अमर शैला, प्रतिनिधीमागील महिन्यात मुंबईमेट्रो ३ मार्गिकेच्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्यातील १२.६९ किमी लांबीच्या मार्गाचे लोकार्पण झाले. अडीच वर्षांहून अधिक विलंबानंतर का होईना कुलाबा ते आरे मेट्रो तीन मार्गिकेचा पहिला टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. मात्र, या पहिल्या टप्प्यातील मार्गाला बिघाडाचे ग्रहण लागले आहे. महिनाभरात दोन वेळा गाडी एकाच जागी काही काळासाठी बंद पडली.
मेट्रो ३ चा पहिला टप्पा ७ ऑक्टोबरपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. मेट्रो सुरू होऊन दोन दिवस होत नाहीत तोच या मेट्रोवरील सेवा ९ ऑक्टोबरला अर्ध्या तासासाठी विस्कळीत झाली. तांत्रिक बिघाडामुळे एक गाडी सहार स्थानकात अर्धा तास अडकून पडली होती. परिणामी सर्व मार्गावरील सेवा बाधित झाली. अशीच घटना मागील आठवड्यात शनिवारी घडली. दोन स्टेशनच्या दरम्यान बोगद्यात मेट्रो गाडी २० मिनिटे बंद पडली. यावेळी प्रवाशांना माहिती मिळत नसल्याने त्यांचा ताण वाढला. याबाबत प्रवाशांनी नाराजीही व्यक्त केली होती. या मोठ्या घटना असतानाच तांत्रिक बिघाडाच्या अन्य छोट्या घटना घडून मेट्रो गाडी काही मिनिटे थांबल्याचे प्रकारही घडले. या प्रत्येक घटनेला मेट्रो प्रशासनाकडून केवळ तांत्रिक बिघाड हेच कारण दिले जाते. मात्र, नक्की कशामुळे हे बिघाड झाले याबाबत समाधानकारक माहिती दिली जात नाही. त्यातून प्रवाशांच्या गोंधळात भर पडते. मेट्रो मार्गिका सुरू होऊन अवघ्या महिनाभरातच असे प्रकार घडत असल्याने मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने घाईत मेट्रो सुरू झाली. मात्र, या मार्गिकेवरील काही स्टेशनच्या प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या मार्गांची काही कामे अद्याप बाकी आहेत. परवाच या प्रवेशद्वाराची कामे सुरू असलेल्या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. बीकेसी स्थानकातील एका निर्माणाधीन प्रवेशद्वाराच्या भागात ठेवलेल्या लाकडी साहित्याला आग लागून त्याचा धूर मेट्रो स्टेशनमध्ये पसरला. त्यातून दीड ते दोन तासांसाठी मेट्रो स्थानक बंद करावे लागले. दुपारच्या सुमारास गर्दी नसल्याने घटनेवेळी स्थानकात तुरळकच प्रवासी होते. त्यातून स्थानक लवकर रिकामे करणे यंत्रणेला शक्य झाले. मात्र, मेट्रो स्थानक सुरू असताना ही घटना घडल्याने स्थानकाजवळ सुरू असलेल्या कामांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
या बांधकाम स्थळावर कंत्राटदाराने सुरक्षिततेची पुरेशी काळजी घेतली होती का ? हा प्रश्न राहत आहे. तसेच योग्य खबरदारी घेतली नसल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याचा धोका आहे. याबाबतही कंत्राटदारावर काही कारवाई केली का, याची माहिती एमएमआरसीने दिली नाही. या मेट्रोतील दुसरा कळीचा मुद्दा हा प्रवासी संख्येचा आहे. मेट्रो तीन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यामुळे सीप्झ एमआयडीसी आणि बीकेसी ही पश्चिम उपनगरांतील प्रमुख दोन व्यवसाय केंद्रे जोडली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणी मिळाली आहे. मात्र, ही मेट्रो सुरू होऊन एक महिना उलटून गेल्यानंतर अद्यापही प्रवासी संख्या प्रतिदिन २० हजारांवर रेंगाळते आहे.
आता प्रवास करणारे बहुतांश प्रवासी हे कुतूहलापोटी आलेले दिसतात. या मेट्रोच्या उभारणीसाठी तब्बल ३७ हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. पहिल्या टप्प्यातील मार्गावरून दरदिवशी साधारण चार लाख प्रवासी या सेवेचा लाभ घेतील, हे अपेक्षित आहे. मात्र, अत्यल्प प्रवासी संख्येमुळे या मेट्रोच्या संचालनाचा खर्च काढण्याचे आव्हान एमएमआरसी समोर असेल. त्यात बिघाडांचे ग्रहण दूर करण्याच्या आव्हानाचाही समावेश आहेच.