- संदीपकुमार साळुंखे(वरिष्ठ सनदी अधिकारी) ‘एमपीएससी’च्या अधिकृत आकडेवारीनुसार गांभीर्याने पूर्वपरीक्षा देणाऱ्या उमेदवारांची दरवर्षीची सरासरी संख्या सुमारे ८ ते ९ लाख आहे. सर्व गंभीर उमेदवार महत्त्वाच्या सर्व पूर्वपरीक्षा देत असतील असे गृहीत धरले तरी अशा उमेदवारांची दरवर्षीची सरासरी संख्या सुमारे साडेतीन ते चार लाख आहे. हे चार लाख उमेदवार मिळून दरवर्षी सुमारे पाचेक हजार कोटींचा खर्च करतात आणि त्यातून किती जणांना प्रत्यक्ष नोकरी मिळते? तर जेमतेम पाचेक हजार- हे गणित आपण कालच्या पहिल्या लेखांकात पाहिले.पूर्वपरीक्षा हा विषय दरवर्षी किमान ४ लाख ते कमाल १० लाख तरुणांच्या आयुष्याशी तर मुख्य परीक्षा हा विषय केवळ आठ-दहा हजार तरुणांच्या आयुष्याशी निगडित आहे. म्हणून पूर्वपरीक्षेशी संबंधित शैक्षणिक, आर्थिक, साामाजिक आणि मानसिक बाबींवर समाजाने विचारमंथन करणे अत्यावश्यक आहे. पूर्वपरीक्षेचा मार्ग सुकर केला तर आपण दरवर्षी अनिश्चितता आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या या लाखो तरुण-तरुणींचे जीवन किमान काही प्रमाणात सुकर करू शकू.
सर्वांत आधी उमेदवारांचा या परीक्षांवरील खर्च कसा कमी करता येईल आणि त्याद्वारे गरीब, होतकरू उमेदवारांनांही शेष खर्च करण्याची गरज न पडता इतर आर्थिक स्थिती चांगल्या असणाऱ्या उमेदवारांबरोबर समान स्तरावर स्पर्धा करता येईल, हे पाहायला हवे.
सध्याचा राजपत्रित तसेच अराजपत्रित पूर्वपरीक्षेचा अभ्यासक्रम बऱ्यापैकी सीमारहित म्हणजे ओपन एंडेड आहे. अभ्यासक्रमाची पातळीदेखील बऱ्यापैकी व्यापक आहे. राज्यसेवा राजपत्रित पूर्वपरीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपरच्या प्रश्नांची पातळी ‘पदवी’ अशी आहे. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान अशा सर्व घटकांसाठी ‘पदवी’ पातळी घेतली आणि त्यात पुन्हा घटकाचे वर्णन जर खूप व्यापक असेल व स्पष्ट उपघटक दिलेले नसतील तर प्रश्न काढणाऱ्यांना अक्षरशः कोणतेही प्रश्न काढता येऊ शकतात आणि काही प्रमाणात तसे होतेही.
महाराष्ट्रामध्ये शेकडो विद्यापीठे आहेत आणि प्रत्येकाची वरील मुख्य विषयांची संदर्भ पुस्तके, अभ्यासक्रम व त्यांची काठीण्य पातळीही वेगवेगळी आहे. अशा अनिश्चिततेमुळे उमेदवारांना केवळ एकेका घटकासाठी अनेक पुस्तके वाचणे आणि क्लासेस लावणे अनिवार्य वाटायला लागते. एका विचित्र आगतिकतेतून विद्यार्थी एकेका विषयाची तीन-चार पुस्तके घेतात आणि वेगवेगळे ऑफलाइन वा ऑनलाइन क्लासेस लावतात व खर्च वाढत जातो. ज्यांची आर्थिक क्षमता आहे त्यांच्यासाठी हे ठीकच आहे; परंतु ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांनादेखील व्यवस्थित स्पर्धा करता यावी, हे याबाबतीत सुनिश्चित करणे महत्त्वाचे ठरते. शिवाय यातून गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून काही विशेष साध्य होते असे वाटत नाही. कारण कसेही प्रश्न काढले तरीसुद्धा जेवढ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी पात्र करायचे आहे तो आकडा आहे तेवढाच राहतो. प्रश्नपत्रिका कठीण असेल तर कट-ऑफ खाली येतो आणि सोपी असेल तर कट-ऑफ वर जातो; परंतु कठीण प्रश्नपत्रिका होती म्हणून कमी मुले मुख्य परीक्षेला पात्र झाली आणि सोपी प्रश्नपत्रिका होती म्हणून जास्त मुले पात्र झाली असे होत नाही. कारण पदांच्या साधारणतः २० ते २२ पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार असतातच.
म्हणून दोन गोष्टी करता येऊ शकतात- एक म्हणजे अभ्यासक्रमाच्या प्रत्येक घटकातील उपघटक स्पष्ट करून अभ्यासक्रम मर्यादित व निश्चित करणे आणि दुसरे म्हणजे दहावी-बारावीपर्यंतच्या काठीण्य पातळीसाठी अधिकृतरीत्या एसएससी बोर्डाची पुस्तके आणि पदवी स्तराच्या काठीण्य पातळीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची पुस्तके वापरली जातील हे स्पष्ट करणे. ही सर्व पुस्तके ही इंटरनेटवर पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. काही कारणास्तव असे अधिकृतरीत्या करणे शक्य नसेल तर किमान प्रश्नपत्रिका तशा तयार केल्या जातील हे सुनिश्चित केले तरी विद्यार्थ्यांचा त्यावर विश्वास बसेल.
ज्यांची इच्छा आणि क्षमता दोन्ही असतील ती मुले क्लासेस लावतीलच, अनेक पुस्तके घेतीलच; परंतु अभ्यासक्रमाची आणि संदर्भ पुस्तकांची स्पष्टता असली, किंवा प्रश्नपत्रिकांचा तसा अनुभव असला तर ज्यांची इच्छा नाही किंवा इच्छा आहे; परंतु क्षमता नाही; किंवा इच्छाही नाही व क्षमताही नाही, अशा गरीब होतकरू विद्यार्थ्यांना एक दिलासा मिळेल की, नेमून दिलेल्या पुस्तकातून अभ्यास केला तर ते इतर क्लास लावणाऱ्या आणि नेमून दिलेल्या पुस्तकांव्यतिरिक्त इतरही पुस्तके वाचणाऱ्या उमेदवारांच्या मानाने मी कमी पडणार नाही.
हल्ली अनेक गरीब पण हुशार विद्यार्थी पुस्तके व क्लासेसवरील खर्च परवडत नसल्याने स्पर्धेत मागे पडतात. म्हणजेच पुढे जाणारे विद्यार्थी हे परीक्षा देणाऱ्यांमधील सर्वोत्कृष्ट असतीलच असे नाही. मध्यंतरीच्या काळात नीट (NEET) परीक्षेच्या संदर्भात जो गोंधळ झाला त्याही वेळी तज्ज्ञांनी हेच अधोरेखित केले होते. यामुळे दर्जावर परिणाम होईल का? - त्याबद्दल उद्याच्या लेखात! sandipsalunkhe123@yahoo.com (लेखातील मते वैयक्तिक आहेत.)