प्रमोद कर्नाडख्यात नाटककार, अभिनेते, पटकथा लेखक, दिग्दर्शक पद्मभूषण डॉ. गिरीश कर्नाड, ज्यांना मी ‘गिरीशबाप्पा’ म्हणायचो, ते निवर्तले..! एक थोर व्यक्तिमत्त्व ज्यांना भारत सरकारने ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ या साहित्यातील सर्वोच्च सन्मानाने गौरवांकित केले होते, ते वयाच्या ८१ व्या वर्षी या जित्या-जागत्या रंगभूमीवरून ‘एक्झिट’ घेऊन अकस्मात निघून गेले..!
आम्ही मूळचे धारवाडचे! कर्नाटकमधील धारवाडमध्ये ‘सारस्वतपूर’ नावाची एक टेकडीवर वसलेली टुमदार बंगल्यांची एक वसाहत. तिथे गिरीशबाप्पांचा आणि माझ्या वडिलांचा बंगला होता. कोल्हापूरहून आम्ही भावंडे सुटीत धारवाडला जायचो. इतके प्रसिद्ध असूनही गिरीशबाप्पा तिथे स्कूटरवर फिरायचे आणि तेसुद्धा पिशव्या घेऊन बाजारहाट करायला. धारवाडला आम्ही दुपारी त्यांना घरी जेवायला बोलावले होते. तर स्कूटरच्या डिक्कीतून काकड्या, लिंबू, गाजर काढत पिशव्या सांभाळत हे आमच्याकडे हजर! ...तर कोणताही अहंभाव नाही. इगो नाही. सर्वसामान्यांप्रमाणे हेल्मेट घालून मस्त फिरणार आणि मुख्य म्हणजे इतकी असामान्य बुद्धिवादी व्यक्ती असूनही पाय जमिनीवर. वास्तविक, कर्नाटक विद्यापीठात मेरिट होल्डर, फर्स्ट क्लास, फर्स्ट विद्यार्थी. स्कॉलरशिप आॅक्सफर्ड युनिव्हर्सिटीत पुढील शिक्षणासाठी परदेशी गेले. शिकून आल्याबरोबर चेन्नई (त्या वेळचे मद्रास) येथे मोठ्या कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली; पण त्यांचा पिंड कलाकाराचा. तिथे मद्रासमध्ये नाटकवाला ग्रुप जमवला. त्यांची पत्नी डॉ. सरस्वती गणपती यांची ओळखही त्याचवेळी झाली. ‘दहा ते पाच’ या नोकरीत जीव रमेना आणि नाट्यलेखन, अभिनय यासाठी दिली नोकरी सोडून. आॅक्सफर्डचा स्कॉलर, मोठा पगार, सुरक्षितता असूनही कलेसाठी तरुणपणी जोखीम घेणारे हे खरे कलावंत. ते धारवाडला आले. विपुल लेखन सुरू झाले.कन्नड चित्रपटाचे लेखन केले. काडू, संस्कार असे कन्नड चित्रपट लिहिले. अभिनय केला. त्यास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपटाकडून नाट्यसृष्टीकडे मोर्चा वळविला. त्यांनी लोककथेवर (फोक स्टोरीज) आधारित नाटके लिहिली. जी आजच्या जीवनमानाशी जुळणारी होती. हयवदन, नागमंडल, तुघलक ही नाटके तुफान गाजली. मूळ कन्नडमधील लेखनाचे लगेच मराठी, बंगाली, तामिळ वगैरे भाषांत अनुवाद होऊन ही नाटके भारतभर गाजली. हयवदन व नागमंडल विजयाबाई मेहतांनी मराठीत केली व गाजली. विजय तेंडुलकरांनी त्यांच्या ‘तुघलक’चा मराठीत अनुवाद केला.
