- विजय दर्डालोकसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वप्रथम मनापासून अभिनंदन. मी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचेही अभिनंदन करीन, कारण त्यांनी काँग्रेसची विचारसरणी खंबीरपणे देशापुढे मांडली. तरीही काँग्रेसला यश का मिळाले नाही, याची चर्चा नंतर केव्हा तरी करू. सध्या तरी मी फक्त मोदीजींविषयीच बोलणार आहे. या जनादेशाचा स्पष्ट संदेश आहे की, मोदी हे संपूर्ण देशाच्या आशा-आकांक्षांची प्रबळ प्रतिमा बनले आहेत. देशवासी त्यांच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहात आहेत. देशाची ही अपेक्षा मोदी पूर्ण करतील, अशी अपेक्षा करू या. या ऐतिहासिक विजयानंतर मोदींनी देशाला दिलेला पहिला संदेश मोठा सकारात्मक आहे. मोदींची ही विनम्रता भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत झिरपली तर खरोखरच या देशात सामाजिक समरसता, समन्वय व विकासाचा नवा अध्याय लिहिला जाईल.हे नक्की की या निकालाने भले भले राजकीय पंडितही चक्रावून गेले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अपवाद वगळला तर अशा निकालाची अपेक्षा कोणीच केली नसेल! निवडणुकीच्या काळात गप्पांमध्ये फडणवीस यांनी मला निकालांविषयी जे काही सांगितले होते ते पूर्णत: खरे ठरले. फडणवीस यांची रणनीती, कठोर परिश्रम व सर्वसामान्य माणसाबद्दलचे त्यांचे समर्पण यामुळे महाराष्ट्रात भाजपचा झेंडा दिमाखाने फडकला. जाती-पातींच्या गणितांवर चालणाऱ्या भारतीय राजकारणाचे स्वरूप लक्षात घेता या वेळी बहुधा कोणालाही स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असा अंदाज निवडणुकीच्या आधी वर्तविला गेला होता. भाजप, काँग्रेस किंवा महागठबंधन यापैकी कोणालाही एवढे प्रचंड बहुमत मिळू शकेल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती; परंतु नरेंद्र मोदींच्या लाटेने हे सर्व आडाखे खोटे ठरविले. एकट्या भाजपने ३०३ जागा जिंकल्या एवढेच नव्हे तर प. बंगालमध्येही शानदार यश मिळविले. काही महिन्यांपूर्वी ज्या राज्यांत काँग्रेसची सरकारे आली तेथेही भाजपने पुन्हा आश्चर्यकारक घट्ट पाय रोवला! काही महिन्यांपूर्वीच्या पराभवाला विजयात बदलणे सोपे नव्हते. खरं तर मोदींच्या सत्तेच्या पहिल्या पर्वात अनेक नकारात्मक मुद्देही उपस्थित झाले होते. वाढती बेरोजगारी, ‘जीडीपी’ची कुंठलेली गती, महागाईतील वाढ असे अनेक मुद्दे होते. असे असूनही मतदारांनी काँग्रेसला नाकारले. मोदीजींच्या झोळीत भरभरून मते टाकली! ३५ वर्षांहून कमी वयाच्या तरुण पिढीने मोदीजींवर विश्वास टाकला. असे का झाले याचा विरोधकांना गंभीरपणे विचार करावा लागेल.निवडणुकीच्या अभ्यासकांना असे वाटते की या वेळची निवडणूक म्हणजे नरेंद्र मोदी या एकाच व्यक्तीसाठी घेतलेले जणू सार्वमत होते. संपूर्ण पक्ष ठामपणे पाठीशी असूनही कुठेही मोदींहून पक्ष ठळकपणे पुढे दिसला नाही. स्पष्टपणे मोदींच्या नावे मते मागितली गेली व विजयी उमेदवारांनी त्या यशाचा तुराही मोदींच्याच शिरात खोवला. ‘मोदी है तो मुमकीन है’ हे मोदींनी लोकशाहीच्या या महोत्सवात शब्दश: खरे करू दाखविले!
मोदीजी बनले संपूर्ण देशाचे आशास्थान!
By विजय दर्डा | Updated: May 27, 2019 05:48 IST