आपले बॉस काही बोलत असतील तर सहसा त्यांच्या हो ला हो करावं, त्यांना प्रतिप्रश्न करू नयेत, तुम्ही खोटं बोलताय असं तर अजिबात म्हणू नये, नाही तर नोकरी आलीच धोक्यात, असा एक सर्वसामान्य अलिखित शिष्टाचार आहे. पण वाणिया अग्रवाल नावाच्या एका भारतीय अमेरिकन सॉफ्टवेअर इंजिनिअरने चक्क हा शिष्टाचार धाब्यावर बसवला आणि सत्या नाडेला, बिल गेट्स, स्टीव्ह बाल्मोर अशा मंडळींना शिंगावर घेतलं.
वाणिया ही गेलं दीड वर्ष अमेरिकेत मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत होती. मायक्रोसॉफ्टने नुकताच आपला ५० वा वर्धापन दिन साजरा केला. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सत्या नाडेला बोलत असताना त्यांना रोखून ‘तुम्ही सगळे ढोंगी आहात, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मानवजातीच्या भल्यासाठी करण्याच्या बाता करता, पण प्रत्यक्षात तिकडे गाझामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांचं जे शिरकाण चाललंय त्यासाठी इस्रायलला तुम्ही एआय तंत्रज्ञान पुरवत आहात’, असं सुनावण्याचं धाडस वाणियाने दाखवलं आहे. त्यामुळे अर्थातच मायक्रोसॉफ्टनं तिला नारळ दिला.
वाणियासह इब्तिहाल अबुसादनंही असंच धाडस केल्यामुळे तिलाही नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे. वाणियाने २०१६-१९ या काळात ॲरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीतून बॅचलर्स डिग्री घेतली. २०१७ मध्ये विद्यापीठाने तिला ‘ग्रेस हॉपर’ शिष्यवृत्ती प्रदान केली होती. यापूर्वी तिने ॲमेझॉनमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंटर्न म्हणून काम केलंय. २०२३ पासून ती मायक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत आहे. ‘ज्या कंपनीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून इस्रायल पॅलेस्टाईनमध्ये वंशसंहार घडवून आणत आहे, त्या कंपनीशी जोडलेलं राहणं हे माझ्या नैतिकतेला धरून नसल्यामुळे मी राजीनामा देत आहे’, असं वाणियाने स्पष्ट केलं आहे. वाणिया आणि इब्तिहाल या दोघीही वर्णभेदविरोधी विचारांच्या ‘No Azure for Apartheid’ नावाच्या गटाशी जोडलेल्या आहेत.