जगभरात ज्या ‘रहस्यमय’ व्यक्ती होत्या किंवा आहेत, त्यात पुतीन यांचा क्रमांक कायम वर लागेल. त्यांनी आपलं व्यक्तिगत, खासगी आयुष्य कायमच जगापासून दूर ठेवलं आहे. त्यामुळं त्यांच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय याबाबत कायमच जगभरातील लोकांमध्ये उत्सुकता असते. त्यांच्याबाबतची रहस्ये त्यांच्यापासूनच सुरू होतात आणि तिथेच संपतात, असं म्हटलं जातं. तरीही त्यांची काही रहस्ये उघड झालीच. पुतीन यांची प्रेमप्रकरणं, त्यांच्या गर्लफ्रेंड्स, त्यांची अधिकृत आणि अनधिकृत मुलं... याबाबत आजही लोकांमध्ये चर्चा सुरू असते. त्यांनी स्वत: मात्र आपलं खासगी आयुष्य कधीच समाजासमोर येऊ दिलं नाही. ते कायमच पोलादी साखळदंडांच्या आड ठेवलं.
पुतीन यांची माजी पत्नी लडमिला यांच्यापासून त्यांना दोन मुली आहेत. मारिया आणि कॅटरिना. त्यांची गर्लफ्रेंड अलिना काबेवा आणि आणखी एका ‘मैत्रिणी’पासूनही त्यांना मुली आहेत, असा दावा अनेक जण करतात; पण त्यांच्या अधिकृत लग्नातून झालेली अपत्ये असोत, की त्यांच्या छुप्या संबंधांतून, त्याबद्दल त्यांनी आजवर चकार शब्दही काढलेला नाही. जे त्यांच्या अत्यंत खासगी आयुष्याबद्दल, तेच त्यांच्या आरोग्याबद्दलही! याविषयीही खरी माहिती त्यांनी कधीच जगासमोर येऊ दिली नाही.
परवाचंच उदाहरण. पुतीन यांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्या आपल्या बेडरूममध्ये जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळल्याच्या बातम्या जगभर प्रसिद्ध झाल्या; पण दुसऱ्याच दिवशी रशियन प्रशासनानं जाहीर केलं, पुतीन यांना काहीही झालेलं नाही, त्यांना हार्ट अटॅक आल्याची बातमी खोटी आहे आणि ते एकदम व्यवस्थित ठीकठाक, स्वस्थ आहेत! पुतीन यांना हार्ट अटॅक आल्याचा दावा क्रेमलिनच्या एका माजी वरिष्ठ अधिकाऱ्यानंच आपल्या टेलिग्राम चॅनलवर केला होता. माध्यमांनीही दावा केला होता, की पुतीन आपल्या बेडरूममध्ये जमिनीवर पडलेले आढळल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलंय..! पण थोड्याच वेळात ‘चक्रं’ फिरली आणि या बातमी ‘खोटी’ असल्याचं जाहीर करण्यात आलं.
मग खरं काय? पुतीन यांना खरोखरच हार्ट अटॅक येऊन ते जमिनीवर कोसळले की ते खरोखरच धडधाकट आहेत आणि त्यांना काहीही झालेलं नाही? सर्वसामान्य माणूस याबाबत केवळ तर्कच लढवू शकतो. दुसरं काही त्याच्या हातातही नाही; पण काही जाणकारांचं म्हणणं आहे, इतर काही तथ्यांकडे नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल, दाल में कुछ काला जरूर है..!
पुतीन यांच्याबाबत आजवर कधीच अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेलं नसलं तरी पुतीन यांना पार्किन्सनचा आजार आहे याबाबत काही जाणकार छातीठोकपणे सांगतात. मागच्या वर्षी पुतीन यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात पुतीन हे बोलताना अडखळत असल्याचं, त्यांची जीभ चाचरत असल्याचं, हात-पाय कापत असल्याचं दिसत होतं. गेल्या वर्षीच एका अमेरिकन माध्यमानं दावा केला होता, पुतीन हे अतिशय गंभीर आजारानं त्रस्त आहेत. त्यांनी पुढे असंही म्हटलं होतं, मॉस्को येथील त्यांच्या अधिकृत निवासस्थानी पायऱ्यांवरून पडल्यानं त्यांना दुखापत झाली होती. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी ते रशियातील एका विशेष चाचणी प्रयोगशाळेलाही गेले होते आणि तिथे त्यांनी आपल्या बऱ्याच चाचण्या करून घेतल्या! पुतीन यांचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत आहे, ज्यात रशियन संरक्षणमंत्री सर्गेई शोइगू यांच्याबरोबर ते बसलेले आहेत. सर्गेई यांच्याबरोबर चर्चा करीत असताना टेबलाची एका बाजूची कडा त्यांनी अतिशय घट्टपणे पकडून ठेवलेली दिसते. त्याचबरोबर आपले पाय ते सातत्यानं हलवताना आणि अंगठे वळवताना पाहायला मिळतात. तज्ज्ञांचं म्हणणं आहे, ही सगळी पार्किन्सन आजाराची लक्षणं आहेत!
इतकंच नाही, पुतीन यांना कॅन्सर असल्याचंही काही जणांचं म्हणणं आहे. त्यांना कॅन्सर असल्याची बातमी गेल्या वर्षी पहिल्यांदा बाहेर फुटली होती. एक अतिशय ख्यातनाम आणि गर्भश्रीमंत उद्योगपती, जे पुतीन यांच्या अतिशय जवळचे मानले जातात, त्यांनी याबाबतचा दावा केला होता. मात्र, तो अमान्य करण्यात आला. रशियन सरकारनं पुतीन यांच्या प्रकृतीबाबत कायमच अत्यंत गोपनीयता बाळगली आहे, त्यामुळं त्यांच्या प्रकृतीचं गूढ आणखीच वाढत चाललं आहे. त्यांना थायरॉइडचा कॅन्सर आहे, त्यांना कंबरेचं गभीर दुखणं आहे, सायकोसिस आहे, असंही अनेकांचं म्हणणं आहे.
सिक्रेट इमर्जन्सी सर्जरी!
येवगेनी सेलिवानोव हे मॉस्को येथील क्लिनिकल हॉस्पिटलचे सर्जन. पुतीन यांना भेटण्यासाठी आतापर्यंत ३५ वेळा ते त्यांच्या घरी जाऊन आले आहेत, असा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. - का? कारण येवगेनी हे थायरॉइड कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत. २०२०मध्ये त्यांनीही दावा केला होता की, पुतीन यांच्यावर त्यांनी सिक्रेट इमर्जन्सी सर्जरी केली होती!