गेल्या शुक्रवारी नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीच मुंबईच्या उपनगरी रेल्वेमार्गावरील गोंधळानं वृत्तपत्रांचे मथळे गाजवले आणि वृत्तवाहिन्यांवरील चर्चांत चघळायला एक नवा विषय मिळवून दिला. मात्र त्यानंतर दोनच दिवसांनी मुंबईत रविवारी, ४ जानेवारी रोजी रात्री जे घडलं, त्यावर वृत्तवाहिन्यांनी भाष्य तर सोडाच, पण त्याची साधी बातमीही दिली नाही. आता रविवारनंतर तीन-चार दिवसांनी काय घडलं, कसं घडलं इत्यादी तपशील देणाऱ्या बातम्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. वृत्तवाहिन्यांनी या विषयाला हातही लावलेला नाही.पहिल्या २ जानेवारीच्या घटनेनं मुंबईसारख्या महानगरातील वाहतूक व्यवस्था कशी अपुरी, कोलमडण्याच्या अवस्थेतील व बेभरवशाची झाली आहे आणि प्रशासन व पोलीस किती ढिसाळ आहेत, याचा प्रत्यय मुंबईकरांना आणून दिला. नागरिकांच्या संयमशीलतेचा अंत झाला की, मुंबई कशी पेटून उठते, हेही पहायला मिळालं. तसंच दुसऱ्या घटनेनं १९९२-९३ च्या दंगलीनंतर मुंबईत ‘ते व आम्ही’ अशी जी अदृश्य भिंत जनमानसात उभी राहिली आहे, त्याचा परिणाम म्हणून एखाद्या शुल्लक घटनेमुळंही वातावरण किती स्फोटक बनू शकतं, याचे प्रत्यंतर आले. केवळ पोलीस व प्रशासन या दोघांनी प्रसंगावधानता दाखवल्यामुळं मुंबई आणि देशही एका मोठ्या जातीयवादी दंगलीपासून वाचला.मुंबईत असंतोषाचा ज्वालामुखी कसा धगधगत आहे आणि त्याचा स्फोट कधीही, कोणत्याही कारणानं कसा होऊ शकतो, याची प्रचिती या दोन घटनांनी आणून दिली. देशात १०० नव्या ‘स्मार्ट सिटीज्’ उभ्या करण्याचा संकल्प आज सोडण्यात आला आहे. पण ‘शहर’ कसं चालवू नये, हे या दोन घटनांनी जे दाखवून दिलं, त्यापासून आपण या ‘स्मार्ट सिटीज’ वसवताना काही धडा घेणार आहोत की, नुसत्या ‘आधुनिक’तेच्या मागं लागून नवनवे ‘ज्वालामुखी’ निर्माण करणार आहोत, असा प्रश्न या दोन घटनांनी ऐरणीवर आणला आहे.मुंबईकर २ जानेवारीला रस्त्यावर का उतरले? कारण साधं होतं. ते म्हणजे उपनगरी गाड्या वेळेवर चालवा आणि काही बिघाड झाला, सेवा विस्कळीत झाली, तर त्याची योग्य माहिती प्रवाशांना देण्याची व्यवस्था करा, इतकीच मुंबईकरांची माफक अपेक्षा होती, आहे व असणार आहे. तीही पुरी होताना दिसत नाही आणि हातावर पोट असणाऱ्यांना आठवड्यातून तीनदा रोजगार बुडण्याची वेळ आली, तेव्हा असंतोषाचा कडेलोट झाला. ‘शहर’ कसं चालवायचं याविषयीचं पूर्ण अज्ञान आणि ‘शहर’ म्हणजे पैशाच्या थैल्या भरण्याचं एक चांगलं साधन अशी लोकप्रतिनिधींनी करून घेतलेली ठाम समजून या दोन गोष्टी मुंबईकरांची ही साधी अपेक्षाही पुरी करण्याच्या आड येत आहेत.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून हे महानगर म्हणजे राजकारण्यांच्या दृष्टीनं सोन्याची अंडी देणारे एक कोंबडी बनलं आहे. हाव सुटल्यासारखं राजकारणी मंडळी या शहराला ओरपून खात आहेत. त्यापायी मुंबईकरांचं जीवन निकृष्ट व भरड बनत गेल्याची पुसटशीही पर्वा या मंडळीना नाही. मग सरकार कोणाचंही असो. मुंबईकरांच्या जीवनात फरक काहीच पडलेला नाही.