विजय दर्डा (लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)विदेशी भूमीवर असताना देशांतर्गत राजकीय विषयांवर टीका-टिप्पणी करण्याची वादग्रस्त सवय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असली तरी ते परदेश दौऱ्यांत सर्वाधिक श्रम घेणारे व्यक्ती आहेत, हे निर्विवाद. विदेश दौऱ्यांमध्ये ते स्वत:साठी, प्रसंगी शिक्षा वाटावी, एवढे भरगच्च वेळापत्रक ठरवून घेतात आणि परकीय गुंतवणुकीसाठी भारत हे कसे आदर्श ठिकाण आहे हे आपल्या यजमानांना पटवून देण्याचा आपला अजेंडा ते नेटाने पुढे नेतात. यामुळे मोदी हे विदेशातील भारताचे संभाषणचतुर प्रवक्ते बनले आहेत. विदेशात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती एक प्रकारे आपलेपणाचे वलयही निर्माण झाले आहे. विदेशात स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाशी बोलताना तर मोदी थेट त्यांच्या हृदयालाच हात घालतात. मोदींचे हे कार्यक्रम एखाद्या ‘रॉक स्टार’सारखे असतात. अशा या कार्यक्रमांमध्ये विदेशातील भारतीय जेव्हा ‘मोदी’, ‘मोदी’ असा घोष लावून त्यांना डोक्यावर घेतात तेव्हा मोदींमुळे या लोकांचा उत्साह कसा ओसंडून जातो याचे प्रत्यंतर येते. अधिक चांगले आयुष्य जगण्याच्या उमेदीने स्वदेशापासून दूर गेलेल्या लोकांसाठी आपल्या मातृभूमीच्या पंतप्रधानांशी अशी तार जुळणे, हा एक वेगळाच उत्साहवर्धक अनुभव ठरतो. यातून विदेशातील त्या भारतीय समाजाला खूप समाधानही मिळते.सत्तेवर आल्यापासून गेल्या वर्ष- सव्वा वर्षात मोदींनी पंतप्रधान म्हणून जगाच्या पाठीवर सर्वदूर दौरे केले आहेत. त्यांची परदेश दौऱ्यांची मालिका भूतानपासून सुरू झाली व त्यानंतर त्यांनी ब्राझील, नेपाळ, जपान, अमेरिका, म्यानमार, आॅस्ट्रेलिया, फिजी, सेशल्स, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, चीन, मंगोलिया, दक्षिण कोरिया, बांगलादेश, उझबेकिस्तान, कझाखस्तान, रशिया, तुर्कमेनिस्तान, संयुक्त अरब अमिरात आणि आयर्लंड अशा नानाविध देशांना भेटी दिल्या. ते संयुक्त राष्ट्रसंघातही गेले व अमेरिका आणि नेपाळला त्यांनी दोनदा भेटी दिल्या. याखेरीज त्यांनी अनेक देशांच्या प्रमुखांच्या दिल्लीत भेटीगाठी घेतल्या. हे करत असताना त्यांनी राजनैतिक शिष्टाचाराच्या बाबतीत नवे पायंडेही पाडले. याचाच एक भाग म्हणून त्यांनी दीर्घकाळ परस्परांचे प्रतिस्पर्धी असलेल्या चीन व मंगोलिया या दोन्ही देशांसाठी भारताच्या मैत्रीचा हात पुढे केला.पण या परदेश दौऱ्यांमध्ये मोदींनी खरे कष्ट घेतले ते ‘भारता’ला एक ब्रॅण्ड म्हणून व गुंतवणुकीचे सर्वात आकर्षक ठिकाण म्हणून जगापुढे आणण्यासाठी. असे करण्यात मोठे व्यापारी शहाणपणही आहे. जागतिक बाजारपेठेत दीर्घकाळ मंदीचे वारे असताना भरभक्कम देशी मागणी असलेला भारत हा कोणत्याही वस्तूच्या विक्रेत्यासाठी साहजिकच एक आदर्श बाजारपेठ ठरतो. भारतात जाऊन घट्ट पाय रोवणे कसे फायद्याचे आहे याचा अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डनी चांगला अनुभव घेतलेला आहे. परंतु प्रत्यक्ष जीवनात प्रत्येक गोष्टीचे रंग वेगवेगळे असतात. त्यामुळे गुंतवणुकीसाठी आकर्षक ठिकाण म्हणून भारताचे चित्र रंगविले जात असले, तरी भारतात प्रत्यक्षात उद्योग-धंदे करताना येणाऱ्या अडचणी ही या चित्राच्या मागील काळपट बाजू आहे. ताज्या क्रमवारीनुसार जागतिक बँकेने २०१५ मध्ये जारी केलेल्या अहवालाप्रमाणे उद्योगस्नेही वातावरणाच्या बाबतीत भारत आणखी दोन स्थाने खाली जाऊन सध्या १८९ देशांमध्ये १४२ व्या स्थानावर आहे. भारतासाठी हे नक्कीच चांगले नाही व भारतात येणारा परकीय गुंतवणुकीचा ओघ अजूनही का मंदावलेला आहे, याची कल्पनाही यावरून येते. मोदी अपार कष्ट घेऊन परदेशांमध्ये भारताची जी धवल प्रतिमा निर्माण करीत आहेत ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी देशात त्यासाठी पूरक असे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुरामन राजन यांच्यासारखी अनुभवी आणि विद्वान व्यक्ती जेव्हा नेमके यावरच बोट ठेवते तेव्हा ती नक्कीच गांभीर्याने विचार करण्याची गोष्ट ठरते. यासाठी