(महिन्याचे मानकरी)- अंबर विनोद हडपकाल मला एक फारच विचित्र स्वप्न पडलं. ते स्वप्न होतं की, मनातली एक फॅन्टसी माहीत नाही, पण मी स्वप्नामध्ये जगातल्या अनेक नैसर्गिक गोष्टींना एकमेकांशी गप्पा मारताना पाहिलं. एक उभं जंगल आकाशातल्या ढगांशी गप्पा मारत होतं. मध्येच डोंगर नदीशी बोलत होते. ढगांमधला पाऊस ढगांमध्ये बसून, विजेशी चर्चा करत होता आणि समुद्र वाऱ्याशी.एका बाजूला माणसांचं जग झोपलेलं असताना ही चर्चा रंगली होती. अगदी प्राण्यांनासुद्धा मध्ये बोलायची आणि हे सगळे काय बोलतायत, हे ऐकायची मुभा नव्हती. बिग बॉसमध्ये चर्चा कशी चालते, तशी काहीशी चर्चा चालू होती, असं म्हणायला हरकत नाही. हे सगळे बोलत होते आणि देव सगळं ऐकत होता.मुद्दा होता अनुकरणाचा. सगळ्यात पहिला मुद्दा जंगलाने काढला, ‘आम्हाला एक संधी हवीय’. देव म्हणाला, ‘सॉरी, नाही होऊ शकत’. जंगल म्हणालं, ‘तू आम्हाला वाचव, असं आम्ही मागतच नाही आहोत. आम्ही सेल्फ डिफेन्सची मुभा मागतोय. माणूस कराटे शिकतोय, मग आम्ही काय वाकडं केलंय आणि माणूस त्याने शिकलेली ही विद्या फक्त डिफेन्स म्हणून नाही, तर आक्रमण करण्यासाठीसुद्धा वापरतोच आहे की’. देव म्हणाला, ‘ही वेळ नाहीये आणि करायचं काय आहे तुम्हाला?’ झाडं म्हणाली, ‘फक्त पळायची मुभा दे’. देव म्हणाला, ‘त्याने काय होणार?’ झाडं म्हणाली, ‘चाल करून जाणं म्हणजे काय असतं ते माणसाला कळेल’. देव म्हणाला, ‘कित्येक माणसं भरडली जातील, त्याचं काय?’ झाड म्हणाली, ‘हा प्रश्न तू माणसाला नाही विचारत, जेव्हा रोज लाखो झाडांची कत्तल होते तेव्हा!’समुद्र म्हणाला, ‘मला थोडे पाय पसरायचेत. पडून-पडून कंटाळा आलाय. एकदा तरी उभं राहायचंय मला. एखादा प्राणी कसं अंग फडफडून साफ होतो, तसं एकदा करायचंय. फार वेळ नाही, एक-दोन मिनिटं, बस.’ देवाने विचारलं, ‘त्याने काय होणार?’ समुद्र म्हणाला, ‘काही नाही, निदान माझ्यातली घाण तरी झटकून होईल’. देव म्हणाला, ‘म्हणजे ती घाण तू मानवी वस्त्यांवर झटकणार?’ समुद्र म्हणाला, ‘तुला तर माहीत आहे, मला हिशोब चुकता करायला आवडतो. मी काही पोटात ठेवत नाही’.ढगात बसून वाकून पाहणारा पाऊस म्हणाला, ‘मला फक्त समुद्रात पडायची परवानगी द्या ना. प्लीज... माणसांमध्ये पडून माझा फक्त अपव्यय होतो. बाकी काही होत नाही. मी शेतात पडतो, जंगलात पडतो, झाडं मोठी होतात, तेव्हा मस्त वाटतं, पण माणसं मोठी होऊन आजवर माझा काहीच फायदा झाला नाही.’ देव म्हणाला, ‘तू निसर्ग आहेस. फायदा-तोट्याच्या गोष्टी तू कधीपासून करायला लागलास?’ त्याचं उत्तर विजेने दिलं. ती म्हणाली, ‘माणूस आमचं अनुकरण करू शकत नाही, मग आम्ही त्याचं अनुकरण केलं तर काय बिघडलं? प्रॉफिट, लॉस.. इकॉनॉमी या गोष्टी आम्ही त्याच्याकडूनच शिकलो.’