औरंगाबादला प्रयोग होता. तिथे त्याची पहिली ओळख झाली. त्या गोष्टीला आता २१ वर्षे झाली. त्यादिवशी तो जसा भेटला, तसाच आजही भेटतो. तितक्याच सहजपणे गप्पा मारतो. प्रशांत अवांतर विषयावरही बोलतो यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. कारण, प्रशांत फक्त व्यावसायिक गोष्टीविषयीच बोलतो, असा त्याच्याविषयीचा समज आहे. तो किती खरा, खोटा त्यालाच माहिती; पण असा स्वभाव होण्यालाही तुम्ही लोकच कारणीभूत आहात, असे तो मिश्किलपणे हसत सांगतोदेखील....
त्याच्याशी कमर्शियल टर्म्सवर बोलायला सोपे जाते. नाटकाचा प्रयोग करायच म्हटल्यावर नाटकाचे बुकिंग किती होणार..? कलावंतांना किती पैसे द्यावे लागतील ? किती प्रयोग झाले म्हणजे पैसे सुटतील, हा हिशोब तो गणिताचे पाढे म्हणावे तसा म्हणून दाखवतो. अवांतर विषय काढले की, अशा गोष्टींना वेळ आहे कुणाकडे असे म्हणून तो झुरळ झटकावा तसे झटकून मोकळा होतो. एखादी गोष्ट चालत नाही, असे त्याला कोणी सांगितले की, तो जिद्दीने ती गोष्ट करून दाखवतो. गेला माधव कुणीकडे' या नाटकाचे त्याने याच जिद्दीने १,८२२ प्रयोग केले. एखाद्या गावात त्याला कोणी त्याच्या नाटकाचा प्रयोग करतो का विचारल्यावर तो एकावर एक विकत... फुकट नाही... असे म्हणत, 'गेला माधव... 'चा प्रयोग लावतो.
त्याच्या कमर्शियल असण्यावर त्याच्याकडे चपखल उत्तर तयार असते. आम्हाला कोणी पेन्शन देत नाही. म्हातारपणी कलावंतांचे काय हाल होतात. आम्ही जोपर्यंत रंगमंचावर उभे आहोत, तोपर्यंत लोक आम्हाला पैसे देतील.! पुढे काय करायचे..? मग आता पैसे मागितले तर बिघडले कुठे... ? त्याच्या या उत्तरावर कोणी प्रत्युत्तर देत नाही. स्वार्थ आणि परमार्थ या दोन गोष्टींची सांगड घालावी तर प्रशांतनेच. मध्यंतरी निवृत्त सैनिकांच्या कल्याणनिधीसाठी त्याला गेला माधव कुणीकडे'चे प्रयोग करायचे होते. तेव्हा हा विभाग तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे होता.
आम्ही त्यांना भेटलो. त्या निधीसाठी प्रशांतने २३ प्रयोग केले. बारा ते पंधरा लाख उभे करून दिले. त्यावर काही जण म्हणतील, प्रशांतने देखील पैसे कमावले ना? तर त्याने कमावले, इतरांनाही मिळवून दिले, हे कोणी बोलत नाही. कोरोनाकाळात बॅकस्टेजच्या लोकांसाठी त्याने भरपूर काम केले. लॉकडाऊन कमी होत गेला. पण नाट्यगृहात प्रयोग करण्याची हिंमत कोणी करत नव्हते. तेव्हा प्रशांतने पुण्यात एका लग्नाची दुसरी गोष्ट'चा प्रयोग केला. हाऊसफुलचा बोर्ड झळकवला. त्यानंतर त्याला कोविड झाला तरीही न डगमगता त्याने त्यातून बरे होत पुन्हा प्रयोग सुरू ठेवले.
प्रशांतकडून एक गुण घेण्यासारखा आहे तो त्याचा नीटनेटकेपणा. घराच्या बाबतीत कदाचित हे विधान गौरी वहिनींना मान्य होणार नाही; पण आजवरच्या नाटकांचा हिशेब त्याला तोंडपाठ आहे. प्रत्येक गोष्ट तो नीट व्यवस्थित लिहून ठेवतो, नियोजन केल्याशिवाय तो कोणतीही गोष्ट करत नाही. त्यामुळे नाटकाचे किती प्रयोग केले, हे विचारले की तो क्षणात संपूर्ण यादी पाठवून देतो. नाटकासाठीची तिकीट विक्री रंगमंदिरावर होत असे. प्रशांतमुळे बुक माय शोसारख्या माध्यमातून नाटकाचे तिकीट विकत घेण्याची सवय लोकांना लागली.
एकाच दिवशी पाच नाटकं करणे असो किंवा अमुक नाटकाचे हजार प्रयोग... प्रशांत अशा विक्रमांमध्ये कधी गुंतला नाही. उलट त्यापुढे जाऊन तो सतत प्रयोग करत राहिला. गेली ३९ वर्षे तो वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग करत आहे. एका नाटकाचे तीन तास गृहीत धरले तर प्रशांतने ३७,५०० तास रंगभूमीवर घालवले आहेत. एवढा काळ त्याने लोकांना आनंद दिला. त्यांच्या टाळ्या ऐकल्या. त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. या काळात त्याने ३८ चित्रपट केले. १५ ते १६ मालिका केल्या. मात्र, तो रमला नाटकातच.
वयाच्या ६२ व्या वर्षांत त्याने भूमिकांमध्ये सहजपणे बदल करून घेतले. त्याच्याकडे बघितल्यानंतर तो एवढा मोठा असेल, असे वाटत नाही.अर्थात, वयापेक्षा तो कर्तृत्वाने खूप मोठा कलावंत आहे. एवढी वर्षे नाटकं करताना त्याने त्याचा गळा सांभाळला. फेब्रुवारी १९८३ मध्ये त्याने दूरदूरचा पहिला प्रयोग केला. तेव्हापासून तो सतत नाटक करत आहे. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी त्याचा १२,५०० वा प्रयोग होत आहे. नुसत्या नाटकांवर तुम्ही नावलौकिक मिळवू शकता. चांगले पैसेही कमावू शकता, हे सिद्ध करून दाखवणारा प्रशांत हा एकमेव नट आहे. तू सतत विनोदी नाटक का करतोस..?
या प्रश्नावर तो म्हणतो, दिवसभर तुम्ही दमून ऑफिसच्या कटकटीला वैतागून घरी येता आणि बायकोने गंभीर नाटक बघायला जायचे आहे असे सांगितले तर तुम्ही जाल का..? म्हणून मी विनोदी नाटक करतो. गंभीर विषयावरची नाटकं करणाऱ्यांना प्रशांतचा हा टोमणा आहे की नाही, हे त्यालाच माहिती; पण त्याला या रंगभूमीने 'सुख म्हणजे नक्की काय असतं', हे दाखवून दिले आहे. त्याच्याच शब्दात सांगायचे झाले तर मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, हवंय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो, आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं ...