योगेश गायकवाड, प्रोजेक्ट हेड, मालिका आणि चित्रपट निर्मिती क्षेत्र -साधारण दोन वर्षांपूर्वी एका मालिकेचा प्रोजेक्ट हेड म्हणून काम करीत असताना राजू साप्ते आमचा कला दिग्दर्शक होता. रोजचं शूटिंग सुरळीत पार पाडणं ही माझी जबाबदारी असल्याने बजेटवरून, डेडलाईन वरून राजू साप्ते आणि माझ्यात रोज तू तू मैं मैं व्हायची; पण राजू दादा कधीही त्याचं म्हणणं मोकळेपणाने मांडायचा नाही. कलाकार होता. चर्चा करण्यापेक्षा हातात ब्रश घेऊन सेट रंगविण्यात जास्त रमायचा. निर्मात्याचं काम अडू द्यायचा नाही; पण एके दिवशी राजू दादा भडकला आणि त्याने चिडून मला फोन केला, ‘बरोब्बर माझी आर्ट डिपार्टमेंटची पोरं जेवायला आली कीच कसं काय जेवण संपतं ? प्रॉडक्शन आहे की चेष्टा?’ सासवडसारख्या गावातल्या केटररला शूटिंगवाल्यांच्या खाण्याचा अंदाजच यायचा नाही. रंग, रॉकेलने माखलेले हात धुवून आर्ट डिपार्टमेंटची पोरं जेवायला येईपर्यंत पोळ्या संपलेल्या असायच्या. दर दोन-तीन दिवसांनी हा प्रकार ठरलेला. राजू दादाला अडचण समजावून सांगितल्यावर तो शांत झाला आणि दुसऱ्या दिवसापासून त्याच्या कामगारांच्या जेवणाच्या व्यवस्थेसाठी त्याने स्वखर्चाने एक माणूस नेमला. त्या संपूर्ण सिरिअलच्या शूटिंगदरम्यान मी एकदाच राजू दादाला चिडलेलं बघितलं; ते त्याच्या कामगारांच्या जेवणाच्या मुद्यावरून. असा माणूस कामगारांचा हक्क हिरावतो म्हणून युनियनने त्याच्या मागे तगादा लावावा, त्यातून राजू साप्ते यांच्यावर आत्महत्येची वेळ यावी हे खरोखर भीषण आहे.मनोरंजन धंद्याशी संबंधित व्यावहारिक गोष्टी जीव देण्याइतक्या मोठ्या कशा झाल्या?- पहिला दोष युनियन लीडर्सचा, ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये दहशत निर्माण केली आहे. चित्रपट कामगारांची युनियन ही सगळ्यात शक्तिशाली युनियन मानली जाते. कामगारांच्या हक्कासाठी आणि निर्मात्यांवर अंकुश ठेवण्यासाठी या युनियन्सची आवश्यकता असतेच; परंतु बहुतेक कामगार संघटनांप्रमाणे यांना पण ‘सेटिंग’ची कीड लागलेली आहे. शूटिंगचं बजेट आखतानाच प्रॉडक्शनवाल्यांना या ‘सेटिंग मनी’ची व्यवस्था करून ठेवावी लागते. कारण काहीतरी कारण काढून युनियनवाले सेटवर येतील आणि शूटिंग बंद पाडतील, ही दहशत आता या क्षेत्रात अंगवळणी पडली आहे. युनियनचे गुंड कामगारांच्या हक्कांसाठी भांडणाचा आव आणतात, मग प्रॉडक्शनशी सेटिंग करून कामगारांना वाऱ्यावर सोडतात. शेवटी कामगार आणि त्यांचा प्रमुख यांना एकत्र संसार करायचा असल्याने ते आपापसात जमवून घेतात. असंच जमवून घेणाऱ्या राजू साप्तेला या युनियनवाल्यांनी नाहक त्रास दिला आणि त्याचा जीव घेतला!- अर्थात सतत नामानिराळे राहणारे निर्माते आणि चॅनलवालेही जबाबदार आहेत. आपली ताकद दाखवून मध्यस्थी करण्यापेक्षा हे लोक थेट आर्ट डायरेक्टर बदलून टाकतात. राजूच्या बाबतीत पण तेच झालं. ‘आम्हाला हाच आर्ट डायरेक्टर हवा आहे. तुम्ही तुमचा विषय सेटल करा.’ अशी ठोस भूमिका निर्मिती संस्थांनी घेतली नाही, म्हणून त्यांचीही जबाबदारी नाकारता येणार नाही.