वारा म्हणाला, ‘एखादा अॅक्सिडंट आम्हाला पण करू दे ना. ‘हीट अँड रन’मध्ये तसंसुद्धा सुटायची सोय आहे आता. खूप वाटतं यार बेभान व्हावं, पण तू होऊच देत नाहीस.’ देव म्हणाला, ‘माणसं गुदमरतील’. वारा म्हणाला, ‘आणि मी गुदमरतोय त्याचं काय?’ इतका वेळ पडून राहिलेला डोंगर म्हणाला, ‘फक्त एकदा मला माणसांच्या वस्तीत जाऊ दे. माझ्या उंचीचे सेट्स बांधायला यांच्याकडे पैसा आहे आणि मला सांभाळायला येत नाही.’प्रत्येक जण देवावर वैतागला होता. सगळ्यांचं म्हणणं होतं की, या माणसाने तुला देव म्हणायच्या आधीपासून आम्ही तुला आमच्यात राहू दिलं. आता सिद्धिविनायक आणि अशा पॉश मंदिरात गेल्यावर तू बदललास काय? कडेकपारीत, नदीत, समुद्रात सगळीकडे किती मस्त होतास तू. आपण पूर्वी गप्पा मारायचो. तू हळूहळू माणसांचं ऐकायला लागलास आणि आमचं ऐकायचं बंदच केलंस’.देव म्हणाला, ‘असं काहीही नाहीये’. सगळे म्हणाले, ‘असंच आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की, माणसाला आमच्यासारखं उदात्त होता येत नसेल, तर आपण माणसासारखं व्हायचं. तेव्हा त्याला कळेल की, माणूस होऊन लढतात कसं?’ जंगल म्हणालं, ‘तू हो म्हण, आम्ही एका दिशेहून दुसऱ्या दिशेला चालत जातो. बास’. वारा म्हणाला, ‘एक संधी दे.’ समुद्र म्हणाला, ‘मी तर खदखदतोय’. पाऊस विजेसह म्हणाला, ‘फक्त एक चान्स दे’. शेवटी देव ओरडला, ‘बास...’ तुमचा माणसावर प्रभाव पडावा, म्हणून मी तुम्हाला माणसापेक्षा भव्य केलं, ज्यामुळे माणसाची तुमच्याकडे बघून मान अभिमानाने आणि गर्वाने वर होईल, पण तुम्ही सगळे माझी मान खाली घालाल की काय, असं वाटायला लागलंय. माणूस जन्माला आल्या-आल्या ‘वारा म्हणजे विध्वंसक असतो... समुद्र विनाशकारी असतो आणि पाऊस सगळं बुडवणारा असतो असं म्हटलं, तर मग त्याने शिकायचं कोणाकडे बघून? धडा शिकवायला शिक्षकाने विद्यार्थी व्हायचं नसतं. त्याने अधिक चांगलं वागावं, कारण शिक्षा शरीराला नाही मनाला व्हावी’ आणि देव निघून गेला.मला जाग आली. मी खिडकीत येऊन पाहिलं, वारा वहात होता.. झाडं स्तब्ध उभी होती.. लांब पहुडलेला डोंगर तसाच होता.. मला हेच स्वप्न का पडावं, याचं उत्तर मला नाही कळलं, पण हे स्वप्न मलाच का पडावं, याचं उत्तर मला मिळालं. ते म्हणजे, ‘मी माणूस आहे. माझं कर्तव्य आहे की, माझं स्वप्न, प्रत्यक्षात न घडलेलं, पण यापुढे घडू शकणारं भविष्य म्हणून तुम्हाला सगळ्यांना ऐकवावं. (लेखक 'बालक-पालक', 'यलो', 'बाळकडू', 'बंध नायलॉनचे' या चित्रपटांचे आणि 'असंभव', 'फू बाई फू', 'का रे दुरावा', 'घर श्रीमंताचे', 'आंबट गोड' आणि 'सारेगमप' या मालिकांचे लेखक आहेत.)
माझे स्वप्न इंच का पिंंच, नो डबल पिंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2016 3:22 AM