पेपर वाचताना कुख्यात गुंड अरुण गवळीनं गांधीजींच्या सत्याचे प्रयोग वाचून परीक्षा दिल्याचं व त्यात तो पहिला आल्याचं पाहून दादासाहेबांची बायको म्हणाली, ‘पहा जरा त्या अरुण गवळीकडे. तो सत्याचे प्रयोग करू लागलाय, आणि तुम्ही पहा. कधीतरी सत्य बोलत चला, जे त्या गवळीला जमतं ते तुम्हाला जमत नाही, याला काय अर्थ...’‘सौ’चा चढलेला पारा पाहून मनातल्या मनात दादासाहेबांनी घरात सत्याचे प्रयोग अंमलात आणायचे ठरवले.- काही वेळाने ‘सौ’नी विचारलं, दुपारच्या जेवणाचं काय? की आजही डब्बा ड्रायव्हरलाच देणार आहात खायला...- ठरवल्याप्रमाणं दादासाहेब बोलून गेले. आज पार्टीला कॅन्टीनमध्ये जाणार आहोत, चिकनचा बेत आहे. पापलेट ही मिळतं तिथं.- का, घरचा डब्बा गोड लागत नाही का? मला मेलीला उगाच काम करायला लावता?- त्याचं कायंय, तू केलेली भाजी कधी कच्ची राहाते, तर कधी मीठ जास्ती पडतं, तोच तो डब्बा खाऊन पण कंटाळोय मी...- म्हणजे एवढे दिवस खोटं बोलत होतात माझ्याशी... बाई गं, काही हाड आहे की नाही जीभेला?- तू ना, अशी चिडू नकोस, चिडलीस की तू एकदम ललिता पवारसारखी किंवा बिग बॉस मधल्या आऊसारखी दिसतेस...- म्हणजे माझं दिसणं पण तुम्हाला खटकायला लागलं... काय दिवस आले गं बाई... मी जातेच माहेरी निघून. म्हणजे माझी किंमत कळेल तुम्हाला...- खुशाल जा. मलाही तेवढंच बरं वाटेल. पण तू जाते म्हणून सांगतेस आणि येताना तुझ्या आईला घेऊन येतेस, मग तुम्ही दोघी मिळून माझं काय करता ते मला माहितीयं. उगाच पोकळ धमक्या देऊ नकोस.- तुमच्या सोबत सात जन्म काढायचं वचन दिलयं मी वडाच्या झाडाला. म्हणून अडकले तुमच्यात. नाही तर कधीच गेले असते...- साफ खोटं आहे. तू वडाला सात फेऱ्या मारल्या तेव्हा मी तुझ्या मागे जाऊन सात उलट्या फेºया मारल्या. तेव्हा त्याचा इथं काही संबध नाही हे लक्षात ठेव...- अहो पण मी काही एवढी वाईट नाहीयं. प्रेम करते मी तुमच्यावर... तुम्ही देखील पहिल्याच कांदे पोह्याच्यावेळी मला हो म्हणाला होतात ना... (अजिजीने)- ती माझ्या आईची चूकच होती. नंतर तिनेदेखील खूप वाईट वाटल्याचं सांगितलं, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती ना...- अहो, असं काय बोलतायं. ताप भरलाय की काय तुम्हाला? एरवी कसे गोड बोलता माझ्याशी...? चला डॉक्टरकडं जाऊ...- मला काहीही झालं नाही. एरवी तुला वाईट वाटू नये म्हणून मी गोड बोलायचो. पण तूच म्हणालीस ना, सत्याचे प्रयोग, आणि त्या अरुण गवळीबद्दल...- अहो, मला काय माहिती हे असं होईल म्हणून... नका हो असं करू...- अगं वेडाबाई, कोण कुठला गुन्हेगार, तो सत्याचे प्रयोग पुस्तक वाचून पास काय होतो आणि तू त्याचा आदर्श घ्यायला सांगतेस. अगं असं असेलच तर त्याने आजवर केलेल्या गुन्ह्यांची सगळी कबुली दिली नसती का कोर्टात. कशाला वकील लावले असते..?- मला उगाच वाटलं म्हणून बोलले हो मी. पण मला सांगा मी कशी दिसते..?- अगं तूच माझी दीपिका गं बाई..!
माझे सत्याचे प्रयोग..!
By अतुल कुलकर्णी | Published: August 15, 2018 4:29 AM