- सचिन जवळकोटे(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर)
इंद्र दरबारातल्या साऱ्या अप्सरा एकत्र आल्या. त्यांनी महाराजांकडं मागणी केली, “या श्रावणात आम्हाला थोडीशी विश्रांती मिळावी. मंगळागौरीच्या सोहळ्यासाठी सूट द्यावी.”महाराजांनी सहेतुक नारद मुनींकडं बघितलं. पहिल्या झटक्यात होकार गेला नाही, याचा अर्थ महाराजांच्या मनात ‘उद्धव’ घोळत असावेत, हे मुनींच्या लक्षात आलं.. कारण गेल्या दीड वर्षात कोणत्याही अनलॉक निर्णयाला त्यांनी तत्काळ होकार दिला नव्हता.मुनींनी मान लवून सांगितलं, “गेल्या वर्षीपासून भूतलावरही मंगळागौरी ऑनलाइनच सुरू आहेत, महाराज. एक सखी घरातून मोबाइलसमोर ‘नाच गं घुमा’ म्हणते. मग, दुसरी सखी तिच्या कॅमेरासमोर ‘नाचू मी कशी?’ विचारते” महाराजांनी आदेश दिला, “मुनी निघा तुम्ही. भूतलावर हे ऑनलाइन प्रकरण कसं रंगलंय, याचा शोध घ्या.”वीणा झंकारत मुनी भूतलावर पोचले. एका बंगल्याच्या व्हरांड्यात एकीकडं नातवंडं मोबाइलवर ऑनलाइन अभ्यास करत होती तर बाजूलाच आजोबा आपल्या मित्राला पेपरातल्या बातम्या वाचून दाखवत होते. मुलांचा मराठी क्लास सुरू होता. त्यांचे टीचर तिकडून मराठी म्हणी पाठ करून घेत होते. तिकडं आजोबांची बातमी वाचली गेली की लगेच इकडं पोरांच्या म्हणी कानी पडत होत्या. ह्या अनोख्या कॉम्बिनेशनमुळे नारद मुनींना मात्र सध्याच्या राजकारणातल्या गमतीदार गोष्टींचं परफेक्ट आकलन होत होतं. गालातल्या गालात हसत तेही या ‘टायमिंग शॉट’ला मनापासून दाद देऊ लागले.आजोबांनी पहिली बातमी वाचली- ‘आमदारकीच्या इलेक्शनपूर्वी कमळाकडे आकर्षित झालेल्या हात-घड्याळवाल्यांची अवस्था अत्यंत बिकट. सत्तेसाठी गेले, सत्तेबाहेर राहिले.’ याचवेळी मुलांच्या मोबाइलमध्ये तिकडून टीचरनी म्हण सांगितली, ‘तेल गेलं, तूप गेलं.. हाती धुपाटणं आलं.’आजोबांनी दुसरी बातमी वाचली- ‘पुन्हा घरवापसीसाठी या नेत्यांची धडपड सुरू, मात्र चांगली पदं मिळण्याची शक्यता कमी.’मुलांच्या मोबाइलमधून आवाज, ‘नागोबा-म्हसोबा पैशाला दोन.. पंचमी झाल्यावर पूजतंय कोण?’ आजोबा : देणग्यांचा ओघ अत्यंत कमी झाल्यानं ‘हात’वाली मंडळी आता एकेक पैसा खर्चताना दहादा विचार करणार. काटकसरीवर भर. टीचर : बैल गेला अन् झोपा केला..आजोबा : मुंबईतील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचे बनावट फेसबुक अकाउंट भलत्याच तरुणानं उघडलं. अवघं डिपार्टमेंट अवाक्. टीचर : आयजीच्या जीवावर बायजी उदार.- आजोबांच्या बातम्यांशी मुलांना आणि टीचरच्या म्हणींशीही आजोबांना काही सोयरसुतक नव्हतं, मात्र या ‘बातमी कम म्हणी’ ऐकताना नारद मुनींची मात्र हसून हसून पुरेवाट झाली. पुढचं पान चाळत आजोबा वाचू लागले, ‘मुंबईत कमळवाल्यांची व्यूहरचना. बीएमसी इलेक्शनसाठी नारायण कणकवलीकरांना पुढं करणार. धनुष्यबाणवाले लगेच सावध.’टीचर : ऐन दिवाळीत दाढदुखी. आजोबा : ..आगामी स्थानिक संस्था निवडणुकीत आघाडी नाही : मलिक भाईंची परस्पर घोषणा. टीचर : नाचता येईना अंगण वाकडं. आजोबा : मुनगंटीवार यांनी केलं चक्क सीएमचं कौतुक. ते तर म्हणे सुसंस्कृत नेते. टीचर : तुझं-माझं जमेना.. तुझ्यावाचून करमेना! आजोबा : ‘कृष्णकुंज’कार ‘इंजिन’वाले अन् ‘चंदूदादा कोथरूडकर’ एकमेकांना भेटले. आता लवकरच एकत्र येण्याची शक्यता. मात्र परप्रांतीय मुद्दा कळीचा राहणारच.टीचर : करायला गेले नवस.. आज निघाली अवस! आजोबा : ‘नितीनभाऊ नागपूरकरां’नी टाकला ‘मातोश्री’वर लेटर बॉम्ब. विशेष म्हणजे हाय-वेला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अजित दादांनीही टोचले कान. ‘धनुष्य’वाली मंडळी गप्पच. टीचर : तोंड दाबून बुक्क्यांचा मार.. - अखेर शेवटची एक बातमी आजोबांनी वाचली, ‘इंदापुरातल्या दत्तामामांची सोलापुरात उद्धवांवर गावरान भाषेत टीका. म्हणाले.. सीएम जाऊ द्या, मरू द्या.’ आता तिकडून टीचरची कोणती म्हण कानावर पडणार, या उत्सुकतेनं नारदांनी कान टवकारले. मात्र ही चिमुकली पोरंच स्वतःहून एक ताल एक सुरात खच्चून ओरडली, ‘पायलीची सामसूम.. चिपट्याची धामधूम!’ नारायण.. नारायण..sachin.javalkote@lokmat.com