महागुरू नारदांनी दिलेल्या नव्या असाईनमेंटने इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमके कोड्यात पडला होता. ब्रो, डुड.. चॅमपासून ते थेट रागा, नमोसारख्या नव्या जमान्याने जन्मी घातलेल्या शब्दांचा अर्थ त्याला मराठी शुद्धलेखनाच्या वाळिंब्यांच्या पुस्तकातही सापडला नव्हता. आता नारदांनी त्याला ‘नमोरुग्ण’ आणि ‘साखर खाल्लेली माणसं’ व्हॉट्सअॅपवर एवढाच मेसेज टाकून रिपोर्ट द्यायला सांगितला होता. विद्यासागर अध्यापक आणि प्रशांत दामलेचं ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटक यमकेने पाहिलेले होते. त्यामुळे त्याने प्रशांत व सागरला फोन केला. ते नाटकावर पोटभर बोलले पण ‘नमोरुग्ण’ या शब्दाचा अर्थ विचारला की दोघांनीही हात वर केले. मग त्याने देवेंद्रभाऊंच्या ‘वॉररुम’शी संपर्क साधला. तिथे पण प्रत्येकजण ‘नमोभक्ती’ या शब्दाभोवतीच पिंगा घालत राहिला. आणखी एक प्रयत्न म्हणून यमकेने नाथाभाऊंपासून ते थेट चंद्रकांतदादा, विनोदभाऊंपर्यंत सर्वांशी संपर्क साधला. जळगावात गिरीशभाऊ जोर-बैठका काढण्यात तर सोलापुरात सुभाषबापू ‘ब्रँडिंग..ब्रँडिंग’चा जप करण्यात दंग असल्याने हाती काहीच लागेना. ‘साखर’ हा विषय कोळून पिलेले धनंजयराव गाडगीळ, पद्मश्री विखे-पाटील, यशवंतराव, वसंतदादांसारखी दिगग्ज मंडळी स्वर्गलोकी उपलब्ध असताना नारदांनी आपल्याला हा विषय दिलाच कसा? असा प्रश्न यमकेला पडला. अखेर त्याने नारदांना फोन केला आणि बोलू लागला... यमके : गुरुदेव,मला काहीच अर्थबोध होईना, पीएम मोदींच्या चार वर्षांवर रिपोर्ट मागण्याऐवजी... (नारदांनी त्याचे वाक्य तोडले)नारद : मला वाटलेच होते! अरे, देशातील शेतकऱ्यांच्या उसाचे २२ हजार कोटी रुपये साखर कारखानदारांकडे लटकले आहेत.. बरं, आता तुला युक्ती सांगतो, आता तू ‘टोळ महर्षी’ नितीनभाऊंना भेट. तुझे कोडे सुटेल! (यमकेने थेट नागपुरात गडकरीवाडा गाठला) तिथे नाश्त्याला उशीर झाल्याने नितीनभाऊ चिडलेले होते. यमकेच्या प्रश्नावर त्यांनी चिडूनच उत्तर दिले, ‘७७७ भौ! तुले एवढे पण कळत नाही..साखर म्हटलं की बारामती अन् नमो म्हटलं की दिल्लीतला ‘सी ब्लॉक’.. तिथे मी आपल्या प्रवीण दराडेंना फोन करतो, तू तिकडेच जा!’ (लगेच ‘सी. ब्लॉक’ला जाण्याच्या तयारीला यमके लागला.) दिल्लीत ‘सी.ब्लॉक’ परिसरात माणसांची गर्दी त्याला दिसली. चौकशी केली तेव्हा देशातील साखर कारखानदारांचे ते नेते असल्याचे समजले. बारामतीच्या इशाºयाने एक मागणी घेऊन ते येथे दाखल झाले होते. यमकेने खोलात जाऊन चौकशी केली असता तिथला सेवक ‘ही वर्षानुवर्षे देशातील साखर खाणारी माणसे आहेत. साखर वाढल्याच्या संकटाची फिर्याद घेऊन आले’ असे म्हणाला. खरे तर साखर उद्योगातील ९९ टक्के लोकांच्या मानगुटीवर ‘शुगर’ या रोगाचे संकट बसते, हा अलिखित नियम यमकेला माहीत होता. आता हे नक्की कोणत्या वाढलेल्या ‘शुगर’ची कैफियत मांडणार हा खरा प्रश्न होता. शेवटी त्याने पुन्हा नारदांंना फोन केला.यमके : गुरुदेव, देशात पुढची चार वर्षे वाढलेल्या साखर उत्पादनाचे संकट राहणार हे मला समजले. पण ही ‘नमोरुग्ण’ भानगड काय?नारद : ‘नमोरुग्ण’ ही नवी साथ देशात फैलावलेली आहे. ती ‘त्रासाची की सुखाची’ हे तिची लागण कुणाला झाली यावर अवलंबून आहे. सध्या साखर उद्योगाचे भवितव्य ‘नमोरुग्णां’च्या मूडवरच अवलंबून आहे...
‘नमोरुग्ण’ अन् साखर खाल्लेली माणसं
By राजा माने | Published: May 28, 2018 1:04 AM