या बेपर्वाईबद्दलची चीड गेल्या शुक्रवारी मध्य रेल्वेची उपनगरी सेवा विस्कळीत होण्याच्या निमित्तानं उफाळून आली.बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर मुंबईत डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ मध्ये ज्या दंगली झाल्या, त्यामुळं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या शहरातील समाजजीवन किती ठिसूळ पायावर उभं आहे, हे दिसून आलं होतं. या महानगराची ‘हिंदू’ व ‘मुस्लीम’ अशी विभागणीच या घटनांनी घडवून आणली. विविध जाती, जमाती, धार्मिक व वांशिक गट यांची सरमिसळ हे महानगरीय जीवनाचं वैशिष्ट्य असतं. तेच या दंगलींमुळे नष्ट झाले. त्यात पुढे ‘मराठी’ व ‘भय्ये’ अशी आणखी एक उपविभागणीय कौटुंबिक व राजकारणातील वर्चस्वासाठी गेल्या १०-१५ वर्षांत घडवून आणण्यात आली. आता गेल्या वर्षीच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर ‘मराठी’ व ‘गुजराती’ असा एक सुप्त संघर्ष मुंबईत सुरू झाला आहे. या साऱ्या घटनांमुळे मुंबईतील जनजीवनाची जी एक घट्ठ वीण होती, या जनजीवनाचा जो सशक्त पोत होता तो आता पार विस्कटून गेला आहे. मुंबईत वरकरणी जरी सारं आलबेल दिसत असंल, घड्याळाच्या काट्यानुसार मुंबर्स २४ चालत असली, तरी थोडं बारकाईनं बघितलं, तर मुंबईकरांच्या मनात एक अवस्वस्थता, अनिश्चितता, एक भयगंड असल्याचं जाणवत राहतं. या सगळ्या मनोव्यापाराची तीव्रता महाराष्ट्रातील व एकूणच देशातील राजकारण जसं वळणं घेतं, तशी कमी जास्त होत असते; कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानं त्यावर ताबा मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांत चढाओढ लागलेली असते. त्यापायी या महानगरातील जनजीवन विस्कटलं, समाजमनातील अदृश्य भिंती आणखी उंचावत जाऊन भक्कम होत गेल्या, लोकांचे बळी पडले, तरी त्याची या राजकारण्यांना पर्वा नसते. गेल्या दोन तीन दशकांतील हा अनुभव मुंबईकरांच्या गाठीला आहे.मुंबईत रविवारी, ४ जानेवारीला जी ‘दंगल’ झाली नाही, त्यास राज्यातील व देशातील हे विधिनिषेशून्य राजकारण पूर्णत: जबाबदार आहे. बाबरी मशीद पाडण्याच्या राजकारणाचा फायदा उठवून पाकच्या ‘आयएसआय’नं दाऊद इब्राहिमच्या माफिया टोळीच्या मदतीनं मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवून आणले. आता २४ वर्षांनी भारत व पाक यांच्यात ‘जशास तसं’ उत्तर देण्याची स्पर्धा लागलेली आहे. अशावेळी जर पाकनं येथील गुड टोळ्या व जहालांच्या मदतीनं मुंबईच्या समाजजीवनात उभ्या राहिलेल्या अदृश्य भितींच्या आडून काडी टाकली, तर या धगधगत्या ज्वालामुखीचा स्फोट होऊन काय घडेल?ज्या मुंबईकरांनी १९९२-९३ अनुभवलं, त्यांच्या अंगावर या नुसत्या कल्पनेनंही काटा येईल. प्रकाश बाळ
धगधगत्या ज्वालामुखीच्या तोंडावर मुंबई
By admin | Published: January 07, 2015 10:40 PM