प्रतिभाताई पाटील, माजी राष्ट्रपती -
जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांचे आणि आमचे अगदी जिव्हाळ्याचे, कौटुंबिक संबंध होते. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात त्यांचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले. इंदिरा काँग्रेस संकटात असताना आम्ही एकनिष्ठेने पक्षासाठी काम केले. आम्ही विरोधी पक्षात एकत्र काम करत असताना आमचे तेव्हाचे असलेले विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्ष सोडून गेले होते. तेव्हा ‘मी विधानसभेतील विरोधी पक्षनेता व्हावे’ यासाठी बाबूजींनी मला आग्रह केला. त्यांच्या आग्रहाने मला ती जबाबदारी स्वीकारावी लागली आणि मी निष्ठेने पार पाडली. बाबूजींची पक्षाबद्दल असणारी निष्ठा अतुलनीय होती. त्यावेळी इंदिरा काँग्रेसची महाराष्ट्रातील परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नव्हती. आम्ही काही लोकच पक्षाचे निष्ठेने काम करत होतो. त्यातही काही इतर पक्षांतून प्रलोभने दाखवून पक्ष दुबळा करण्याचा प्रयत्न केला जात होता. बाबूजींनाही याबाबत खूप प्रलोभने दाखवण्यात आली होती; पण ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. दिल्लीतही त्यांना आदराची वागणूक मिळत असे.
राजकारणामध्ये प्रवाहासोबत वाहत जाणारे अनेक नेते, कार्यकर्ते असतात. पण, राजकारणातली तत्त्वनिष्ठा आणि विचार ठाम असलेले मोजके नेतेच प्रवाहाविरुद्ध पोहत किनारा गाठतात, अशा नेत्यांमध्ये मी जवाहरलालजी दर्डा यांचा उल्लेख आवर्जून करीन. इंदिरा गांधी यांच्या संकटकाळामध्ये बाबूजी विदर्भात इंदिराजींच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. इंदिराजींसाठी संपूर्ण विदर्भ त्यांनी अक्षरश: घुसळून काढला. ‘लोकमत’मधून इंदिराजींचा आणि काँग्रेसचा विचार घराघरांत पोहोचवला, त्यामुळे महाराष्ट्रात नवा राजकीय इतिहास निर्माण करण्याचे श्रेय जवाहरलाल दर्डा यांना आहे. राजकारणात किती निर्लेप राहता येते, हेही त्यांनी दाखवून दिले. राजकीय विरोधाचे त्यांनी द्वेषात रूपांतर केले नाही, त्यामुळे त्यांच्याभोवती सदैव मित्र जमा झाले. शत्रूचे मित्रत्वात रूपांतर करण्याची एक विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ होती.
बाबूजी आणि माझा स्नेह ‘सासर आणि माहेर’ अशा दोन्ही ठिकाणी आला. माझं माहेर खान्देशचं. जळगावातून त्यांनी १९७७ साली ‘लोकमत’चे प्रकाशन सुरू केलं. माझं सासर विदर्भातील अमरावतीचं. बाबूजींची राजकीय, सामाजिक आणि पत्रकारितेतील सगळी कारकिर्द विदर्भातूनच सुरू झाली. त्यामुळे त्यांचं आणि माझं नातं बहीण-भावाचंच होतं.
ते अकाली गेले याचं दु:ख मला कायम वाटतं. बाबूजी गेले तेव्हा एक आधारवड हरपल्याचीच आम्हा सर्वांची भावना होती. त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली.