- अमित शहाआपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६९वा वाढदिवस. मोदीजींनी बालपणापासूनच स्वत:ला देशसेवेसाठी समर्पित केले आहे. पददलितांच्या उन्नतीसाठी झटण्याचा त्यांचा ओढा तरुण वयातच दिसून आला. मोदीजींचे बालपण खूप कष्टात गेले, त्यामुळे त्यांना गरिबांसाठी काम करण्याची व त्यांना दारिद्र्याच्या शृंखला तोडण्यास मदत करण्याची स्फूर्ती मिळाली.सर्वांना मदत करण्याचा आणि मानवतेची मनापासून सेवा करण्याचा मोदीजींचा स्वभाव आहेच. त्याशिवाय उत्तम संघटनकौशल्य व अविचल राजकीय मनोधैर्य यासाठीही त्यांची ख्याती आहे. सन १९८७ मध्ये त्यांना पक्षाने गुजरातमध्ये संघटन सचिव नेमले तेव्हा राज्य विधानसभेत भाजपचे फक्त १२ आमदार निवडून आले होते. पण मोदीजींचे संघटनचातुर्य व राजकीय कौशल्याच्या जोरावर १९९० च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ६७ जागा जिंकल्या. त्यानंतर १९९५ मध्ये भाजपने विधानसभेच्या १२१ जागा जिंकून गुजरातमध्ये प्रथमच सरकार स्थापन केले. तेव्हापासून भाजप गुजरातमध्ये अजिंक्य राहिला. आज गुजरातमध्ये भाजप एक प्रबळ राजकीय शक्ती म्हणून उभी राहिली आहे. मोदीजींनी रचलेला मजबूत संघटनात्मक पाया व त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी केलेली विकासाची कामे यामुळेच हे शक्य झाले. मोदीजींना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही मोलाची कामगिरी करून पक्षाच्या देशव्यापी विस्ताराचे बीजारोपण केले. आज भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष होऊ शकला तो मोदीजींच्या दूरदृष्टीमुळेच.मलाही १९९० च्या दशकात गुजरातमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली पक्षासाठी काम करण्याची संधी मिळाली. मला आठवते की, त्या वेळी गुजरातमध्ये भाजपची व्यापक आणि सर्वंकष सदस्यत्व मोहीम राबविली गेली होती. मोदीजींनी ही मोहीम ज्याप्रकारे अगदी तळागाळापर्यंत राबविली तो पक्ष कार्यकर्त्यांना एक उत्तम धडा होता व मलाही त्यातून खूप शिकायला मिळाले.सन २००१ मध्ये मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हापासून त्या राज्याच्या विकासाला एक अभूतपूर्व अशी वेगळीच दिशा मिळाली. जे राबविणे शक्य नाही असे वाटत होते असे अनेक कार्यक्रम व योजना त्या वेळी मोदीजींनी राबविल्या. गुजरातमधील प्रत्येक घराला अहोरात्र विनाखंड वीजपुरवठा करण्याचे त्यांनी ठरविले तेव्हा त्यांच्यावर कोणी विश्वासही ठेवायला तयार नव्हते. पण प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, दृढनिश्चय व जनतेसाठी झटण्याची तळमळ या जोरावर मोदीजींनी ते स्वप्न साकार केले आणि इच्छा असेल तर नक्की मार्ग काढता येतो याची प्रचिती जगाला दिली. एखादी गोष्ट मनात ठरविली की ती पूर्ण करण्याच्या मोदीजींच्या कार्यशैलीमुळे गुजरातचा कायापालट झाला.मोदीजींच्या नेतृत्वाखाली यशस्वी झालेल्या विकासाच्या गुजरात मॉडेलचा भाजपला पुढे संपूर्ण देशात फायदा झाला. खंबीर नेतृत्व असेल तर कल्याणकारी शासन शक्य आहे, हा संदेश त्यातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकला. गुजरातच्या विकासगाथेने देशभर भाजपसाठी अनुकूलता निर्माण झाली. त्यातून पुढे जनतेने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संपुआ’च्या भ्रष्ट, निर्विकार व अकार्यक्षम सरकारला पदच्यूत करून मोदींच्या बाजूने निर्णायक कौल दिला.प्रस्थापित व्यवस्थेला धक्का दिला की, इच्छित परिणाम नक्की साधता येतो, यावर मोदीजींचा ठाम विश्वास आहे. ‘व्होटबँक’ दुखावण्यातील धोके लक्षात घेता मुस्लीम महिलांना अन्यायापासून मुक्ती देण्यासाठी ‘तिहेरी तलाक’ बंदीचा कायदा करण्याचे किंवा जम्मू-काश्मीरला पूर्णांशाने मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामावून घेण्यासाठी अनुच्छेद ३७० रद्द करण्याचे धाडस एखादा राजकीय पक्ष करू शकेल, असे कधी कोणाच्या मनातही आले नसेल.राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात नागरिकांना सक्रियतेने सामावून घेण्यावर मोदीजींचा नेहमीच भर असतो. म्हणूनच सन २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यावर लगेचच त्यांनी ‘स्वच्छ भारत’साठी स्वत: हाती झाडू घेतला. आज ‘स्वच्छ भारत’ ही एक राष्ट्रीय चळवळ झाली आहे. त्याच धर्तीवर मोदीजींनी आता आपणा सर्वांना भारत प्लॅस्टिकमुक्त करण्याची हाक दिली आहे. यातही आपण नक्की यशस्वी होऊ, याची मला पक्की खात्री आहे. सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची क्षमता हे मोदीजींच्या शासनशैलीचे आणखी एक ठळक वैशिष्ट्य. म्हणून ते जेव्हा बोलतात तेव्हा लोक नुसते ऐकत नाहीत तर त्यांच्यावर विश्वास ठेवतात व त्यांच्या पाठीशी उभे राहतात.आपल्या पंतप्रधानांकडे जसा पक्का निग्रह आहे तसाच असीम संयमही आहे. ते अत्यंत खंबीरपणे निर्णय घेतात. मोदीजी सर्वसंमतीने काम करणे पसंत करतात व त्यासाठी विचारांचे मोकळेपणाने आदान-प्रदान करण्यास प्रोत्साहन देतात. भारताची गौरवशाली सांस्कृतिक परंपरा दिमाखाने पुनर्प्रस्थापित करण्यासाठी व भारताला एक समतावादी समाज बनविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या नेत्याच्या हाताखाली काम करायला मिळणे ही आम्हा मंडळींसाठी गौरवाची गोष्ट आहे. मी मोदीजींना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. मातृभूमी व मानवतेची सेवा करण्याचे त्यांना अधिक बळ लाभो, अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो.
(केंद्रीय गृहमंत्री)