गिरीशबाप्पांनी सांगितल्यामुळे एनसीपीए मुंबईला ‘नागमंडल’चा पहिला प्रयोग पाहण्यास मी सपत्नीक गेलो होतो. बाजूच्या सीटवर पाहिले तर अमरिश पुरी बसलेले. नाटक संपताच त्यांना मी माझी ओळख करून देत विचारले, ‘आपने इसके पहलेवाला हयवदन देखा था क्या?’ त्यावर ते अचंबित होत म्हणाले, ‘अरे भाई, देखा था क्या? किया था... किया था! हिंदीवाला.. कितने शोज किए मैने. गिरीशसाबने तो मुझे लाया इस इंडस्ट्री में.’ मी खजील झालो कारण मला हे माहीत नव्हते; पण त्यांना गिरीशबाप्पांबद्दल प्रचंड आदर होता. पत्नीला बोलावत त्यांनी म्हटले, ‘अजी, इनसे मिलीए, ये गिरीश कर्नाडसाबके भतीजे हंै.’ अमरिश पुरी, सोनाली कुलकर्णी अशा अनेकांना गिरीशबाप्पांनी या क्षेत्रात आणले. शेखर सुमनला ‘उत्सव’मध्ये त्यांनीच आणले़ गिरीशबाप्पा ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’ पुणे येथे प्राचार्य तथा संचालक म्हणून काही काळ कार्यरत होते. संगीत नाटक अकादमीचे ते पाच वर्षे डायरेक्टर (प्रमुख) होते. लंडनच्या एनसीपीए म्हणजे नॅशनल सेंटर परफॉर्मिंग आर्टस्चे तीन वर्षे संचालक होते. कलेशी जोडल्या गेलेल्या नियुक्त्या त्यांनी स्वीकारल्या. ‘स्वामी’ चित्रपटात त्यांनी उत्तम अभिनय केला. अलीकडे ‘टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या बिग बजेट चित्रपटांतही ‘रॉ चिफ’ची भूमिका त्यांनी अप्रतिम केली होती. श्वसनाचा विकार जडल्यामुळे आॅक्सिजनची नळकांडी नाकात व सोबत बॉक्स घेऊन ते हल्ली फिरायचे. ‘टायगर जिंदा है’मध्येही त्यांनी आॅक्सिजनच्या नळ्या लावून काम केले. प्रेक्षकांना ती स्टाईल वाटली.
राज्य बँकेत वरिष्ठ अधिकारी असताना माझे बंगळुरूला एक ट्रेनिंग झाले. शेवटच्या दिवशी ते मला न्यायला गाडी घेऊन कॅम्पसच्या दारात आले. मला पोहोचायला अर्धा तास वेळ झाला. तोपर्यंत त्यांच्या गाडीभोवती चाहत्यांची ही गर्दी. बापरे! ते माझी वाट पाहात होते. मी येताच ‘अरे बस - बस लवकर’ म्हणत तिथून पळ काढला. प्रसिद्धीपासून नेहमीच लांब राहिले. प्रसिद्धी आपसूक त्यांच्या मागे जात राहिली.माझ्या मुलाच्या लग्नाला नेरूळला त्यांना बोलावले. शूटिंग सोडून काही तासांसाठी फ्लाईट पकडून ते बंगळुरूहून खास आले; पण सगळे नातेवाईक पाहताच त्यांच्यात रममाण होत तीन दिवस मुंबईला राहिले. असे कुटुंबवत्सलही ते होते. दुसरी गोष्ट म्हणजे ते अत्यंत स्पष्टवक्ते. जे मनात असेल ते मीडियासमोर छातीठोक न घाबरता मांडत. यापूर्वी एकदा त्यांच्या मृत्यूची अफवा उठली होती आणि त्याच दिवशी मी त्यांच्या बंगळुरूच्या घरी त्यांच्यासमवेत जेवण घेत होतो. आज मात्र ते खरंच नाहीत..ईश्वर त्यांच्या आत्म्याला सद्गती देवो, हीच प्रार्थना.( लेखक गिरीश कर्नाड यांचे पुतणे आहेत )