- विनायक पात्रुडकर
मृत्यू कसा येईल याचे भाकीत करता येत नाही. विज्ञान केवळ मृत्यूचा तर्क लढवतो. मृत्यूसाठी मानव निर्मित अनेक कारणे आहेत. या कारणांवर मानवाने औषधही शोधून काढले आहे. जसे की आग, पाणी यांच्याशी खेळू नये. ज्वलंत पदार्थ बाळगू नये. इमारत, आस्थापनांमध्ये अग्निरोधक यंत्र असावे, अशी ही औषधांची यादी आहे. प्रशासन आणि सरकार हेदेखील आग लागली की खडबडून जागे होते. आग लागली पळा पळा व कारवाई सुरू करा, अशा भूमिकेत सर्वजण असतात. मग उपाय योजनांचा फड रंगतो. अमूकएका गोष्टीवर कायमची बंदी, परवाने रद्दे, अशा कारवाया सुरू होतात. मुंबई महापालिकेने असाच एक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात आगींचे प्रमाण वाढले आहे. ते कमी करण्यासाठी फटाके विक्रेत्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत. दिवाळी व इतर काही सणांसाठी विक्रीचे तात्पूरते परवाने दिले जातील, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. म्हणजे मुंबईकरांना फटाके हवे असतील तर त्यांना शहराबाहेर जावे लागेल. ही कारवाई स्वागतार्ह आहे.
प्रतिबंधात्मक उपाय करायलाच हवेत. फटाके दुकानांचे परवाने रद्द केल्याने आगी थांबतील का, याचेही मंथन व्हायला हवे़ फटाक्यांच्या दुकानाला आग लागून नागरिकांचा बळी गेला अशी एकही घटना आजवर मुंबईत घडली नसल्याचा दावा फटाके विक्रेत्यांनी केला आहे. गॅस सिलेंडर फुटून किंवा शॉर्टसर्किट होऊन नागरिकांचा बळी गेल्याच्या शेकडो घटना मुंबईत घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे़ त्यावर ठोस अशी उपाय योजना पालिकेने केलेली नाही किंवा तशी आखणीही केलेली नाही़ मुंबईत गॅस सिलेंडरची बेकायदा विक्री सर्रास होते. गल्लोगल्लीत असलेल्या चायनीज गाड्यांवर, हॉटेलमध्ये व बहुतांश घरातही बेकायदा सिलेंडरची विक्री होते. सिलेंडरची बेकायदा विक्री गेली अनेक वर्षे सुरू आहे़ यामुळे अनेक आगीच्या घटनाही घडल्या आहेत़ तसे अहवाल सादर झाले आहेत़ त्याकडे काणाडोळा केला जातो आणि काही दिवसांच्या अंतराने पुन्हा आगीची घटना घडते़ याचे ताजे उदाहरण म्हणजे दोन वर्षांपूर्वी कमला मिल कम्पाउंडमधील हॉटेलला लागलेली आग. या घटनेनंतर पालिकेने हॉटेलमधील अग्निरोधक यंत्र बंधनकारक केले व अनेक उपाय योजना सुरू केल्या़ बेकायदा सिलेंडरला निर्बंध घालण्यासाठी काहीच आखणी केली नाही.
शॉर्टसर्किटचा प्रश्न आज मुंबईतील प्रत्येक इमारतीला भेडसावत आहे़ शहरातील बहुतांश इमारतीत विजेच्या वायरी लटकलेल्या दिसतात़ याकडे ना प्रशासनाचे लक्ष आहे, ना नागरिकांना याची काळजी आहे़ रहिवाशी व प्रशासन दुर्घटना घडण्याच्या प्रतीक्षेत असतात़ घटना घडली की जितक्या वेगाने कारवाई सुरू होते, तितक्याचे वेगाने ती थंडावते़ गेल्यावषी परळ येथील क्रिस्टल टॉवरला शॉर्टसर्किटमुळे आग लागली़. त्यानंतर पालिकेने दंडाच्या कारवाईचा बडगा उगारला़ ही कारवाई आता थांबली आहे़ कामाची ही पद्धत गेली अनेक वर्षे सुरू आहे़. सर्वसामान्यांनादेखील याची सवय झाली आहे़ घटना घडली की आवाज करायचा आणि काही दिवसांनी सर्व विसरून जायचे, अशी मानसिकता सर्वसामान्य नागरिकाची झालेली आहे़. होरपळून कोणाचाही मृत्यू होऊ नये, असे आपण म्हणतो़. असा मृत्यू टाळण्यासाठी आपणही प्रयत्न करू शकतो़. यासाठी केवळ सुजाण नागरिक व्हायला हवे़. बेकायदा गॅस सिलेंडर घेणार नाही व कोणाला घेऊ देणार नाही, अशी भूमिका प्रत्येक नागरिकाने घ्यायला हवी़. इमारतीची व घराची वायरींग सुस्थितीत असेल, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी़ प्रशासनानेही तात्पूरती कारवाई न करता, त्यात सातत्य ठेवायला हवे़ इमारतीची वायरींग सुस्थितीत आहे की नाही, याची पाहाणी वारंवार करायला हवी़ बेकायदा गॅस सिलेंडर विकणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी़. तरच भविष्यात होरपळून होणारे मृत्यू टाळता येतील अन्यथा अशा घटनांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढतच राहिल.