एक सिरिअल चालली तर किमान १५० चुली वर्षभर तरी पेटत्या राहतात. तेव्हा आपला पोशिंदा जगला पाहिजे ही भावना सिने कामगारांचीही असली पाहिजे. बहुतेक मराठी कामगारांची तशी असते; परंतु ते युनियनच्या दहशतीला घाबरून असतात. उत्तर भारतीय कामगार या परप्रांतात घोळक्यात राहिलेलं बरं म्हणून युनियन सहन करीत राहतात. बाहेरची माणसं नेहमीच आपला गैरफायदा घेऊन आपलीच चूल बंद पाडतात, हे कामगारांनादेखील समजलं नाही म्हणून राजूच्या मृत्यूला काही प्रमाणात कामगारही जबाबदार आहेत.‘लोक तक्रार करीत नाहीत म्हणून आम्ही काही कारवाई करू शकत नाही’, अशी भूमिका घेणारे पोलीस आणि प्रशासकीय व्यवस्था हेही सारखेच दोषी आहेत! फिल्म/सिरिअल इंडस्ट्रीतले लोक तक्रार करायला का धजावत नाहीत ?- हा प्रश्न आदेश बांदेकर नांगरे पाटील यांना विचारतील का? आणि नांगरे पाटील तरी त्याचं खरं उत्तर देऊ शकतील का? सेलिब्रिटींचा कार्यक्रमात वापर करण्यापलीकडे पोलीसही फिल्म इंडस्ट्रीकडे आपणहून लक्ष देतील का? फिल्मी युनियनचे नेते कायद्यापेक्षा मोठे होऊ न देण्याची जबाबदारी आजवर प्रशासनाने निभावलेली नाही. म्हणून राजू साप्तेच्या आत्महत्येला अप्रत्यक्षपणे हे सारेच जबाबदार आहेत.सर्वांत महत्त्वाचा दोष आहे तो ‘धंदा कसा करावा?’ हे न समजणाऱ्या (विशेषत: मराठी) कलावंतांचा! आपलं काम इमानदारीत करण्याबरोबरच कर्ज घेणं, वसुली करणं, उधारी ठेवणं हेदेखील धंद्यातील व्यवहाराचे भाग आहेत. ते कधीही पर्सनली घ्यायचे नसतात. गुजराथी, मारवाडी मुलं शाळेत असल्यापासून गल्ल्यावर बसू लागतात आणि घरातूनच हे ट्रेनिंग घेऊन धंद्यात उतरतात; पण बहुतेक मराठी घरांमध्ये नोकऱ्या मिळेना म्हणून मुलं धंद्यात उतरतात; पण धंद्याचा ॲटिट्यूड शिकण्याची / शिकविण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याने ही मराठी मुलं तन-मन-धन गुंतवून व्यवसाय करतात आणि मग प्रोजेक्ट हातचं जाणं हा अपमान म्हणून जिवाला लावून घेतात. हातातले सगळे प्रोजेक्ट्स गेले तरीही ती गोष्ट जिवापेक्षा, लेकरं पोरकी करण्यापेक्षा मोठी अजिबात नसते. हा मंत्र राजू साप्ते यांना माहितीच नव्हता बहुतेक. युनियनचे गुंड निस्तरता येतात, त्यांना घाबरून किंवा कंटाळून चालायचं नाही, हे ट्रेनिंग आर्ट स्कूल देत नाही आणि व्यवस्थाही शिकवीत नाही. निदान इथून पुढे तरी हा मुद्दा परप्रांतीय कामगार नेते आणि मराठी माणूस असा अजिबात बघू नये. त्याने फक्त उलट बाजूने दहशत निर्माण होईल आणि त्यातून संघर्ष वाढत जाईल. त्यापेक्षा निर्मिती संस्था, विभाग प्रमुख, कामगार, तंत्रज्ञ, कलाकार, प्रशासकीय व्यवस्था या सगळ्यांनी आपापली जबाबदारी ओळखून समन्वयानं काम करावं. काम हातचं गेलं तर पुन्हा मिळतं, आपली माणसं विरोधात गेली तरी माघारी येऊ शकतात, धंदा करताना चढ-उतार आले तरी त्याने आपली इज्जत बिज्जत अजिबात जात नसते. गेली तरी परत मिळविता येते; पण पंख्याला लटकवून घेतलेला जीव परत आणता येत नसतो. yogmh15@gmail.com
सिनेमा, सिरिअल्स आणि दहशतीचा फास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 7:04 AM