- डॉ. रामचंद्र देखणेवारकरी वैष्णव हे विठ्ठलाच्या सगुण दर्शनाचे प्रेमसुख पंढरीच्या वारीत येऊन वारंवार अनुभवतात. अनुभवामृताच्या प्रेमसागरात विहरण्याचा आनंद ज्ञानेश्वर माऊलींनी सर्व ज्ञान आणि योग गिळून तत्परतेने घेतला आणि तो सर्वांनी कसा घ्यावा हे विठ्ठलाच्या वारीच्या रूपाने शिकविले. प्रेमच, प्रेमाची अनुभूती घेऊ शकत नाही पण इथे प्रेमानुभवच भक्तिप्रेमाच्या सहवासाने सुखावतो आणि प्रेमच प्रेमाला साठवीत चालू लागते. ह्या प्रेमाची पताका खांद्यावर मिरवीत ज्ञानराजही नाचू लागतात‘‘माझे जीवीची आवडी । पंढरपुरा नेई गुढी । पांडुरंगी मन रंगले । गोविंदाचे गुणी वेधले ।’’ ह्या आर्त ओढीने ते पांडुरंगाची भेट घेतात आणि अद्वैत आनंदाची अनुभूती येण्यासाठी हा मार्ग इतरांनाही दाखवितात.सत्संगती हे पंढरीच्या वारीचे एक मोठे प्रयोजन आहे. सत्संगती लाभते आणि प्रकृतीच संस्कृतीकडे झेपावते. जीवनसाफल्य ही परमार्थाची खरी प्रेरणा असून आर्ताला दु:खनाशाने, जिज्ञासूला जिज्ञासापूर्तीने आणि भक्ताला प्रेमभक्तीने जीवनाची सफलताच गाठायची आहे. मानवी जीवनातील अपूर्णता, दोषमयता, मनुष्याची सदाचाराकडे असणारी स्वाभाविक प्रवृत्ती, या व्यापक जनविश्वात आपल्या थिटेपणाची जाणीव, विश्वाची विशालता आणि नियमबद्धता यांचा जिज्ञासू भूमिकेतून अर्थ शोधल्याशिवाय परमाथार्ची वाट सापडू शकत नाही. संत एकनाथ महाराज सांगतात, ‘‘चालता मारगी फुटतसे वाट । मग तो बोभाट सहजी होय ।।नोहे गुंतागुंती चुकीचा बोभाटा । मार्ग आहे नीट संतसंग ।।’’ इतर मार्गावरून चालताना मध्येच एखादी वाट फुटली तर साहजिकच बोभाटा होऊन वाटसरू गोंधळून जातो. नाथमहाराज म्हणतात, संतांनी दाखविलेला वारीचा मार्ग तसा नाही. त्यावर पूर्वीपासून अनेकजण चालत आले आहेत. त्यात कोठेही गुंतागुंत नाही. वाट चुकण्याची भीती नाही. सत्संगाचा हा मार्ग नीट आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ‘‘पाठी महर्षि येणे आले । साधकाचे सिद्ध झाले ।। आत्मविद् थोरावले । येणेचि पंथे ।।’’ याच मार्गावरून महर्षी आले, साधक सिद्धावस्थेला गेले, आत्मज्ञानी याच मार्गावर स्थिरावले, हा मार्ग स्वच्छ आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे.
माझे जीवची आवडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 12:46 AM