- संजीव साबडे(समूह वृत्तसमन्वयक, लोकमत)मुंबईच्या जवळचे नालासोपारा हे शहर एका रात्रीत संपूर्ण जगाला माहीत होण्याचे एकमेव कारण म्हणजे सुरेश मुकुंद नावाचा कोरिओग्राफर. आपल्या भाषेत नृत्य दिग्दर्शक. खरे तर त्याचे नावही अनेकांना माहीत नाही. आपल्याला कथक, भरतनाट्यम, अरंगेत्रम या शास्त्रीय नृत्यप्रकारातील गुरू माहीत असताना, पण हिपहॉपमधील हा कोरिओग्राफर अगदीच साधा. आपल्याला हिपहॉप डान्स प्रकारही फारसा माहीत नाही, पण या डान्स प्रकाराद्वारे सुरेश मुकुंदने आपल्या आधी देशात व आता जगात आपला ठसा उमटविला आहे.त्याच्या ‘द किंग्ज युनायटेड’ या डान्स ग्रुपने कॅलिफोर्नियात झालेल्या ‘वर्ल्ड आॅफ डान्स’ या जागतिक पातळीवरील डान्स शोमध्ये १00 टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला आणि तब्बल पावणेआठ कोटी रुपयांचे बक्षीसही मिळविले. क्रीडा, अभिनय आदी क्षेत्रांमध्ये भारतातील अनेक खेळाडू व कलावंत जागतिक पातळीवर उत्तम कामिगरी बजावत असताना, एका छोट्याशा डान्स ग्रुपनेही त्यात टाकलेली भर निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद म्हणावी लागेल.‘द किंग्ज युनायटेड’ या ग्रुपमधील सर्व मुले-मुली १९ ते २८ या वयोगटांतील आहेत. त्यातील कोणाच्या वडिलांना नोकरी नाही, कोणाचे वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात, कोणाची आई कुठे तरी घरकाम करते. अनेकांना स्वत:ची घरे नाहीत. बहुसंख्य मुले अतिशय गरीब वा मध्यमवर्गीय कुटुंबातील. अनेकांना आपले शिक्षणही अशा स्थितीत पूर्ण करता आलेले नाही. असे असतानाही नृत्याच्या आवडीपोटी ते सुरेश मुकुंदकडे आले आणि त्याने या मुलांच्या आयुष्याचे अगदी सोनेच केले.ज्यांनी मनोरंजन वाहिनीवरील ‘डान्स प्लस’ हा शो पाहिला असेल, त्यांना या ग्रुपची निश्चितच माहिती आहे. गोविंदा, अनिल कपूर, माधुरी दीक्षित, अक्षय कुमार, टायगर श्रॉफ अशा अनेक चित्रपट कलावंतांनी या ग्रुपचे डान्स पाहून तोंड भरून कौतुक केले आहे. या शोचा प्रमुख व प्रख्यात कोरिओग्राफर रेमो डिसोझा याने तर यांच्या डान्सला दाद देताना अनेकदा आपले बूट काढून त्या मुलांसमोर काढून ठेवले. डान्स शोमध्ये कौतुकासाठी हे केले जाते, पण वर्ल्ड आॅफ डान्स या शोचे परीक्षक जेनिफर लोपेझ, नी यो आणि डेरेक हॉग यांनी तेथील कौतुकाच्या पद्धतीनुसार आपले बूट त्यांच्यासमोर फेकले.अभिनेत्री जेनिफर लोपेझ त्यांच्या डान्सवर फिदा झाली. भारतातील एखादा ग्रुप आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल, असे तिला स्वप्नातही वाटले नव्हते. आपल्या पुढील शोजमध्ये या ग्रुपने सहभागी व्हावे, अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. त्यामुळे हा ग्रुप आता जगभरात चमकत राहील. नी यो या परीक्षकाने हा डान्स म्हणजे ग्रेटेस्ट अॅक्शन फिल्म होती, असे म्हटले आहे.या ग्रुपने २0१५ सालीही या स्पर्धेत भाग घेतला होता आणि तिसरा क्रमांक पटकावला होता, पण तिथे पहिला क्रमांकच मिळवायचा, या ईर्षेने ही मुले प्रयत्न करीत होती. ते यश यंदा मिळाले. पहिल्यांदा त्यात सहभागी होण्यासाठी जायला त्यांच्याकडे पैसेच नव्हते, पण वरुण धवन आणि एका कंपनीने तेव्हा साऱ्या खर्चाचा भार उचलला. तोपर्यंत ही मुले परदेशात कधीच गेली नव्हती आणि अनेकांसाठी विमानप्रवासही पहिला होता.या ग्रुपमधील अनेक नर्तक बदलत गेले आणि ग्रुपचे नावही तीन-चार वेळा बदलले, पण ‘बुगी वुगी’पासून ‘इंडियाज गॉट टॅलंट’पर्यंतच्या अनेक भारतीय शोजमध्ये या ग्रुपने पहिला क्रमांक पटकावला. त्या ग्रुपमधील कलाकारांची मेहनत आणि यश पाहून रेमो डिसोझा यांनी त्यांच्यावर एक चित्रपटच बनविला. एबीसीडी हे त्याचे नाव. संपूर्णपणे डान्सवर आधारित चित्रपटामुळे भारतात अनेक लहान मुले व तरुण विविध डान्स प्रकारांकडे वळले. त्याचे श्रेय रेमो डिसोझाप्रमाणे सुरेश मुकुंद यांनाही द्यायला हवे.यापुढे कोणत्याही डान्स स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय या ग्रुपने घेतला आहे. तो योग्यच आहे. आॅलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकल्यानंतर गल्लीतील स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासारखेच ते होईल. या स्पर्धेतून कोट्यवधींचे बक्षीस मिळाल्याने सारीच मुले खूश झाली आहेत. कोणाला आई-वडिलांना स्वत:चे घर घेऊन देण्याची इच्छा आहे, कोणाला यापुढे आईने लहानसहान कामे करू नये, असे वाटत आहे. हा सारा पैसा आपल्या कुटुंबीयांना आनंदात ठेवण्यासाठी खर्च करण्याचे त्या सर्वांनी ठरविले आहे. मुलांनी नाच-गाणे करू नये, शिकावे, असेच आतापर्यंत पालकांना आतापर्यंत वाटायचे, पण आता परिस्थिती बदलली आहे. नृत्य, संगीत यातही उत्तम करिअर करता येते, नाव व पैसाही कमावता येतो, हे किंग्ज युनायटेडने दाखवून दिले आहे.
नालासोपारा ते कॅलिफोर्निया...किंग्ज युनायटेडचा धमाका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 6:02 AM