भर दिवसा कचरा वाहून नेणाºया गाड्या रद्दीच्या दुकानापुढे उभ्या करून गाडीतले कागदी पुठ्ठे, खोके रद्दीवाल्यांना विकले जातात, त्यावर वॉर्डआॅफिसर गप्प बसतात, आयुक्त कानाडोळा करतात, असल्या कारभाराकडून अपेक्षा तरी काय ठेवायच्या?आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह मॅनहोलमधे वाहून गेला, आणि महानगरपालिकेच्या कारभाराची लक्तरे पुन्हा एकदा वेशीवर टांगली गेली. पाऊस वाढला व त्याचवेळी भरती असेल तर मुंबईच्या सखल भागात हमखास पाणी साचते. त्यावेळी मॅनहोलची झाकणे काढली जातात. त्याच्याभोवती एखादा माणूस उभा रहातो किंवा लाल रंगाचा झेंडा, धोक्याची सूचना देणारे फलक तेथे लावले जातात. यात नवीन काहीच नाही, मात्र यापैकी कोणतीही गोष्ट २९ तारखेच्या पावसात मुंबईत घडली नाही. मॅनहोलची झाकणे खुशाल उघडून देण्यात आली. त्यात डॉ. दीपक अमरापूकर वाहून गेले. डॉक्टरांच्या जाण्याने मुंबई महापालिकेची प्रतिष्ठाही वाहून गेली.पोटाच्या विकारावर उपचार करणारे डॉक्टर अमरापूरकर हे जागतिक कीर्तीचे डॉक्टर होते. त्यांचा नावलौकिक देशभर आणि जगात होता. शेकडो, हजारो रुग्णांचा ते आधार होते. ज्या कोणाला त्यांच्या मृत्यूची बातमी कळाली त्या प्रत्येकाने ‘कसा काय मृत्यू झाला?’ असा पहिला प्रश्न केला आणि त्या सगळ्यांना एकच उत्तर दिले गेले... ‘पावसात मॅनहोलचे झाकण उघडे केले गेले आणि त्यात पडून डॉक्टर गेले...’ या उत्तराने मुंबई महापालिकेचा ‘गौरव’ जगभर गेला. २५ वर्षे महापालिकेत शिवसेना भाजपाची एकहाती सत्ता असताना हे कारभारी ड्रेनेजचे मॅनहोलही नीट ठेवू शकले नाहीत. आता कारणांच्या समर्थनार्थ शेकडो गोष्टी सांगितल्या जातील. पण गेलेली इभ्रत कधीच येणार नाही. जगातल्या कोणत्याही प्रगत शहरात अशा घटना घडत नाहीत. घडल्याच तर त्यानंतर उमटणाºया प्रतिक्रिया देखील तेवढ्याच तीव्र असतात आणि होणारी कारवाईदेखील तेवढीच कठोर..! मुंबईत याआधी असा पाऊस झाला नाही असे नाही. अनेकवेळा मुंबई तुंबली. पण त्या त्यावेळचे आयुक्त कसे वागतात यावर खालचे प्रशासन चालत असते. जॉनी जोसेफ आयुक्त असताना मुंबई तुंबल्याचे कळताच जोसेफ स्वत: रेनकोट घालून पावसात रस्त्यावर जाऊन उभे राहायचे. आयुक्त स्वत: रस्त्यावर उतरल्याचे पाहून खालची यंत्रणाही कामाला लागायची.डॉ. अमरापूरकर यांच्या घटनेनंतर याची चौकशी करावी, नेमके काय घडले हे तपासावे, यातील दोषींना शिक्षा करावी, संबंधित वॉर्ड आॅफिसरला जाब विचारावा असा विचारही महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना स्पर्श करून गेला नाही. तद्दन फिल्मी डॉयलॉग मारत फिरणाºया महापौरांनादेखील यावर संवेदना तरी व्यक्त करावी असेही वाटले नाही. बथ्थड डोक्याने दोन दिवस शांत बसून सगळे मुंबईकरांच्या स्पिरिटचे कौतुक करत बसले. इतक्या सगळ्यांच्या संवेदना बोथट झाल्याचे समोर आले. अखेर महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाºयांवर निष्काळजीचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका घेऊन फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन उच्च न्यायालयात गेल्यानंतर पालिकेला जाग आली. घाईघाईत मग पालिकेने सहआयुक्तांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमल्याचे घोषित केले. शिवाय मॅनहोलचे झाकण आम्ही नाही तर कोणीतरी उघडल्याचे सांगून चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही हेही स्पष्ट करून टाकले. कशासाठी ही असली नाटकं करता..? निदान जनतेला मूर्ख बनवण्याचे घाऊक क्लासेस तरी सुरू करा.६० हजार कोटींच्या ठेवी असणाºया श्रीमंत महापालिकेची रस्ते, पाणी, आरोग्य या मूलभूत गरजांविषयीची ही अनास्था चीड आणणारी आहे. वॉर्ड आॅफिसरवर कोणाचेही नियंत्रण नाही. गल्लोगल्ली कचºयाचे ढीग साचतात, लोखंड विकण्यासाठी ड्रेनेजची झाकणं चोरून नेली जातात, गोळा होणाºया कचºयातील खोके, कागद, पुठ्ठे भर दिवसा रद्दीवाल्यांना विकण्याचे काम सफाई कर्मचारी करतात, पेव्हर ब्लॉकच्या नावाखाली पैसे कमावण्याचा गोरख धंदा चालतो, खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी खर्च होतात. एवढे विषय असताना अशा एका डॉक्टरचा बळी कुठे चर्चेचा विषय असतो का..?
गेंड्याच्या कातडीची मुंबई महापालिका
By अतुल कुलकर्णी | Published: September 04, 2017 12:45 AM