मामांच्या राज्यात अमानुषपणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2023 07:32 AM2023-07-07T07:32:14+5:302023-07-07T07:32:26+5:30

सत्ता, संपत्ती, कथित प्रतिष्ठा आदींची नशा डोक्यात चढली की माणसाचा सद्सद्विवेक संपून जातो.

MP CM Shivraj Chouhan Washes Feet Of Man Who Was Urinated On | मामांच्या राज्यात अमानुषपणा

मामांच्या राज्यात अमानुषपणा

googlenewsNext

सत्ता, संपत्ती, कथित प्रतिष्ठा आदींची नशा डोक्यात चढली की माणसाचा सद्सद्विवेक संपून जातो. त्याची माणुसकी मरून जाते. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे हा साधा विचार त्याच्यापासून दूर जातो. भल्याबुऱ्याचे भान राहत नाही. तो आपल्यासारख्याच रक्तामांसाच्या माणसांशी जनावरांसारखा व्यवहार करतो. मध्य प्रदेशच्या पूर्व टोकावरच्या, बुंदेलखंडातील सीधी येथील एका संतापजनक प्रकरणाने पुन्हा या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. सत्ता-संपत्तीबरोबरच दारूची नशा चढलेला प्रवेश शुक्ला नावाचा मुजोर युवक सिगारेटचे झुरके मारत मध्यरात्री रस्त्याच्या कडेला एका घराच्या ओसरीवर बसलेल्या एका गरीब आदिवासी मजुराच्या अंगावर लघवी करतानाचा सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ हे असेच माणसुकीला काळिमा फासणारे उदाहरण आहे.

दशमत रावत हे त्या गरीब आदिवासी मजुराचे नाव. आपल्यावरील अत्याचाराचा प्रतिकार करण्याचीही हिंमत नसलेला गलितगात्र असा तो बिच्चारा. देशभर या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. स्वाभाविकच त्या प्रतिक्रियांचे लक्ष्य मुख्यत्वे मध्य प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आहेत. कारण, हा प्रवेश शुक्ला भाजपचा कार्यकर्ता आहे. सीधीचे भाजप आमदार केदारनाथ शुक्ला यांचा विधानसभा प्रतिनिधी म्हणून तो स्वत:ची ओळख सांगतो. पक्षाच्या राज्य व देशपातळीवरील अनेक नेत्यांसोबत त्याची छायाचित्रे उपलब्ध आहेत. थोडक्यात, त्याच्या डोक्यात सत्तेची, झालेच तर संपत्ती व बडेजावपणाची नशा आधीच आहे. त्याच्या जोडीला जातीय अहंकारही आहे. दलित, आदिवासी अशा दुबळ्या समाजातल्या तितक्याच दुबळ्या माणसांशी कसेही वागलो तरी आपले कोणीही काही बिघडवू शकत नाही, ही भावना त्याच अहंकारातून येते. म्हणूनच प्रकरण शक्य तितके दडपण्याचा प्रयत्न झाला. त्या प्रत्येक प्रयत्नावेळी राज्य सरकारची छी-थू झाली.

सुरुवातीला हा व्हिडीओ खोटा आहे, प्रवेश शुक्ला याने आपल्याशी असा काही अमानवी अत्याचार केलेलाच नाही, असे दशमतकडून प्रतिज्ञापत्रावर लिहून घेण्यात आले. टीका होताच गुन्हा दाखल झाला. पण, पुन्हा असे करण्याची कोणाची हिंमत होणार नाही अशी अद्दल घडविण्याऐवजी पोलिस त्याला सन्मानाने ठाण्यात घेऊन जात असल्याचे आणि त्याची घमेंड कायम असल्याचे दिसले. हा व्हिडीओ जुना आहे, असे म्हणून तो राजकारणासाठी पुढे आणला गेल्याचे सुचविण्याचाही प्रयत्न झाला. मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बुलडोझर संस्कृती पुढे चालविणारे भाजपचे आघाडीचे मुख्यमंत्री. खंडवा येथील दंगल किंवा अन्य गुन्ह्यांमध्ये त्यांनी न्यायालयात गुन्हे सिद्ध होण्याआधीच संशयितांच्या घरावर बुलडोझर चालविला आणि स्वत:ची छाती व पाठ थोपटून घेतली. पण, बहुतेक प्रकरणांमध्ये आरोपी अल्पसंख्याक असले की बुलडोझरचे स्वागत होते आणि तो उच्चवर्णीय हिंदू असला की कायद्याची व न्यायालयाची आठवण होते, हे या प्रकरणातही दिसले.

प्रवेश शुक्लाच्या घराचे फार मोठे नुकसान होऊ न देता पुढच्या भागाशी बुलडोझरने थोडीशी चुंबाचुंबी केली. हा सारा प्रकार सरकारची अब्रू चव्हाट्यावर मांडणारा ठरला आणि मग विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने शिवराजसिंह चौहान यांना धोक्याची जाणीव झाली. आधी पोलिस ठाण्यात नेताना आरोपीच्या राजकीय वजनाखाली असलेले पोलिस नंतर त्याची बकोटी धरून वैद्यकीय तपासणीसाठी नेताना दिसले. कायद्याच्या अंमलबजावणीत अशा कोलांटउड्या मारल्या गेल्या, तर राज्याचे मामा म्हणविणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी जे केले ते तर किळसवाणे आहे. त्यांनी जणू प्रवेशच्या अपराधाचे प्रायश्चित्त स्वत:च घेतले. दशमत रावतला थेट आपल्या निवासस्थानी आणून सन्मानाने खुर्चीवर बसवून चौहान यांनी त्याचे पाय धुतले-पुसले, गोड घास भरविला. शाल देऊन सत्कार केला.

संपूर्ण राज्याच्या वतीने माफी मागितली. दशमत आपला मित्र असल्याचे जाहीर केले. या साऱ्याचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यास ते विसरले नाहीत. ते हे मात्र विसरले, की असली नाटके राजकारणासाठीच केली जातात, हे जनतेला चांगले समजते आणि बुंद से गई वो हौद से नही आती. असो. सीधी, मध्य प्रदेश, शिवराजसिंह चौहान ही नावे प्रातिनिधिक आहेत. असे अमानवी वागण्याची कोणाची हिंमत होणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करणे म्हणजे सुशासन ही जाणीव सत्ताधाऱ्यांना होईल तेव्हाच कोण्या ‘दशमत’च्या वाट्याला अशा वेदना येणार नाहीत आणि कोणी ‘प्रवेश’ निर्माण होणार नाही.

Web Title: MP CM Shivraj Chouhan Washes Feet Of Man Who Was Urinated On

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.