पंतप्रधान नरेंद्र मोदी या आधीही महाराष्ट्रात आले आहेत; पण शुक्रवारचा त्यांचा दौरा अनेक अर्थांनी वेगळा होता. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन मोदी यांच्या हस्तेच २२ जानेवारीला होत असताना त्याच्या ११ दिवस आधी त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरातच दर्शनासाठी का जावे? देशात प्राचीन व धार्मिक महत्त्व असलेली अनेक राम मंदिरे आहेत. मात्र, ज्या मंदिरात प्रवेशासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ते दलित असल्याने आंदोलन करावे लागले होते, त्या मंदिरात मोदी गेले. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. यानिमित्त त्यांनी ११ दिवसांचे धार्मिक अनुष्ठान सुरू केले आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी धर्मग्रंथांमध्ये कठोर मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत त्यांचे अनुपालन या ११ दिवसांत मोदी करणार आहेत. हिंदुत्व हा आपल्या जीवनशैलीचा हिस्सा असल्याचा संदेश त्यातून त्यांनी दिला.
काळाराम मंदिरात त्यांनी सफाई केली आणि देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता करण्याचे आवाहन केले. त्याचा परिणाम लगेच दिसून येईलच. त्यांची एक कृती किती मोठा परिणाम साधते हे लक्षद्वीपला त्यांनी दिलेली भेट आणि त्यानिमित्ताने मालदीवला दिलेली जोरदार चपराक यावरून दिसून आले होतेच. काळाराम मंदिरात महापूजा करताना त्यांनी बळीराजाच्या कल्याणाबरोबरच अखंड भारताचे स्वप्न साकार होवो यासाठी साकडे घातले. अखंड भारताचे स्वप्न म्हणजे काय? मोदी यांनी निकटच्या भविष्यातील त्यांच्या अजेंड्याचे सूतोवाच तर केले नाही ना? पाकव्याप्त काश्मीर भारतात घेण्याचा मोदींचा अजेंडा असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियात असताना त्याला जोडून या संकल्पाकडे नक्कीच पाहिले जाईल. ते होईल, नाही होणार; पण या संकल्पाचा हाच गर्भिथार्थ असल्याचे मानून त्यांचे चाहते नक्कीच सुखावले असतील.
मोदींनी सत्तरी पार केली आहे; पण देशातील इतर कोणत्याही नेत्यापेक्षा तरुणाईशी असलेल्या त्यांच्या कनेक्टचा प्रत्यय नाशिकमधील युवामहोत्सवाच्या निमित्ताने आला. मोदींच्या भाषणाला युवक-युवतींनी दिलेला जोरदार प्रतिसाद तेच सांगत होता. आबालवृद्धांना जवळचे वाटण्याची किमया मोदी यांनी साधली आहे. रोज अठरा-अठरा तास काम करणाऱ्या नेत्याकडे आपसूकच एक अधिकारवाणीदेखील येत असते. त्याच अधिकारवाणीतून मोदी यांनी तरुणांना आई, बहीण व मुलींच्या नावाने शिव्या देऊ नका हा उपदेश केला. राजकारणातील घराणेशाही संपवा हे त्यांनी यावेळी केलेले आव्हान काँग्रेस व गांधी घराण्यावर निशाणा साधणारे होते हे स्पष्टच आहे; पण भाजपमध्ये अनेक ठिकाणी दिसणाऱ्या घराणेशाहीचा मोदी बीमोड करतील का हा प्रश्न आहेच.
मुंबईच्या भेटीत एकाचवेळी ३३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची उद्घाटने, भूमिपूजन करण्याची कृती ‘मल्टिटास्किंग’चे त्यांनी अवलंबिलेले तंत्रच उद्धृत करते. एकाचवेळी सर्व आघाड्यांवर माझ्या नेतृत्वात देदीप्यमान कामगिरी सुरू आहे, एकदोन विकासकामे एकावेळी ‘लाँच’ करण्यात मला रस नाही. हजारो कोटींच्या विकासकामांचा एकाचवेळी धडाका ही आपली रीत असल्याचे ते कृतीने सिद्ध करतात. त्याचवेळी विरोधकांना नामोहरम करण्याची संधी ते सोडत नाहीत. ‘आम्ही हजारो कोटींची कामे करतो, आधी हजारो कोटींचे घोटाळे होत असत’, असे म्हणत त्यांनी लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याचे भान सुटू दिले नाही. विकासरथ वेगाने दौडवत असताना त्याखाली विरोधक कसे चिरडले जातील याकडे त्यांचे लक्ष असते.
मोदी नावाचे गारुड समाजमनावर कायम आहे हे नाशिकमधील त्यांच्या रोड शोने दिसून आले. त्यांचा झंझावात बघता चार महिन्यांनंतरच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा ‘मोदी ब्रॅण्ड’ किती आक्रमक असेल याचा प्रत्यय आला. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा नारळच त्यांनी फोडला. शिवडी-न्हावाशेवा या ‘अटल सेतू’चे उद्घाटन करताना त्यांनी ‘मोदी की गॅरंटी’ हे सध्याचे परवलीचे शब्द वापरले. तीन राज्यांमधील भाजपच्या जबरदस्त यशातही हेच शब्द मोलाचे ठरले होते. लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रचारात हेच शब्द केंद्रस्थानी असतील हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. नवी मुंबईत बोलताना आपल्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीचे वर्णन मोदी यांनी, ‘संकल्पापासून सिद्धीकडे’ या शब्दात केले. आपल्या बोलण्याला कृतीची जोड आहे आणि तीच आपली गॅरंटी असल्याचा विश्वास मोदी अशा पद्धतीने पेरत आहेत. एकीकडे भाजपची व्होटबँक म्हणून हिंदुत्व कॅश करतानाच सर्वसामान्यांची मने जिंकतील अशी कामे, योजना यांचा वर्षाव करणे असे सूत्र त्यांनी स्वीकारलेले दिसते. मोदींच्या महाराष्ट्र भेटीने तेच अधोरेखित केले आहे.