- मिलिंद कुलकर्णीचार वर्षांपासून विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणाऱ्या राष्टÑवादी कॉंग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यासाठी अखेर कारभारी गवसले. अॅड.रवींद्र पाटील हे पक्षाचे हुकुमी एक्के आहेत. जिथे कमी तिथे आम्ही या न्यायाने शरद पवार आणि पक्ष हे जी जबाबदारी सोपवतील, ती प्रामाणिकपणे निभावण्याचे व्रत पाटील यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाळलेले आहे. सुरेशदादा जैन यांच्याविरुध्द जळगाव मतदारसंघाची निवडणूक असो की, मुक्ताईनगरात एकनाथराव खडसे यांच्याविरोधातील लढत असो, पक्षादेश पाळून पाटील रिंगणात उतरतात. जिल्हा परिषद, जिल्हा बँकेचा अनुभव गाठीशी असलेल्या पाटील यांचा स्वभाव मवाळ, सौजन्यशील आणि समन्वयवादी आहे. संत मुक्ताई संस्थानची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत असले तरी वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे पेलत आहेत. सातत्याने संत मुक्ताईचा गजर केला तरच आपण भक्त, वारकरी आहोत, असे न मानण्याची प्रगल्भता त्यांच्यात आहे. नवीन जबाबदारी निभावताना संत मुक्ताई त्यांना पावते काय, हे आता बघायचे. वडील एकनाथराव पाटील यांची पुण्याई पाठीशी असतानाही पाटील यांनी शरद पवार यांच्याशी कायम निष्ठा ठेवली. आमीषे, प्रलोभने त्यांना आली असतील, पण ती त्यांनी स्विकारली नाही, तसेच त्याची खाजगीतदेखील वाच्यता केलेली नाही. त्यांच्या याच गुणांमुळे पवार कुटुंबियांमधील सर्वच सदस्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. जळगावात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची शाखा स्थापन करण्याचा विषय आला तेव्हा पाटील यांचे नाव समितीत अग्रभागी होते. पाटील हे एक सज्जन राजकारणी आहेत. त्यामुळे निवड चांगली असली तरीही पक्षाला सद्य स्थितीत आक्रमक नेतृत्वाची आवश्यकता आहे, हे विसरुन चालणार नाही. पाटील यांची निवड का झाली असावी,याविषयी राजकीय वर्तुळात जे अंदाज व्यक्त केले जातात, ते पाहता पक्षात नेते खूप आहेत आणि सगळ्यांची तोंडे परस्परविरोधी आहेत. पक्षाला या नेत्यांमध्ये समन्वय साधणारे नेतृत्व हवे आहे, त्या निकषामध्ये रवींद्र पाटील बसतात. विलास भाऊलाल पाटील यांच्यारुपाने अभ्यासू आणि तळमळीचा कार्यकर्ता जिल्हाध्यक्षांना सहकारी म्हणून मिळाला आहे. मात्र जळगावच्या अध्यक्षाचा शोध अद्याप संपलेला नाही.
मुक्ताई पावेल?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:04 PM