर ती राष्ट्रवादीच्या नेत्यांची उत्तर पूजा होती. गुढीपाडव्याची सभा गाजली परंतु ठाण्याची उत्तर सभा अधिक उजवी ठरली. राज ठाकरेंना सूरही उत्तम गवसला होता. आपल्यावर आरोप करणाऱ्या एकेका नेत्याची जाहीर हजामत कशी करायची, याचा उत्तम नमुना ठाण्याच्या सभेत पाहायला मिळाला. फारशी शिवीगाळ न करता मुद्देसूद पद्धतीने आरोपांना उत्तर देता येते. याचेही हे भाषण मासलेवाईक उदाहरण होते. राज ठाकरे उत्तम वक्ते आहेत, उत्तम परफॉर्मर आहेत. त्याचबरोबर आपल्या भूमिकेवर ठाम होत चालले आहेत. त्यांनी मशिदीवरील भोंग्याचा आवाज बाबतची भूमिका मांडली ती पुन्हा स्पष्ट केली.

'भाजपचा बोलका पोपट' या आरोपाला उत्तर देण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या भाषणातून केला. अर्थात ठाण्याची उत्तर सभा ही राष्ट्रवादीला पूर्णता लक्ष्य केलेली होती. अगदी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड या सार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांना राज ठाकरे यांनी लक्ष्य केले. शरद पवार हे नास्तिक हे अनेकांना माहिती आहे, पण छत्रपती शिवरायांचं नाव जाणीपूर्वक टाळतात, हे ठसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. शरद पवार यांनी जातीपातीचे राजकारण करून महाराष्ट्र नासवला, हेही बिंबवण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी त्यांच्या उत्तरात केला. पवार घराणे राज यांच्या भाषणाचे मुख्य लक्ष्य होते यात शंका नाही. राज ठाकरे यांनी ना शिवसेनेला टार्गेट केले, ना काँग्रेसचा डिवचले. त्यांचे पूर्ण भाषण हे राष्ट्रवादीवर प्रहार करण्यात गेले.

खरेतर ठाणे हा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला, परंतु त्यांच्यावर एकाही शब्दाने टीका केली नाही. मात्र ठाण्यातल्या राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची चहुबाजूंनी खिल्ली उडवली. अजित पवारांच्या बहिणीच्या घरी धाडी पडतात, पण सुप्रिया सुळे हात लावला जात नाही हे जाणीपूर्वक राज ठाकरे यांनी जाहीर भाषणातून सांगितले. शरद पवार केवळ आपल्या लेकीची काळजी घेतात, हेही ठसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याचबरोबर पवार यांच्या घरातील भेद दाखवण्याचाही राज ठाकरे याचा हेतू होता. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील सुप्त राजकीय संघर्ष चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्नही राज ठाकरे यांनी केला. जयंत पाटील छगन भुजबळ हेही राज ठाकरे यांच्या भाषणाचा हिटलिस्टवर होते.

आणखीन एक गोष्ट राज ठाकरे यांच्या भाषणात प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे पत्रकारांची पक्षा पक्षात आणि जाती-जातीत झालेली विभागणी. अनेक पत्रकार एखाद्या नेत्याच्या किंवा पक्षाच्या विचारांना बांधले गेले आहेत हे सत्य आहे. अनेक पत्रकारांचे तसेच संपादकांचे लिखाण तटस्थ न राहता कुणाचीतरी तळी उचलून धरणारे झाले आहे, हेही आता लपून राहिलेले नाही. 'झाकली मूठ सव्वा लाखाची' या म्हणीप्रमाणे कुणीही उघड बोलत नव्हते, राज ठाकरे यांनी मता मतांमध्ये विखुरलेल्या पत्रकारांचे वाभाडे काढले. अर्थात त्यामुळे फार फरक पडेल असे नाही, पण पत्रकार धुतल्या तांदळाचे नाहीत हेही ठासून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. निस्पृह आणि निखळ पत्रकारितेला ओहोटी लागली आहे हे यातून स्पष्ट झाले हे बरे झाले.

राज ठाकरे यांच्या भाषणात राष्ट्रवादी बरोबरच मशिदीवरील भोंगे हा विषय केंद्रस्थानी होता. रमजान सुरू असल्याने तीन मेपर्यंत मुदत देऊन हा भोंगा बंद झाला पाहिजे, असा इशारा देत राज ठाकरे यांनी पक्षातील धग कायम ठेवली. भोंगा हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे, धर्म घरात ठेवावा रस्त्यावर नको, ही मूळची बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका पुन्हा राज ठाकरे यांनी मांडली. एक प्रकारे शिवसेनेला 'ओव्हरटेक' करण्याचा प्रयत्न ही दिसला. शिवसेना सत्तेत असल्याने त्यांच्या मर्यादा राज ठाकरेंनी ओळखल्या. त्यामुळे हिंदू मतांचे ध्रुवीकरण करून भविष्यात आपण हिंदूंचे तारणहार आहोत, हे सांगण्याचा प्रयत्नही दिसला. भारतीय जनता पक्षालाही सर्व हवेच आहे, यात शंका नाही. उद्धव ठाकरे नाही तर राज ठाकरे यांना जवळ करून भाजपा महाराष्ट्राचा राजकारणात नवा डाव मांडण्याचा प्रयत्न करणार असे दिसते, त्याला कितपत यश येते ते पुढील काळ ठरवेल.

राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात राष्ट्रवादीचे नेते जसे लक्ष्य केले किंवा भोंगा हा विषय केंद्रस्थानी ठेवला, त्याच ताकदीने वाढलेली महागाई, पेट्रोल डिझेलचे दर, भाज्यांचे भाव, लोडशेडिंग, बेरोजगारी हे विषय मांडले असते, तर अधिक बरे झाले असते. आज सामान्य माणूस महागाईने होरपळून गेला आहे. प्रवासही प्रचंड महाग झालाय, घराघरात बेकार तरूण वाढत आहेत, त्यावर जर राज ठाकरे यांचे बोलले असते तर ते अधिक जवळचे आणि संतुलित काही वाटलं वाटले असते, परंतु त्याकडे दुर्लक्ष झाल्याने राज ठाकरे यांच्या भाषणाचा संबंध भाजपाशी जोडला जातोय. किंबहुना ईडीशी जोडला जातोय तोही सोशल मीडियावर.

राज ठाकरे यांच्यासाठी भोंगा विषय राजकीय पोळी भाजण्याचा असू शकतो, परंतु त्यामुळे रोजच्या व्यवहारातली प्रश्न सुटणार नाही. अर्थात भावनिक प्रश्न भोवती घुटमळणार्‍या राज ठाकरे यांच्याकडून अशी अपेक्षाही नाही. एकेकाळी बाळासाहेबांनी 'हटाव लुंगी'चा नारा दिला होता. त्यांचा पुतण्या राज ठाकरे आता 'हटाव भोंगा'चा नारा देत आहे. ठाकरे घराण्याचे राजकारण अजूनही याच भावनिक विषयाभोवती घुटमळत आहे, हे मात्र नक्की.

Web Title: mns chief speaks about mosque loudspeakers avoids fuel hike inflation social media links it to ed action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.