राजा माने
गोंदिया : जमलेल्या गर्दीची नस पकडत सभा गाजविण्याच्या शैलीबरोबरच राजकारणात नव्या विषयांना चर्चेसाठी वाट करून देण्याची नवी स्ट्रॅटेजी २०१९ च्या लोकसभा निवडणूक भाषणांमध्ये नरेंद्र मोदी यांनी अवलंबिल्याचे दिसते. मोठ्या जोशात एखादा संवेदनशील विषय छेडणे आणि त्या विषयाचा नेमका अर्थ लावण्यात तर्क-वितर्कांच्या फेऱ्या झडविणे, ही त्यांच्या भाषणाची खासीयत ठरू लागली आहे. विदर्भात प्रचाराचे पहिले पाऊल टाकताना वर्धाच्या सभेत त्यांनी शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर थेट हल्ला चढवून वादाला आणि चर्चेला एक विषय दिला. खरे तर पंतप्रधानांनी २०१४ साली दिलेल्या वचनांचा आणि देशाला दाखविलेल्या स्वप्नांचा हिशेब प्रचारसभांमधून द्यायला हवा.
प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही. प्रत्येक भारतीयाच्या खिशात १५ लाख रूपये जमा करण्याचा विषय पद्धतशीरपणे विसराळी पाडला जातो. नरेंद्र मोदी हे तर भारतीय जनता पक्षाचे सुपरस्टार प्रचारक ! त्यांनी निवडणुकीच्या प्रचारसभा गाजवायला सुरूवात केली आहे. त्यांची २०१४ ची जादू पुन्हा चालणार का ? या प्रश्नाचे उत्तर मात्र जनताच देवू शकते. पण आपली जादू चालावी म्हणून मोदी ज्या-त्या राज्यात संभ्रम आणि चर्चेला विषय मात्र प्रत्येक सभेतून देवू लागले आहेत. वर्धा आणि गोंदियाच्या सभेने महाराष्ट्राला तो अनुभव दिला. भाजपचे बिनीचे शिलेदार असलेले नेते राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि विशेषत: अजित पवार यांच्यावर कायदेशीर कारवाईंचे अंदाजित वेळापत्रकच देवू लागले आहेत. तर आता त्यांचे राष्ट्रीय नेते आणि पंतप्रधान मोदीही तशाच विषयांवर आपल्या भाषणातून फुं कर घालू लागले आहेत. गोंदियाच्या सभेत बोलताना मोदींनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची सध्या झोप उडालेली आहे हे सांगताना त्याचे कारणही सांगून टाकले. तिहार जेलमध्ये जे आहेत ते काही बोलले तर कसे ? या प्रश्नाच्या धास्तीनेच राष्ट्रवादीच्या नेत्यांची झोप उडाल्याचे त्यांनी ठासून सांगितले. आता प्रश्न उरतो तो हा की तिहार जेलमध्ये कोण आहेत ? ते राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल नक्की काय सांगतील याची भिती राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते ?
देशाच्या पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याला गांभिर्याने घेतलेच जाते. आता नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उडालेल्या झोपेबद्दल आणि तिहार जेलच्या इशाऱ्याबद्दल केलेले वक्तव्य करमणूक म्हणून घ्यावे की तो कुणाला तरी दिलेला गर्भित इशारा म्हणून घ्यावे ?