मिरज या सांगलीच्या जोड शहरात मरहूम उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेब यांची मजार आहे. तिच्या लगत असलेल्या दर्ग्यात देशभरातील हिंदू व मुसलमान गायक दरवर्षी एकत्र येऊन त्या थोर गायकाच्या स्मृतींना आपल्या गायनाची श्रद्धांजली वाहतात. पं. भीमसेनांपासून कुमार गंधर्वांपर्यंत, वसंतराव देशपांडे यांच्यापासून डागर बंधूंपर्यंत आणि आजच्या आघाडीवरील गायकांपर्यंतच्या साऱ्यांनी त्यांची नम्र हजेरी तेथे लावली आहेत. खाँसाहेबांचे देहावसान १९३७ मध्येच झाले. पण त्यांच्या गायकीचा प्रभाव अजून साºया भारतवर्षावर आहे आणि त्या क्षेत्रातील गुणवंतांसाठी मिरज हे शहर काशी वा मक्का ठरले आहे. गायन वा संगीत ही कानातून मनात उतरणारी आणि माणसांना शब्दावाचून जोडणारी कला आहे. मिरजेत राहणारे हिंदू व मुसलमान परस्परांशी कमालीच्या स्नेहभावाने जुळले आहेत. तंतुवाद्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरातून देशभर देशी व विदेशी तंतुवाद्येही जात असतात. त्याखेरीज व्याख्यानसत्रे, चर्चासत्रे आणि अन्य बौद्धिक व्यासपीठांचीही तेथे गर्दी आहे. एवढे संगीतमय व ज्ञानमय क्षेत्र माणसाला केवळ विनम्र करणारेच नाही तर अंतर्मुख करून मानवधर्मापर्यंत नेणारे आहेत. मात्र राजकारण ही माणसांना जोडणारी बाब नाही. तीत वैर करावे लागत नाही. तीत ते असतेच. त्यातून राजकारणाला धर्मकारणाची वा जातीकारणाची जोड मिळाली की हे वैर धारदार होत असते. अब्दुल करीम खाँसाहेबांच्या पुण्याईने जुळलेल्या या शहरातील मनुष्यधर्माला अशा राजकारणाने आता डागाळले आहे. सर्वधर्मसमभावाचे आणि खºया राष्ट्रीय एकात्मतेचे त्याचे स्वरूप मागे पडून त्याची जागा धार्मिक तेढींनी व जातीय तणावांनी घेतली आहे. तसे करण्यात हिंदुत्ववादी राजकारण्यांएवढेच मुस्लीम कट्टरपंथीयही पुढे आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मोदींचे राजकारण सत्तेवर आल्यानंतर ही तेढ वाढली आहे. खाँसाहेबांच्या मजारीला वंदन करून परतताना पत्रकारांकडून दबल्या आवाजात कळलेली बाब ही की एवढा काळ स्वत:ला सुरक्षित व मिरजकर मानणारा अल्पसंख्यकांचा वर्ग आता धास्तावल्यासारखा दिसत आहे. साºया देशात वाढीला लागलेले धर्मद्वेषाचे राजकारण जसे याला कारणीभूत आहे तशा काही अतिरेकी वृत्तीच्या लोकांनी या परिसरात घडवून आणलेल्या धार्मिक दंगलीही त्याला कारण ठरल्या आहेत. वास्तविक हा परिसर छ. शाहूंच्या पुरोगामी राजकारणाचा वसा सांगणारा आहे. सांगलीतले पवित्र गणेश मंदिर हा देखील तेथील साºयांच्या श्रद्धेचा विषय आहे. शिवाय या परिसराला देशभक्तीचा लाभलेला वारसाही मोठा आहे. अलीकडच्या काळात वसंतदादा पाटील, पतंगराव कदम, आर.आर. आणि जयंत पाटील यासारख्या वजनदार राजकारणी माणसांचा, सा.रे.पाटील यांच्यासारख्या सहकारातून कृषिक्रांती घडविणाºया समाजनेत्याचा आणि कर्मवीर भाऊराव पाटील व आचार्य जावडेकर यांच्यासारख्या ज्ञानर्षींचा त्यात वावर राहिला आहे. मात्र काम व कला यातून निर्माण होणाºया स्नेहभावाहून जातीधर्माचे राजकारण करणाºयांकडून निर्माण होणाºया द्वेषभावनेची तीव्रता मोठी असते. श्रमातून माणसे जोडणे, त्यांना मनाने जवळ आणणे ही दीर्घकाळच्या परिश्रमाची बाब आहे. मात्र जाती व धर्माच्या जाणिवा कोणत्याही कष्टावाचून जागविता येणाºया आणि फारशी बुद्धिमत्ता नसणाºयांनाही करता येणारे आहेत. आताचे चित्र पाहिले की अब्दुल करीम खाँसाहेबांच्या जादूई सुरांनी एकत्र आणलेला समाज व देशभरातील कलावंतांची संयुक्त कामगिरी राजकारण्यांनी नासवायला सुरुवात केली आहे हे मनात येते. त्याचवेळी आपण हिंदूंच्या थोर नेत्यांची शिकवण जशी मागे टाकली तशी इस्लाममधील बंधुत्वाची प्रेरणाही विस्मरणात घालवली हे खिन्न करणारे वास्तव दु:खी करते. अशावेळी मनात येते, पुन्हा एकवार त्या थोर गायकाचे सूर आकाशात निनादावे आणि खºया देशभक्तांची गाणीही त्यात पाहता यावी. त्यातून माणूस जुळावा आणि ज्यात कुणीही धास्तावले असणार नाही असा समाज पुन्हा उभा राहावा.
संगीताने जुळविले ते...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:30 AM