सध्या महाराष्ट्रात घडत असलेल्या घटना-घडामोडी या महाराष्ट्राच्या परंपरेला अन् प्रतिष्ठेला शोभा देणाऱ्या नाहीत. आपल्या मागण्या व भावना राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सकल मराठा समाजाने याच राज्यात संयम, शिस्त आणि विराटतेचे दर्शन घडविले होते. त्याच राज्यात मागील काही दिवसात मराठा समाजाच्या विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढी वारीच्या महापूजेला रोखण्यापासून ते महाराष्ट्र बंद करण्यापर्यंतचे मार्ग या आंदोलनात अवलंबिले जात आहेत. आंदोलनाच्या याच प्रवासात काकासाहेब शिंदे या मराठवाड्यातील तरुणाचा बळी गेला. राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा अन्वयार्थ प्रत्येकजण स्वत:च्या सोईने काढताना दिसतो. कोण काय अर्थ काढतो, यात आम्हाला रस नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्य घटनेतील कायद्याच्या चौकटीतील कोणत्याही जातीच्या आरक्षणाचे आम्ही नेहमीच ठोस समर्थन केलेले आहे. त्याच चौकटीत आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचे देखील समर्थनच करतो. पण सध्या राज्यात ज्या घटनांची मालिका चालू आहे, त्याकडे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.
केवळ विधिमंडळ आणि उपलब्ध होणाऱ्या व्यासपीठावरून मराठा आरक्षण समर्थनाची शाब्दिक उधळण करणे किंवा कागदी घोडे नाचविणे आता देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी थांबविले पाहिजे. सर्वच राजकीय मंडळी आणि राज्यकर्ते वर्षानुवर्षे मराठा आरक्षणाचे समर्थन करीत आलेले आहेतच! सर्वांची भाषा समर्थनाची पण समाजाच्या पदरात मात्र काहीच नाही, ही भावना मराठा समाजात वाढीस लागल्यामुळेच आज परिस्थिती चिघळली आहे. केवळ तांत्रिक मुद्दे उपस्थित करून चालढकल केली जात असल्याचा संदेश मराठा समाजात रुजतो आहे. अशा परिस्थितीत विश्वासार्ह संवाद आणि त्याला अनुसरून कृती एवढा एकच मार्ग उरतो !
मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर, भाजपाचे खासदार संभाजीराजे छत्रपती तसेच मराठा समाजाबरोबरच सर्वच घटकांना संंयमाचे आवाहन करणाऱ्या विविध मराठा संघटनांच्या नेत्यांचे आम्ही राज्यातील जनतेच्यावतीने आभार मानू. त्यांचे संयम व शांततेचे आवाहन सौहार्दाचे वातावरण निर्माण करण्यास बळकटी देणारे आहे. राज्यातील सर्व पक्षांच्या मराठा नेत्यांना एकत्र करून मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधावा, अशी खा.संभाजीराजे यांची भूमिका निश्चितच चांगली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने नेमलेल्या ‘राणे समिती’चे प्रमुख व विद्यमान खा. नारायण राणे यांनीही संयम व समन्वयवादी भूमिका घेऊन समाजापुढे यायला हवे. मराठा क्रांती मूकमोर्चानंतर फडणवीस सरकारने त्या समाजाला दिलेल्या अभिवचनांचा केवळ पाढा न वाचता केलेल्या कृतींचा लेखा-जोखा मांडला जावा. राज्यात होणाऱ्या ७२ हजार जागांच्या मेगा नोकर भरतीत मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात जाहीर केलेला मराठा समाजासाठीचा १६ टक्के ‘बॅकलॉग’ कायद्याच्या कसोटीवर घासून-पुसून जनतेपुढे मांडावा. खरे तर मराठा समाजाच्या तुळजापूरला सुरू झालेल्या आंदोलनापासूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाव्य परिस्थितीचा अंदाज घ्यायला हवा होता. आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध संघटनांच्या नेत्यांना सन्मानपूर्वक बोलावून संवाद साधायला हवा होता. तसे घडले नाही. आता ती चूक सुधारून संवादाची मोहीम सुरू करावी. त्यातूनच शांततेचा व सामजंस्याचा सर्वमान्य मार्ग सापडेल. वेळकाढूपणा परवडणारा नाही. पुरोगामी महाराष्ट्रातील केवळ मराठाच नव्हे तर तमाम जनतेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तशी अपेक्षा आहे. म्हणूनच... फडणवीस जागे व्हा!