- विनायक पात्रुडकर
काही वर्षांपूर्वी प्राणी मित्र संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली होती. चौपाट्यांवर व लग्नाच्या वरातीमध्ये वापरल्या जाणाऱ्या घोड्यांवर बंदी आणावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. मुंबईतील वाहतूक कोंडी, घोड्यांची होणारी दुरवस्था, याचे अनेक दाखल न्यायालयात सादर झाले. याची दखल घेत अखेर न्यायालयाने चौपाट्यांवरील व वरातीमधील घोड्यांवर बंदी आणली. याप्रकरणात मुंबई पोलीसदेखील याचिककार्त्यांच्या बाजूने उभे राहिले होते. मुंबईच्या रस्त्यांवर घोडे चालवण्यास मनाई करावी, अशी भूमिका पोलिसांनी न्यायालयात मांडली होती. आता हेच पोलीस दल मुंबईकरांच्या सेवेसाठी घोडदळ घेऊन येणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. इतिहासाच्या पुस्तकात ओझरता उल्लेख मुंबईतील घोडदळाचा आहे. ब्रिटीश काळात १९३२ पर्यंत मुंबई पोलीस दलात घोडदळ होते. पोलीस दलाने हळूहळू कात टाकायला सुरूवात केली आणि घोडदळ हद्दपार झाले. मुंबईतील वाढती लोकसंख्या, वाहने, ही दोन कारणे घोडदळ बंद होण्यासाठी पुरेशी होती. असे असताना पुन्हा घोडदळाचा घाट कोणी घातला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. घोडदळाचा प्रस्ताव १९९० साली मांडण्यात आला. त्यावर सविस्तर चर्चाही झाली. मुंबईतील वाहतूक कोंडी, वाढती लोकसंख्या हेच दोन मुद्दे प्रामुख्याने चर्चेला आले आणि घोडदळ नको, अशी भूमिका काही सनदी अधिकाऱ्यांनी मांडली. काही अधिकाऱ्यांनी घोडदळाचा हट्ट धरला. त्यासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद करून घेतली. त्यामुळे घोडदळाची खरच गरज होती का? की काही अधिकाऱ्यांची आवड म्हणून हा प्रस्ताव मंजूर झाला, असा प्रश्न पडला तर वावगे ठरणार नाही.ज्या पोलिसांनी वाहतूक कोंडीचे कारण देत मुंबईतील घोडे हद्दपार करा, असे म्हटले होते, तेच आता घोडदळ आणणार आहेत. घोडदळ नेमक्या कोणत्या विभागात कार्यरत असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घोडदळ नुसती गस्त घालणार की आरोपींच्या मागे पण धावणार हा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. घोडदळावर कोट्यवधी रूपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे घोड्यांची काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा करता येईल. मात्र घोडदळ कार्यरत असताना घोड्याला गर्दीचा त्रास झाला किंवा त्याला कोणी त्रास दिला आणि तो सैरभैर झाला तर होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार हे आताच ठरवायला हवे. कारण घोडा सैरभैर होऊ शकतो, अशी शक्यताही काही तज्ज्ञांनी हा प्रस्ताव नाकारताना व्यक्त करताना केली होती. त्यामुळे घोडदळाचे भवितव्य काय असेल हे येणारा काळच ठरवेल.