कंबर कसणे हे सर्वच संबंधितांचे काम असले तरी याची मुख्य जबाबदारी पंतप्रधान मोदी यांच्यावरच आहे. परकीय उद्योजक व गुंतवणूकदारांना भारतात येण्यासारखे वाटण्यासाठी जे काही करणे गरजेचे आहे व जे बदल गरजेचे आहेत त्याला गती पंतप्रधान या नात्याने मोदींनीच द्यायची आहे. भारतीय मानसिकता व येथील कार्यसंस्कृतीची पंतप्रधान मोदी यांना चांगली कल्पना असल्याने त्यांनीच परिणामकारक पावले उचलायला हवीत, हे वेगळे सांगायला नको. भारतीय मतदारांनी याच अपेक्षेने त्यांना प्रचंड जनाधार देऊन सत्तेवर आणले आहे. कठोर निर्णय घेण्याची धडाडी (५६ इंची छाती) असल्याचे सांगत मोदींनी देशवासीयांपुढे स्वत:चे यशस्वीपणे मार्केटिंग केलेले आहे.ज्याला नेटाने प्रोत्साहित केले तर देशाचे सामाजिक-आर्थिक चित्र आमूलाग्र बदलू शकेल असे एक क्षेत्र आहे ते म्हणजे पर्यटनाचे. पर्यटनस्नेही देशांच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक ५२ वा लागतो. चीन, ब्राझील व रशिया हे आपल्या बरोबरीचे देश अनुक्रमे १७, २८ व ४२ व्या स्थानावर आहेत, तर पहिल्या दहा देशांमध्ये फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, अमेरिका, आॅस्ट्रेलिया आणि इटली यांचा क्रमांक आहे. या देशांमधील पर्यटस्थळे फार दर्जेदार आहेत म्हणून हे देश आपल्याहून पुढे आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. भारताच्या ‘सॉफ्ट पॉवर’ची जगाला ओळख आहे. त्याला सांस्कृतिक विविधतेची आणि समृद्ध परंपरेची जोड दिली तर जागतिक पर्यटकांसाठी भारत हे नक्कीच आकर्षक पर्यटनस्थळ ठरेल हे नक्की. पण पायाभूत सुविधांचा अभाव आणि ‘अतिथी देवो भव’ हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरविण्यातील अपयश यामुळे भारत पर्यटनाच्या बाबतीत क्षमतेच्या खूप मागे पडत आहे.भारतात धार्मिक यात्रांसाठी ताजमहालसारख्या जागतिक वारशाच्या यादीतील वास्तूंच्या आकर्षणाने किंवा राजस्थानच्या जादूने मोठ्या संख्येने पर्यटक येतात हे सर्वजण जाणतात. पण मूलभूत सोयीसुविधांचा अभाव व सुरक्षेविषयी साशंकता यामुळे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भारताकडे पाठ फिरवितात हेही नाकारून चालणार नाही. खास पर्यटनाशी संबंधित निकषांवर भारताची क्रमवारी यासाठी उद्बोधक आहे. पर्यटनपूरक सोयी-सुविधांच्या बाबतीत भारत १०९ व्या, आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत १०६ व्या आणि माहिती, दळणवळण व तंत्रज्ञान सज्जतेच्या बाबतीत त्याहूनही खाली म्हणजे ११४ व्या स्थानावर आहे. असे असले तरी पर्यटन हा भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा परकीय चलन मिळवून देणारा उद्योग आहे. यात समस्या कुठे आहेत हे आंतरराष्ट्रीय सर्वेक्षण संस्थांनी आपल्याला सांगितले आहे. गरज आहे त्याची दखल घेऊन सुधारणा करण्याची. ठरावीक बाबी शोधून योग्य त्या सुधारणा केल्या तर पर्यटन उद्योग भरारी घेऊ शकेल. जगातील बहुधा सर्व महत्त्वाच्या देशांना जाऊन आलेले मोदी हे स्वत: अनुभवी प्रवासी आहेत. त्यामुळे भारतात पर्यटक म्हणून येणाऱ्यांसाठी येथील प्रवास आणि निवास अधिक सुखकारक व संस्मरणीय होण्यासाठी जे काही करणे गरजेचे आहे ते तेच अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात.हे लिखाण संपविण्यापूर्वी...देशातील मान्सून आता संपल्यात जमा आहे. २००९ नंतर यंदाचा पावसाळा सर्वाधिक ‘कोरडा’ ठरला आहे. मान्सूनची यंदाची एकूण सर्वसाधारण तूट १४ टक्के असली तरी देशाच्या ३९ टक्के भागांत सरासरीहून कमी, ५५ टक्के भागांत ‘नॉर्मल’ तर फक्त सहा टक्के भागांत सरासरीहून जास्त पाऊस झाला आहे. मान्सूनच्या या तुटीचे सर्वंकष परिणाम येत्या काही महिन्यांत स्पष्ट होतील. त्यांची तीव्रता कमी करणे ही संबंधितांची जबाबदारी आहे. एवढे मात्र नक्की की, तुटीच्या मान्सूनमुळे येऊ घातलेल्या संकटाची पुरेशी पूर्वकल्पना दिली गेली होेती. त्यामुळे आता उपाययोजना करताना कोणालाही कोणतीही सबब सांगण्यास जागा नाही.
मोदींचे विदेश दौरे झाले, आता गरज देशांतर्गत कृतीची
By admin | Published: October 04, 2015 10:23 PM